सासू आई बनली तरच सून मुलगी बनून राहील…

Written by

“आम्हाला वाटलं होतं सून आली म्हणजे मुली सारखा जीव लावेल आम्हाला, पण कसलं काय” गावाला गेले असताना माझ्या मावशीने तिच्याकडे राहायचा आग्रह केला, त्यावेळी ती सांगत होती.. मावशीची सून, अनघा… ती नेमकी कशी आहे हे सांगायला खरच अवघड… तिला नाव ठेवायला जागा नव्हतीच पण कौतुकही करावं असं काही केलं नव्हतं तिने… मावशीला मुलगी नव्हती, म्हणून सुनेला मुलगी मानेल असं ठरवलं होतं तिने… मावशीचं ऐकून आधीच माझ्या मनात अनघा बद्दल तिढा निर्माण झालेला…

माझा 2 दिवस मुक्काम करायचा ठरला होता मावशीकडे..

अनघा ने स्मितहास्य करत माझं स्वागत केलं, थोड्या वेळासाठी मावशी उगाच असं बोलली असं वाटलं पण दुसऱ्याच क्षणी दिसतं तसं नसेल कदाचित..असा विचार आला.. अनघा ने चहा, नाष्टा बनवला आणि स्वयंपाकाच्या तयारीला ती लागली…मावशी मला बेडरूम मध्ये घेऊन गेली आणि आम्ही गप्पा मारायला लागलो… “अगं ही अनघा ना…फक्त कामं रेटून नेत असते, आम्हाला लळा लागेल असं कधी वागलीच नाही…मुलीची फार हौस होती ग…पण कसलं काय… शेवटी सून ती सूनच… खरंच मला मुलगी असती तर किती बरं झालं असतं…” मावशीचा तक्रारीचा सूर चालूच होता. नंतर आम्ही जेवणं केली, अनघा ने मला काहीच काम करू दिलं नाही.. अनघा चा गणपती मंडळात गाण्यामध्ये प्रथम क्रमांक आला, तिला तसा फोन आला अणि तिने आनंदात पळत पळत येऊन मावशीला सांगितलं,  “आई मला प्रथम क्रमांक मिळाला…”

“आमचा दादा सुद्धा इतका छान गातो, पहिलीला असताना नाच रे मोरा म्हटलेलं, इतका छान गातो ना तो…” आपला मुलगा सुने पेक्षा श्रेष्ठ हे दाखवायचा मावशीचा प्रयत्न होता, अनघा हिरमुसली…

मी तिचं अभिनंदन केलं आणि तिला गाऊन दाखवायला सांगितलं, के सुरेल गाते ती..अगदी पट्टीच्या गायिकेला लाजवेल असं, तिचं कौतुक केल्यावर तिला आनंद गगनात मावेनासा झाला…  दुसऱ्या दिवशी अचानक अनघा आजारी पडली, तापाने फणफणली होती, सकाळी मावशी स्वयंपाक घरात गेल्या, अजून नाष्टा काहीच नाही म्हणून चिडली, आणि बडबड सुरू केली “आज काय डुलकी लागली या बयेला… घरात पाहुणे आहेत हे तरी लक्षात ठेवावं” 

अनघा तिच्या खोलीत कण्हत पडलेली, तिला उभही राहता येत नव्हतं इतका अशक्त पणा आलेला, मला दया आली, मी स्वतः चहा करून तिला नेऊन दिला, तिच्या डोळ्यात चटकन पाणी आलं आणि अपराधी पणाने मला म्हणाली ” ताई मी केला असता ना…” ती खूप घाबरली होती, अपराधी वाटत होतं तिला पण तब्येती मुले उठणही शक्य नव्हतं.. मी मावशीला सांगितल की अनघा ला बरं नाहीये, “नेहमीचंच आहे, कामं टाळायची असतात फक्त, दुसरं काय..” मी तिला चहा दिला हे समजल्यावर मावशी चिडली, “कशाला केलास तू?? तिला उठवलं असतं ना मी चहा करायला…”  मला मावशीची खरंच राग आला, इतक्यात शेजारच्या मावशींनी भेटायला बोलावलं आणि मी तिकडे गेले, तिकडे बराच उशीर झाला मला आणि दुपारी मी परत मावशीकडे आले… अनघा चा ताप वाढला होता, मावशीने औपचारिकता म्हणून तिची विचारपूस केली आणि दुसऱ्याच क्षणी “मग आता स्वयंपाकाचं काय?” 

अनघा ला काय बोलावं कळत नव्हतं, “आई मला खूप त्रास होतोय .” एवढंच कसंबसं बोलली..मावशी तोंड वाकडं करून तिथून निघून गेली…  अनघा कडे काही औषधं होती, पण ती जेवणा नंतर तिला घ्यायची होती…कशीबशी किचन मध्ये आली, बघते तर काय, काहीही तयार नव्हतं, निदान एखाद्या दिवशी तरी सासू स्वयंपाक करेल असं तिला वाटलेलं..आता गोळ्या कश्या घ्याव्या हा प्रश्न तिच्यासमोर होता… मी मावशीला म्हटलं, आज माझ्या हातची भाजी खाऊन बघ, आवडेल तुला..मी चटकन स्वयंपाक करून आधी अनघा ला दिला आणि मग आम्ही जेवलो… मी मावशिचं निरीक्षण करत होते, 

मावशी घरातल्या सगळ्यांचे कपडे नीट आवरून ठेवत होती, पण अनघा चे कपडे बाथरूम मध्ये बाजूला फेकून दिलेले… निदान ती आजारी असताना तिचे कपडे धुवायला हरकत होती? हाताने नव्हे, मशीन मधेच धुताय ना कपडे…. तिच्या वस्तू, तिचे कपडे अगदी तुसड्या सारखे बाजूला टाकण्यात येत असत… नंतर संध्याकाळी परत तिला चहा दिला आणि रात्री मीच स्वयंपाक केला, इतक्यात मावसभाऊ आला, त्याने तिला दवाखान्यात नेले आणि ती झोपली… माझी सहनशक्ती संपली,जायच्या आधी मी मावशीला रूम मध्ये बोलावलं आणि म्हटलं “कोणत्या दृष्टिने तू अनघाने मुली सारख वागावं अशी अपेक्षा करतेस?? तिने मुलींसारखं वागावं या आधी तू तिच्याशी आई सारखं वागतेय का ?? तू तिला अगदी नोकरप्रमाणे वागणूक देऊन एकदम टिपिकल सुने सारखं वागवतेय, तुला मुलगी असती तर आजारपणात तिला कामं सांगितली असती?? तिचे कपडे असे फेकून दिले असतेस?? तिला असं उलट सुलट बोलून टोमणे मारले असतेस??  अगं तुझं नशीब समज अनघा सारखी सहनशील सून मिळाली..दुसरी असती तर ऐकून घेतलं नसतं… एखाद्या मुलीला समोरून कितीही अपमान, अनादर, तुच्छ वागणूक मिळाली तरी आपल्या आई वडीलांप्रमाणे तिने सासरच्या मंडळींशी वागायला हवं हे कोणते लॉजिक?? 

असेच सुंदर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करून फेसबुक पेज ला लाईक करा https://www.facebook.com/irablogs

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा