सिलिकॉन व्ह्यालीचे चौदावे रत्न अर्थात यम्म यच्च १४

Written by

मी राहतो कोथरूड मध्ये म्हणजे पुण्यामध्ये आणि कामाला जातो पिंपरी-चिंचवड मधील अतिशय संपन्न अशा उपनगरात वाकड-पिंपळे सौदागर येथे.

पुण्यातील गाड्या MH12 (एम एच १२) आणि तिकडे पलीकडे MH14 (यम्म यच्च १४). उच्चारावरून मला जे काही म्हणायचे आहे ते पटावे.

तर काय सांगत होतो, मला यम्म यच्च १४ ची गाडी घ्यायची आहे, त्याने काय होईल, तर खूप खूप मज्जा येईल.
म्हणजे कसे तर मला रस्त्यात अगदी भरगर्दीतल्या रस्त्यात गाडी अशी मधोमध ठेवून कुणाला तरी पत्ता विचारता येईल. जो पर्यंत माझे पूर्णपणे पत्ता समजून घेण्याचे श्रम वाचत नाहीत तोपर्यंत मी रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून राहू शकतो, कुणाची हिम्मत आहे मला जाब विचारण्याची. यम्म यच्च १४ आहे म्हटलं.

त्या पुण्यात कोणीही येतो आणि विचारणा करतो, सल्ला देतो, आडनाव कर्वे नाही ना, मग बापाचा रस्ता असल्यासारखे मधोमध का उभे? पेशवे पार्कातून सुटून आलात का? सारस बागेतला रोमान्स चालू आहे का? असे काही बाही विचारतात.

वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, पिंपळे अमुक, पिंपळे तमुक, नवी सांगवी, जुनी सांगवी, तरुण सांगवी, म्हातार सांगवी इथे असे काही नसते बर का. कुणाची टाप आहे (नि कुणाचा बाप आहे ते पण आले) तुम्हाला प्रश्न विचारायची. यम्म यच्च १४ आहे म्हटलं.

यम्म यच्च १४ म्हटलं की कसं दोन दोन लाख पगार, परदेशगमन नेहमीचेच, आयटी ची ऐट हो नुसती. सगळे स्वयंभूः गणपती वा मारूतीच जणू. स्वतःच्या जीवावर मोठी झालेली माणस, मग आम्ही नियम पण आमचेच ठरविणार ना, तुम्ही कोण आम्हास शिकविणारे. यम्म यच्च १४ आहे म्हटलं.

तुमचे नियम पाळीत बसलो तर केव्हढी बर राष्ट्रीय हानी. राष्ट्रीय संपत्तीची हानी, काय सांगता, पटत नाही का? अहो पहा, नियमाने गेलात तर लांबून वळसा घालून यावे लागते, त्यात जळते इंधन, पळते वेळेची गणित नि वाया जाते देशाच्या अतिशय शिकलेल्या समाजाचे कष्ट. ते कष्ट कसे सोफ्टवेअर तयार करण्यात घालवायचे की असे नियम पाळण्याच्या व्यर्थ कष्टात? आम्ही काम, काळ, वेग (time n material) या तत्वावर पैसे मिळवतो, अहो आमचा तासाचा दर काही हजार डॉलरचा असतो. डॉलर बर का, साधा रुपया नाही, तेव्हा डॉलर कमविणारी आम्ही गुणवान मंडळी असे नियम नि ते ही वाहतुकीचे नि ते आम्ही पाळावेत, जमणार नाही, कारण आम्ही यम्म यच्च १४ आहे म्हटलं.
आम्ही यम्म यच्च १४ आहे म्हटलं, पुण्यात आम्ही आमची गाडी घातली की बाकी लोक त्यांच्या गाड्या बाजूला घेतात, यांच्या नादी लागूया नको म्हणून पतली गलीसे निकल जातात. असा रुबाब आहे म्हटलं आमचा, कारण यम्म यच्च १४ आहे म्हटलं.

आमचा प्रभाग पूर्वी बारामती मतदार संघात होता(हरिश्चंद्राची तारामती, शरदरावांची बारामती अशा निवडणुकीतल्या घोषणा तुम्ही ऐकल्या असतील नव्ह), ते बारा बारा काय हो, खरे तर आम्हीच फक्त बाराचे, तेव्हा एक तर बाराचे सगळे branding आम्हाला द्यावे. म्हणजे बारामतीचे नाव हवे तर चौदामती करावे, वा पंधरामती आणि यम यच्च बारा पण आम्हाला देवून टाकावे, कारण आम्ही बारा देशातील बारा गावचे बारा प्रकारचे पाणी प्यायलेली आम्ही मंडळी,

कायम एकदम ऐटीत असणारे आय टी सरदार, आमच्या मागण्या मान्य करा, बघता काय सामील व्हा. कारण आम्हीच फक्त बाराचे. हे नसेल होत तर, “बाराचे असणे” हा शब्दप्रयोग तरी बदला, निदान त्याला “चौदाचे असणे” असा बदल करावा, व तसा ठराव पुढील अखिल भारतीय साहित्य संमेलनात मान्य करून घ्यावा, कारण यम्म यच्च १४ आहे म्हटलं.

आणखी एक, आमच्याकडे जसे कामकाजाच्या वेळा वेगवेगळ्याप्रकारे व्यक्त होतात, जसे वर्किंग फ्रॉम होम, फ्लेक्झी अवर्स, वर्किंग ओन अमेरिकन टाइम वगैरे वगैरे, त्याच प्रकारे आम्हास वाहतूक नियमात पण सवलत हवी, म्हणजे कसे आम्ही उलट सुलट कुठूनही कोणतेही वाहन कसेही घुसवू शकतो हे मान्य करून टाका, कारण यम्म यच्च १४ आहे म्हटलं.

चौदावे रत्न हा शब्दप्रयोग केवळ यम्म यच्च १४ वरून पडलेला आहे याचे ट्रक भरून पुरावे आम्ही देऊ शकतो म्हटलं, पण तुम्हीच ते आम्हाला मागणारच नाहीत कारण यम्म यच्च १४ आहे म्हटलं.
सोशल मिडिया म्हणजे आमच्या बोटांचा मळ (बोटांनीच आम्ही आमचे ह्यांडहेल्ड मोबाईल वापरतो ना), होत्याचे नव्हते (एखाद्याला उदध्वस्त करणे) नि नव्हत्याचे होते (व्हर्च्युअल रियालिटी हो) यात आमचा हात कोणी धरू शकेल का? तर मग वाहतुकीच्या बाबतीत आमचा नाद करायचा नाय, कारण यम्म यच्च १४ आहे म्हटलं.
बाहेरच्या देशात कसे सभ्य सारखे वागतात, मग इथे आले की मग का असे बेताल गाड्या चालवितात, वगैरे युक्तिवाद आमच्यासमोर नको, आम्ही कोण ते तुम्हाला समजणार पण नाय, आमच्याशी युक्तिवाद करणे तुम्हाला जमणारच नाय, कारण यम्म यच्च १४ आहे म्हटलं.

हम जहा खडे होते है, वहां से लाईन शुरू होती है, त्याप्रमाणे हम जैसे गाडी दामटते है उसीसे वाहतूक के नियम बनते है, कारण यम्म यच्च १४ आहे म्हटलं.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा