सीमारेषा..

Written by

 

#सीमारेषा…

सौ.योगिता विजय टवलारे ✍️

सुधाच्या बहिणीच्या मुलीचे लग्न होते.. ती, तिचे सासू – सासरे , दोन मुलं असे सगळेच तीन दिवसा आधीच बहिणीकडे गेलेले फक्त तो लग्नाच्या आदल्या रात्री येणार होता.. त्याच्या कामाच्या व्यापामुळे तो फॅमिली फंक्शन मध्ये कधी यायचा तर कधी नाही..जवळपास त्याचे येणे जमायचेच नाही..

त्यामुळे घरातील सर्व व्यवहार , मुलांची शाळा ,पॅरेंट्स मीटिंग ,मुलांचा अभ्यास , त्यांचे वाढदिवस ,येणाऱ्या जाणाऱ्या पै – पाहुण्यांची खातीरदारी , सणवार सगळंच ती बघायची..तो तिच्यावर सगळ्या जबाबदाऱ्या टाकून बड्या कंपनीत उच्च पदावर सावकाश स्थानापन्न झालेला..

घरात कसलीच कमतरता नव्हती…सुख , समाधान तर होतेच पण त्याचं बरोबर त्याच्या आई वडिलांना तिने छान सांभाळून घेतले होते , त्यामुळे घरात असा कधी वाद व्हायचा नाही..झालाच एखादं वेळी तर तेवढ्यापुरताच असायचा.. मग तो तिच्यावर आणखीनच खूष असायचा..

कधी कधी फॅमिली फंक्शन असो वा कुठलही फेस्टीव्हल असो , त्याला यायला जमत असूनही तो येणे टाळायचा.. तो वेळ मग मित्रांसोबत घालवायचा..त्याला फार आवडायचं त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला.. त्याचं हे वागणं तिला कळत असूनही ती दुर्लक्ष करायची…

ती वरून जितकी सोशिक आणि शांत वाटायची तितकंच तिच्या मनात वादळ घोंगावत असायचं..तिला फार वाटायचं त्याने घरातील प्रत्येक जबाबदारीत सहभाग घ्यावा..आपल्यासोबत टाईम स्पेंड करावा पण त्याला ह्या सगळ्याची जाणीव कधी व्हायचीच नाही..

लग्नं करून सुधावर सगळ्या जबाबदाऱ्या टाकून आपण मुक्त झालोय , असा काहीसा गोड गैरसमज त्याच्या मनात खोलवर रुजत गेला..

सुरुवातीला त्याची वाटणारी ओढ हळू हळू कमी होत गेली आणि त्याच्या नसण्याची तिला सवय होऊन गेली..तिचे सासू सासरे त्याच्यापेक्षा तिच्यावर आणखीनच अवलंबून राहू लागले.. मुले मोठी झाली आपआपल्या व्यापात गुरफटली..

सासू सासरेही वयाने थकलेले..त्यांच सगळं करण्यात तिचा वेळ जाऊ लागला..पण आता मात्र त्याला असुरक्षित वाटायला लागलेलं..रिटायरमेंट झालेलं..त्याला सगळ्यांची कमी तर वाटू लागलीच पण तिच्या बद्दल त्याच्या मनात पुसटशी असूया निर्माण होऊ लागली..

आई बाबाही कायम तिचेच गोडवे गातात .. म्हणजे मी ह्यांच्यासाठी दिवसरात्र मेहनत केली पण कुणालाच माझी किंमत नाही ? मी एवढी मेहनत कुणासाठी केली.. ? कुटुंबासाठीच ना ? मग ह्यात माझे काय चुकले ?? बरं मित्र म्हणाल तर तेही त्यांच्या व्यापात गुफटलेले.. खरंतर मित्र आणि कुटुंबातील फरक त्याला आता कळायला लागला होता..

सुभाषची चीड चीड वाढायला लागली..तिला कळायचं पण जे ती आधीपासूनच करत आली ते आताही करत होतीच..

पूर्णपणे दुर्लक्ष !!

घरात सगळे सुरुळीत चालू होते..फक्त तो आतल्या आत धुमसत रहायचा..

काही दिवसात त्याच्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस येतो..सुधा त्या दोघांसाठी छान सरप्राइज पार्टी प्लॅन करते..त्यात तिचे मुलेही सामील असतातच..वाढदिवसाला संपूर्ण गोतावळा , सुभाषच्या बहिणी सहकुटुंब तर सुधाचे माहेरचे सुद्धा तिच्या आनंदात सामील होतात..

हे सगळं अपेक्षित नसल्याकारणाने तिच्या सासू – सासऱ्यांचा गोंधळ उडतो ..तिथेही ती त्यांना सांभाळून घेते आणि त्यांना कम्फटेर्बल फिल करून देते..गोंधळलेल्या सासू – सासऱ्यांना तिचे फार कौतुक वाटते..

त्यांना कळले कसे नाही ह्या सरप्राइज पार्टी बद्दल म्हणून लटक्या रागात तिची कानउघाडणी करतात पण अगदी काही सेकंद ..कारण पुढच्याच वेळी सासूबाई तिला आपल्या मिठीत घेऊन तिची पाठ थोपटून कौतुक करतात..

सूधाच्या लक्षात येतं सासूबाई फार भाऊक झाल्याय..ती त्यांच्या हाताला धरून खुर्चीवर बसवून पाणी प्यायला देते..त्यांचे डोळे पाणावतात..त्या बोलायला लागतात.. सुधाने खूप केलंय आमच्यासाठी..सुभाष तर फक्त नावापुरताच आहे पण आमची सुधा ?? तिने सगळेच कर्तव्य पार पाडलीत..

लग्न करून जेव्हा तिने ह्या घरात पहिले पाऊल टाकले तेव्हा प्रत्येक नववधू सारखे तिनेही खूप स्वप्न सजवले असतील..पण सुभाष!!त्याने कधी तिच्या स्वप्नांचा विचारच केला नाही..

मी बऱ्याचदा तिला रडतांना बघितलंय..जेव्हा ती गरोदर होती तेव्हा सर्वात जास्त तिला सुभाषची गरज होती पण तेव्हाही तो आऊट ऑफ स्टेशन गेलेला..
मी असे म्हणत नाही की तेव्हा तो मुद्दाम असे वागला पण गरजेच्याच वेळी नवरा बायको सोबत नसेल तर , त्या नात्याला खरचं अर्थ असतो का ?? मिलिंदच्या जन्माच्या वेळी तो होता पण त्याचं मन मात्र ऑफिस मध्ये रेंगाळत होतं..हे स्पष्ट त्याच्या चेहऱ्यावरून जाणवायचं..

काम आपल्यासाठी असतं आपण कामासाठी नसतो हेच त्याला कधी कळलं नाही..सौरभच्या आजारपणात सुद्धा त्याच्या जवळ नसायचा..मुलांना दवाखान्यात न्यायला , त्यांची काळजी घ्यायला त्याच्याकडे वेळ नसायचा ..

घर आणि नोकरीची सांगड त्याला कधी घालताच आली नाही..मुलांना ,सुधाला आणि ह्या पिकलेल्या पानांना म्हणजेच आम्हाला त्याची गरज होती , हे त्याला कधी कळलेच नाही…

बरं , गरजाही आपापल्या वेळेनुसार असतात ..त्या त्या वेळची गरज त्याचं वेळी भागली तर ठीक , नाहीतर मग ज्या व्यक्तीची आपल्याला गरज असते ना ?? ती हळु हळु संपुष्टात येऊन त त्याच्याशिवाय जगणं शिकवते..सुभाशच्या बाबतीतही असेच झाले..

अरे , सुभाष तुला असं का वााटायचं ?? तुझ्याबद्दल आम्हाला काहीच माहीत नसेल म्हणून ?? बऱ्याचदा सुधा , मी आणि आपल्या घरगडीने तुला तुझ्या मित्रांसोबत बघितलंय..तेही केव्हा ?? जेव्हा जेव्हा तुझी मुलांना , सुधाला गरज असायची..तेव्हा फोन करून सांगायचास की तुला खूप कामं आहेत , यायला जमणार नाही ..

किती रे तुझी ती खोटी कारणं ?? तुझ्या त्या वागण्याचा मी जेव्हाही तुला जाब विचारावा म्हणून मनाशी पक्क करायचे तेव्हा सुधा मला अडवायची..ती म्हणायची , आई ! त्यांना हवं तसं वागू देत..समोरच्या व्यक्तीने आपल्याला वेळ द्यावा , ह्यासाठी आपण त्यांना बळजबरी करू शकत नाही..राहिला प्रश्न जबाबदारीचा ? तर ती लादून नाहीतर स्वतः स्वीकारायची असते..त्याची जाणीव स्वतः ला असावी लागते..आणि सुभाष स्वतः च जबाबदारी स्वीकारण्यास तयारी नाही..

मी समर्थ आहे घर सांभाळायला..

तिचं हे बोलण ऐकुन मी गप्प बसायचे..त्यामुळे तू आणखी बेजबाबदारपणे वागू लागला..पण हल्ली तुझ्या वागण्यातला बदल हा पच्छातापाचा नाहीतर असुयेचा आहे..तू रात्रंदिवस काम केले म्हणजे ह्याचा अर्थ असा होत नाही की तू खूप मोठी कामगिरी केली..ते तुझे कर्तव्यच होते..

पण तू आयुष्यातल्या छोट्या , मोठ्या आनंदी क्षणांना मुकलास..संसार सुखाचा गोड अनुभव तू घेतला नाहीस.. आयुष्यातून निसटून गेलेल्या सोनेरी क्षणांना आता तू एकवटू शकत नाहीस..मुलांचे बालपण तू परत अनुभवू शकत नाहीस..असो , निदान सुधा बद्दल तुझ्या मनात राग नाहीतर अभिमान असायला हवा रे..

माझ्यासाठी एवढं तर करूच शकतोस ना ??
संसार म्हणजे काय रे ?? दोन मनांचे मिलन.. सुधासाठी दोन शब्द कौतुकाचे पुरे असतात..आता तरी तिच्या फार काही अपेक्षा नाहीत तुझ्याकडून..एवढं बोलून त्या थांबल्या …आणि सूधासाठी टाळ्यांचा गडगडाट झाला..

सुभाष मात्र त्याच्या आईकडे अश्रू भरल्या नजरेने बघत राहिला ..सुधाला हे लक्षात आले..ती त्याच्याकडे गेली आणि त्याचा हात आपल्या हातात घेतला..

तो लागलीच म्हणाला , सुधा मला माफ कर !!
मी आयुष्यभर केवळ पैशांमागे धावलो ..प्रत्येक नात्याची एक किंमत असते..ती किंमत मला कधी कळलीच नाही..संसार आणि जबाबदारी मधली सीमारेषा मला ओळखता आली नाही..मी खरचं , आयुष्यातील महत्त्वाचे क्षण गमावून बसलो..पण ह्या नंतर असे होणार नाही..प्लीज मला माफ करशील ना ,??

अजिबात नाही !! मी तुला कधीच माफ करू शकणार नाही..

त्याने अवाक् होऊन तिच्याकडे बघितलं..तिची खट्याळ नजर त्याच्या मनाचा वेध घेत होती..तोही हसला आणि तिला मिठीत घेतलं..अगदी आलेल्या पाहुण्यांचे , आई वडिलांचे नी मुलांचे भान विसरून..

परत एकदा टाळ्यांचा गडगडाट झाला..मुलांनी अक्षरशः त्यांना घेरून चिडवायला सुरुवात केली..सुधा लाजून चूर झाली तर सुभाष जग जिंकल्याच्या आविर्भावात तिच्याकडे बघत राहिला…?

खरचं ; संसार म्हणजे अख्खं जगचं , नाही का ??

#कथा आवडल्यास नावासकट शेअर करावी , तसे न आढळल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल..निगेटिव्ह कमेंट्स चे आनंदने स्वागत करेल..पण सोज्वळ भाषेत असेल तर बरं वाटेल..??

३/९/१९

? शैली ?

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा