सापशिडी

Written by

सापशिडी

बालपणीचे दिवस परत येत नाहीत आयुष्यात. खरंतर गेलेले कुठलेच दिवस,कुठलाच क्षण परत येत नाही.एडिटचा पर्याय नसतो आपल्याकडे.काय करायचं ते दहादा विचार करुन करावं लागतं.तरी काही निर्णय चुकतात.काही अतिकाळजीमुळे,काही गलथानपणाने..
मग या चुका सुधारत आयुष्य पुढे सरकत जातं.

फेसबुकवर हेप्पी गो लकी दिसणारी माणसं पाहून आपल्याला वाटतं.काय आयुष्य आहे यांचं.
मजा,मस्ती,धमाल..पण नसतं तसं.सापशिडीच्या खेळात कसं साप,शिड्या दोन्ही असतात..तसंच असतं आयुष्य.. काहींना लगेच शिडी मिळते.काहींना हळूहळू टक्केटोणपे खात मिळते.हल्ली मुलं असले गेम खेळतच नाहीत.या खेळांतून बरंच काही शिकायला मिळायचं.

हारजीत होतचं रहाणार.नाराज व्हायचं नाही.जरी सापाने गिळलं तरी परत सहा पाडायचे..पुन्हा नव्याने खेळ मांडायचा..हेच तर हा खेळ शिकवायचा आपल्याला..आता नाही होत तसं.आत्ताचे ममीपपा मुलांना सहाही बाजूंना सहा टिंब असलेला डाइस आणून देतात.सगळ्या मागण्या पूर्ण करतात.पैसा भरपूर.मला मिळालं नाही ते सगळं सगळं मी माझ्या मुलाला देणार ही धारणा.

पुर्वी काका,मामा मुलांवर रागे भरायचे,शिस्त शिकवायचे..आत्ता तसे चालत नाही.हा कोण माझ्या मुलाला ओरडणारा ..असा विचार करतात लोकं..

मुलं म्हणजे त्यांची स्वतःची मालमत्ता असल्यासारखं वागतात.किंवा त्यांचं खेळणं..या खेळण्यावर इतरांचा अधिकार नाही असं.मुलाला पावसात भिजू देत नाही,गार वारा लागू देत नाही,.अगदी अगदी सुरक्षित ठेवतात..तिजोरीत ठेवल्यासारखं..होइल का अशाने त्याचा सर्वांगीण विकास??अरे पडुदेत त्याला/तिला,धडपडू देत.लागू देत ठेच..उठतील स्वतःच.सावरतील स्वतःला..अलगद उचलून,सापांपासून वाचवून असं शिड्यांवर नका ठेवू त्यांना..अशाने त्यांच्या आयुष्यातलं थ्रील नाहिसं करतो आपण.

मागितल्याबरोबर हवी ती वस्तू आणून पुढ्यात ठेवतात.विनासायास जे मिळतं,ते मिळाल्याचा आनंद मात्र आपण हिरावतो त्यांच्याकडून.मग ही मुलं कुणी काही बोललं की पटकन नाराज होतात.एखादं अपयश आलं की खचून जातात..कारण त्यांना त्यांच्या ममीपपांनी सापाच्या तोंडातून जायला दिलंच नसतं कधी.
लहान मुल जरा रडायला लागलं की लगेच त्याच्या हाती मोबाईल देतात.त्याचं रडणंच हिरावून घेतात.अरे रडणे म्हणजे भावना व्यक्त करणे..तुम्ही त्या बाळाच्या भावनांवर अंमल बजावताय..कसं कळत नाही..का कळतं पण वळत नाही.ऊन,सावली दोन्ही महत्त्वाचे तसंच रडणं,हसणं दोन्ही ..

हल्लीच्या मुलामुलींच्या घटस्फोटामागेही हीच कारणे आहेत.या जोडीला त्यांच्या ममीपप्पांनी अतीप्रोटेक्शन दिल्याने जोडीदाराच्या मतांचा आदर करणं,त्याला समजून घेणं,एक तापला तर दुसर्याने शांत रहाणं..हे सगळं दुर्मिळ होत चाललय.एकतर्फी प्रेमातून आत्महत्या,एसिड फेकणे..हे सगळे या सापविरहित खेळण्याचे परिणाम.नकार पचवायचा असतो,हे यांच्या गावीही नसतं.मन दुबळं असतं.अशी मनं म्हणजे ड्रगमाफियांना,दारुविक्रेत्यांना आयती चालून आलेली सावजं..मुलं या मायाजालात ओढली जातात. दोषी कोण?? तुम्हीच ठरवा.

काही मुलींच्या आया अतिकाळजीवाहू असतात.मुलींच्या संसारात जरा जास्तीच लक्ष घालतात.परिणामी मुलगी तिथे रुजतच नाही.असंच मुलांच्या आयांचही..मुलाचं लग्न करुन दिलं की हा आत्ता आपल्या हातून जाणार..आपलं खेळणं कोणतरी हिरावून घेतय या भयाने भयभीत होतात.सूनही नवखी असते.तिला यातलं काही कळत नसतं.तिला नवरा हा तीचं नवीन खेळणं वाटत असतं.मग..मग या खेळण्यासाठी ओढाओढी सुरु होते.भांड्याला भांडी लागतात नव्हे तर पुरा भांड्यांचा ट्रेच खाली पडतो..धडामधुमधडाक..

काही मुलीतर लग्नच नको म्हणू लागल्यात.सिंगल पेरेंटिंग ही संकल्पना उदयास येतेय.कल्पना चांगली की वाईट हा वादाचा मुद्दा.. पण मग काका,काकू,आत्या,बाबा,वहिनी,नणंद,भावोजी..अशी बरीचशी नातीही कचर्याच्या पेटीत जातील..कठीण दिसतंय एकंदरीत.
–———–गीता गजानन गरुड,आंब्रड.

प्रतिक्रिया व्यक्त करा