सासूबाईंनी शिकवलंय ना मला !!

Written by

मंडळी, आज मी तुम्हाला आर्या आणि आदित्यच्या घरात डोकवायला नेणार आहे बरं का….

दोघांचं लग्न होऊन जेमतेम चार वर्षे झालीयेत. पहिली तीन वर्षे आर्या आणि आदित्य सर्वांबरोबर म्हणजे आदित्यच्या आई-वडिलांबरोबर राहत होते. मग आदित्यची बदली झाली. आणि आता ते दोघे राजाराणी आपल्या राजकन्येसोबत बदलीच्या ठिकाणी सुखाने संसार करतायत.

चला तर मग डोळे भरून बघून घेऊ त्यांचा सुखी संसार…..

सक्काळच्या पारी: 

आदित्य, चल ना आज रविवारची सगळी साफसफाई करून घेऊ. बघ ना किती धूळ जमलीये. दोघं मिळून साफ करू चल.

काय ग आर्या, आठवड्यातून एक दिवस मिळतो सुट्टीचा, आराम करू दे ना मला.

अरे अस्सं कस्सं? सासूबाईंनी शिकवलंय ना मला?

सुट्टी निवांत बसून घालवायची नाsही. सुट्टीचा दिवस म्हणजे आठवडाभर दुर्लक्षित राहिलेली काम करण्याचा दिवस.

तेव्हा नाही का, रविवारचा तू मस्त लोळायचास, मलाही खूप वाटायचं मस्त आरामात सर्व करावं. दोघंही नोकरी करायचो ना आपण. पण माझ्यासाठी घराचा कोना न कोना साफ करण्याची स्वच्छता मोहीम वाट बघत असायची.

आता त्या इथे नसल्या म्हणून काय झालं, असं त्यांच्यामागे त्यांचे नियम मोडण बरं दिसत का??

दुपारच्या उदभरणीला:

आर्या ही कुठली गवारीची भाजी. मला नाही आवडत.

अरे सर्व खायची सवय पाहिजे माणसाला आदित्य.

मी नाही खाल्ल्या कधी असल्या भाज्या, मला दुसरं दे काहीतरी, नाहीतर नकोच मला जेवण.

अरे अस्सं कस्सं? सासूबाईंनी शिकवलंय ना मला?

समोर दिसेल ते गुपचुप खावं, अगदी जsस्सं असेल तsस्सं!

तेव्हा नाही का, आपली बाबी लहान होती, मी सुरूवातीला जरा तिला तिच्या कलाने खायला द्यायचे. तर मला कित्ती सांगायच्या, हे बघ सर्व खायची सवय व्हायला पाहिजे तिला. उगीच चोचले नको नसते.

आता सासुबाईनी एवढ्या स्पष्ट शब्दात सांगितलंय चोचले पुरवायचे नाहीत, मग त्यांचा शब्द मोडायचा म्हणजे???

वामकुक्षी समयी:

काय रे आदित्य किती हा पसारा. कपडे काढून जागेवर नाही ठेवता येत का? ती ऑफीसची बॅग बघ कालपासून कुठे लोळतीये.

ए बाई, गप जरा. कोण नाही घरी येत बघायला. उचलेन मी आरामात.

अरे अस्सं कस्सं? सासूबाईंनी शिकवलंय ना मला?

सर्व वस्तू वेळच्या वेळी जागेवर गेल्याssच पाहिजेत. उगीच टाळाटाळ करायची नाssही.

तेव्हा नाही का, जरा पर्स जागेवर ठेवायची राहिली, कुठे ओढणी बेडवर लोळलेली दिसली, कुठे कधी कानातली, गळ्यातली पडलेली दिसली, की लग्गेच शिस्तीचा बडगा दाखवायच्या.

आता त्यांच्या नजरेआड असा पसारा मांडणं शोभतं का???

रात्र सरता सरता:

अरे ते बघ, तू टॉयलेटचा लाईट परत चालूच ठेवलास आदित्य.

किती वेळा सांगायचं, काम झालं की बंद नाही करता येत का?? सारखा विसरतोस.

चुकून राहिला ग बाई…..करतो थांब.

एवढं काय ग त्यात?

अरे अस्सं कस्सं? सासूबाईंनी शिकवलंय ना मला?

काम झालं की तात्काळ सर्व बंद करायचं. चुकून सुद्धा विसरायचं नाही.

तेव्हा नाही का, माझ्याकडून राहायचे कधी लाईट, पंखे चुकून चालू , तर लगेच माझ्या स्मरणशक्तीचे किती धिंडवडे निघायचे.

आता त्यांचा वारसा मी नाही चालवणार तर मग कोण??

धन्य झाली तुझी आर्या…….?

आता काय मला तू जन्मभर ऐकवत बसणार का?

अरे, तुला कधी हे सगळं ऐकवावं लागेल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं रे!

आता एवढ्या शिस्तीच्या सासूबाईंचा मुलगा म्हणजे, कुठं नावं ठेवायला जागाsच नसेल वाटलेलं मला.

फक्त तीन वर्षात त्यांनी मला जर एवढं परफेक्शनीस्ट बनवलं, तर मग अठ्ठावीस वर्षात त्यांची शिस्त नसानसांत उतरली पाहिजे होती नाही तुझ्या??

इ का हुई गवाँ रे sss?

चला मंडळी, बास झालं डोकावणं आता. आपण उगाच त्यांच्या भांडणात पडायला नको. या सुखाच्या संसारात मिठाचा खडा कसा पडतोय ते समजलं असेलच तुम्हाला!

आता कोण सांगणार या आर्याला, तिच्या सासूबाईंची कित्ती लाडकी सून होती ती, म्हणून इतकं काटेकोरपणे लक्ष दिलं तिच्याकडे, मुलगा काय दोडका होता हो दोडका, दोडक्यांना कोण शिस्त लावतं का कधी?

काय म्हणता??

©️ स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

आवडलं तर लाईक, कमेन्ट आणि फॉलो करायला अजिबात मागंपुढं बघू नका. शेअर करताना तेवढं नावाला मात्र विसरू नका?

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा