सांगड.😊

Written by

समृद्धी म्हणजे काय? पैशांनी भरलेली तिजोरी कि माणसांनी भरलेलं घर…कबुल आहे पैसा सर्व सुख देतो पण माणसांनी भरलेलं घर समाधान , शांती , आनंदाच नंदनवन फुलवतं…जर पैसा आणि नाती यांची व्यवस्थित सांगड घातली तर माझ्या दृष्टीने माणूस नक्कीच समृद्ध बनेल…
माणूस समृद्ध आहे कधी म्हणावं , जेंव्हा त्याचा पैशाचा गल्ला भरलेला असतो तेंव्हा कि जेंव्हा नात्यांचा गल्ला भरलेला असतो तेंव्हा… मला विचारलं तर नाती महत्वाची.आर्थिक समृद्धीच गणित जाणणारा माणूस नाती जपत पैशाचा गल्ला नक्कीच भरू शकेल…माणसाची सर्वात मोठी ताकद त्याच कुटुंब त्याची नाती असतात… थोडक्यात काय तर नाती ही जीवनाची मुळं आहेत…मुळं घट्ट मातीत रुजलेली असतील तर त्याला पैसा , अधिकार , सत्ता रुपी फळ नक्कीच येतील…
पैसा आणि नाती याची सांगड घालताना घरच्या अर्थमंत्र्याची मात्र नुसती तारांबळ उडते…निर्विवादपणे पैसा महत्वाचा आहे…पैसा माणसापेक्षा मोटा नाही पण तो नात्यांमध्ये दरी निर्माण करणार नाही याची काळजी घ्यावी लागते…कधी कंजूषी करावी लागते तर कधी मनाचा मोठेपणा दाखवून नात्यांमध्ये गाठ पडणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते…मुख्यत्वे प्रत्येक घरात अर्थमंत्री हे खात स्त्रियाच संभाळत असतात त्यामुळे हे सगळं गणित जुळवताना तिला कधी कधी वेगळे मार्ग ही शोधून काढावे लागतात…
मला आठवतंय लहानपणी गावी आमचं एकत्र कुटुंब होतं…आजी आजोबा , माझे बाबा , चार काका , त्यांचा परीवार असं मिळून जवळजवळ पस्तीस लोकांचं मोठं कुटुंब…त्यावेळी पैशाची श्रीमंती नव्हती…गोठाभर गायी , म्हशी , शेळ्या मेंढ्यांचे कळप , घरात दुधदुभत्यानी भरलेल्या चरव्या हीच त्यांची श्रीमंती…घरात एक कारभारी असणार तो सगळे आर्थिक व्यवहार सांभाळणार हे काम माझ्या आजोबांचं होत…तेंव्हा तुझं माझं अस काहीं नसायचं…कारभारी जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य असायचा…सगळ्या काकांना त्यांची काम वाटून दिलेली असायची…मोठे काका शेती बघणार तर दुसऱ्या काकाला शेळ्या मेंढ्याचे डिपार्टमेंट सोबत पहिलवानगी पण करायचे…तिसरे काका पण पहिलवान होते सोबत बाकीच्या शेतीच्या कामात मदतनीसाच काम तर छोटे काका शेंडेफळ असल्यामुळे प्रत्येक कामातून बाजूलाच असायचे…माझे बाबा आर्मी मध्ये होते…तर सांगायचा मुद्दा असा की सगळा पैसा एका ठिकाणी गोळा व्हायचा…घरचे मुख्य जो निर्णय घेतील तो सर्वमान्य असायचा…त्यामुळे घराची एकता , अखंडता , अबाधीत रहायची…आणि नात्यांची वीण उसवण्या ऐवजी आणखीनच घट्ट व्हायची…
अचानक घरी चार पाहुणे जरी आले तरी घरात जे काही ओलंवाळलं असेल ते खाऊन संतुष्ट व्हायचे…नात्यामध्ये एक ओलावा असायचा…त्यामुळे कुठलंही नात ओझं नाही बनायचं आणि आपसुकच नात्यांमधील प्रेमाची रेशीमगाठ नात्यांचे गर्भरेशमी पदर सांभाळून ठेवी…पैसा कधी नात्यांपेक्षा मोठा झालाच नाही…
पण आजची परिस्थिती थोडी वेगळी आहे…विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे आणि आजची पीढी सुशिक्षित असल्यामुळे दोघेही कमावती असतात त्यामुळे आपापले निर्णय घेण्यासाठी दोघेही स्वतंत्र असतात…त्यामुळे तुझं माझं हा वाद सुरू होतो…आर्थिक जवाबदारी दोघांची असली तरी अर्थमंत्र्याच खात बायकोच सांभाळत असते…अशावेळी कोण कोणती भूमिका बजावणार यावर नाती अवलंबुन असतात…आर्थिक जवाबदाऱ्या नीट निभावून नेता नाही आल्या तर नाती तुटताना दिसतात… तुझा पैसा माझा पैसा करण्यापेक्षा पैसा आपला बनला तर नक्कीच नात्यात जिव्हाळा येईल…पैशाच नियोजन ज्याला योग्य जमतं त्याने नियोजनाची जवाबदारी घ्यावी…कोण जास्त कमावतो कोण कमी या मापदंडावर निर्णय घेऊ नये आणि दुसऱ्याने त्याला ते स्वातंत्र्य द्यावं…निर्णय घेताना कोणताही निर्णय एकतर्फी नसावा…एकमेकांच्या विश्वासाने घेतलेले निर्णय गैरसमज निर्माण करणार नाहीत…नात्यात पैसा न येऊ देता नाती फुलवायची असतील तर एवढ्या अटी तर पाळाव्याच लागतील ना…
आयुष्यात पैसा महत्वाचा आहेच…पण तो नात्यांपेक्षा मोठा बनता कामा नये…सध्याच्या परिस्थितीत पैसे कमावण्यातच माणसाचा वेळ आणि शक्ती खर्च होऊ लागली आहे की कमावलेल्या नात्यांना सांभाळायलाच त्याच्याकडे वेळ नाही…पैसा नात्यांना जोडतो ही आणि तोडतो ही…आपण ठरवायचं आहे कशाला जास्त महत्व द्यायला हवं…
चला तर मग मी निघाले पैसा आणि नाती यांची योग्य सांगड घालुन माझा नात्यांचा गल्ला भरायला , तुम्ही काय करताय ?😊

©® सुनीता मधुकर पाटील.

प्रतिक्रिया व्यक्त करा