सुखाची शोधयात्रा – भाग 1

Written by

शेजारच्या काकूंनी दरवाजावरती थाप मारली तशी निलिमा विचारांच्या गर्तेतुन बाहेर आली. पदराने घामेजलेला चेहरा पुसत तीने दरवाजा उघडला. शेजारच्या काकू हातात पातेलं घेऊन उभ्या होत्या. चेहर्‍यावरती हसु आणत त्या म्हणाल्या,” अगं,आमच्याकडे दूधवालाच आला नाही अजुन, थोडंसं दूध मिळालं असतं तर…..” पुढे काकु काही बोलेपर्यंत निलिमाने पातेलं काकूंच्या हातातुन घेतलं. स्वयंपाकघरात गेली. भांड्यांचं झाकण बाजुला केलं तर तळाशी थोडंसं दुध होतं त्यात तिचा आणी अनिलचा संध्याकाळचा चहा पुन्हा सकाळचा चहा पण मग विचार केला सकाळीच मदत मागायला दारात आलेल्याला नाही कसं म्हणायचं. आधीच एवढ्या मोठ्या शहरात कोणं आहे आमचं. शेजारधर्मही न निभावून कसं होईल.’ असा विचार निलिमाने केला आणी थोडं दुध काकुंनी दिलेल्या पातेल्यात ओतलं.
“एवढ्यानं होईल का?” ती दुधाचं भांडं काकुंच्या हाती देत म्हणाली. काकूंनी हसत- हसत पातेलं हातात घेतलं,” हो…हो आमच्याकडे आला दुधवाला की देते हा तुला आणून,उगीच तुमची गैरसोय नको.” “असु दे काकू, गैरसोय काय त्यात ! तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला !” निलिमा म्हणाली तसा काकुंनी हसत तिचा निरोप घेतला. खरंतर काकुंनी तिला हातभार लावण्यापेक्षा तिने काकूंची अशी ऐनवेळी निकड भागवण्यात तिचा वाटा जास्त असे. आता एवढ्या मोठ्या मुंबईत रहायचं तर चेहर्‍यावरती हसु आणी सहानुभूतीचे मुखवटे लावुन फिरणारी माणसं भेटणारच असा विचार ती करायची. पण त्यांना कधी दुखावण तिला आजतागायत जमलं नव्हतं. तो विचार डोक्यातुन काढुन टाकत तिनं कामं आटोपायला सुरूवात केली.
अनिलला लवकर निघायचं असतं. त्यात ट्रेन वेळेत पकडायची घाई असते म्हणून नाश्ता वेळेत देणं हे कामही तिला वेळेत पार पाडावं लागत असे. त्यात तिला कधीही कंटाळा वाटत नसे. अनिल नेहमी नाश्ता करताना पहिला घास तोंडात टाकताच म्हणायचा,” वा! खरंच छान झालाय हा नाश्ता. तु सुगरण आहेस अगदि.” तेवढा आनंद तिच्यासाठी खूप असायचा. आकाशाला हात टेकल्याचा भास तिला होत असे. अनिलच्या त्या दोन – तीन वाक्यांनीच तिचा चेहरा प्रफुल्लित व्हायचा आणि तो आनंद दिवसभर तिच्या चेहर्‍यावर असायचा. दिवसभरातील कामांचा थकवा, नव्या शहरातील धावपळ सगळा क्षीण नाहीसा व्हायचा. अनिल टिफिन बॉक्स घेऊन कामावरती निघुन गेला कि हिची कामं पुन्हा सुरू व्हायची. आजुबाजुच्या भागाची नीट माहितीही नाही. ट्रेनच्या प्रवासाची सवय नाही त्यामुळे ती शक्यतो खोलीला कुलूप लावून  बाहेर जायचीच नाही. सर्व कामं उरकली कि निवांत बसुन पेपर वाचायचा, खिडकीतुन बाहेरची दुनिया बघायची हे नेहमीचंचं झालं होतं. सूर्य कलायला लागला की अनिलची वाट पाहणं सुरू व्हायचं. तो आला कि दिवसभराच्या घटना, अॉफिस,अॉफिसातले सहकारी सगळ्यांविषयी भरभरून बोलत बसायचा.
घर तसं लहान होतं. दरमहा घराचं भाडं भरावं लागत असे. त्यात नेहमीचा खर्च, सणवार, अनिलला सुट्टी असली तर सिनेमाला जाणं होत असे. त्यातुन अनिलच्या गावी राहणार्‍या आई वडिलांकरिता थोडेफार पैसे पाठवावे लागत असत. म्हातारपणी तरि त्यांना कमी त्रास व्हावा अशी त्याची इच्छा असे. निलिमानेही कधी याबतीत त्याला रोखलं नाही. निलिमा खुष होती. उंची कपडे, साड्या, नवे दागिने, दिमतीला गाडी अशी हौसमौज नव्हती पण समाधान घरात नांदत होतं.
नेहमीप्रमाणे अनिल अॉफिसला निघुन गेला. निलिमाची नेहमीची कामं सुरू झाली. स्वयंपाक करताना खिडकीतून बाहेरची वर्दळ दिसायची. रस्ते, रस्त्यावरची वाहनं आणि रस्त्यापलिकडे असणारा आलिशान बंगला! एखाद्या परिकथेत असावा असा. समोर मोठं गार्डन, त्यात सुंदर, रंगीबेरंगी फुलझाडं, गॅलरीतील फुलझाडांच्या कुंड्या, खिडक्यांच्या दिशेने अलगद वाढू पाहणार्‍या वेली, खिडक्यांना उंची पडदे डोळे दिपुन जातील अशी शोभा होती ती! बंगला कितीही सुंदर असला तरि समोर गेटला भलंमोठ्ठ कुलूप! निलिमा स्वयंपाकघराच्या खिडकीतून त्या बंगल्याची सुंदरता डोळे भरून पाहायची. कोण असतील या बंगल्याचे मालक? कुठे असतील आता? बरं इतका सुंदर बंगला असा बंद ठेवून कुठे राहत असतील? तिला खूप कुतुहल वाटायचं आणी आज तर बंगल्याची ती खिडकी चक्क उघडी होती. ते रंगीबेरंगी पडदे कोणीतरी दूर सारले होते. तिनं आणखी काही दिसू शकतं का ते पाहण्याचा प्रयत्न केला. बहुतेक त्या खिडकीतून बंगल्यात लख्ख प्रकाश दिसत होता. कोणी आलं असेल का तिथं असा प्रश्न मनात येताच बंगल्याच्या दरवाजातून एक माणूस बाहेर आला. सुटाबुटातला तो माणूस तडक गाडीत बसला. त्याच्या पाठोपाठ एक बाई बाहेर आल्या. जरिची साडी, अंगावर दागिने, हातात बांगड्या त्यात सोन्याच्या बांगड्या जास्त. तिनं हात हलवून त्या माणसाला गाडीत बसताच निरोप दिला आणी ती आतमध्ये निघून गेली. पुन्हा दरवाजा बंद झाला तशी निलिमा भानावर आली.

क्रमशः
लाईक, कमेंट आणी शेअर केला
दुसरा भाग लवकरच 😊😊

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.