सुख म्हणजे नक्की काय असतं!

Written by

सुख म्हणजे नक्की काय असतं…….

जोशीकाकूंचा मुलगा वरद जात्याच हुशार होता.एका नामवंत फर्ममध्ये नोकरीला लागला.
जोशीकाकूंनी वरदसाठी स्थळं पहायला सुरुवात केली.

मुलीची सगळी माहिती त्या बाहेरुन काढून घ्यायच्या.
त्यांच्या अपेक्षा म्हणजे रंग.तर या आमच्या काकू होत्या अगदी उकडीच्या मोदकासारख्या पांढर्याशुभ् त्यामुळे सुनही त्यांना गोरा,निमगोरा,गव्हाळ,केतकी यापैकी केटेगरीतली हवी होती.
भुवया जाड,वळणदार हव्या होत्या.
जोशीकाकूंचं नाक कुणीतरी जोरात गुद्दा मारावा असं चेपलेलं,बसकं पण त्यांना सुनेचं नाक सरळ,एका रेषेत,उभट चाफेकळीसारखं हवं होतं.
ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे.
दात शुभ्र मोत्यांसारखे,गोबरे गाल,गालावर साधारण अर्धा इंचाची खळी,
जिराफासारखी निमुळती मान,?
कमनीय बांधा विदाऊट पाठीला पोंग.
चवळीच्या शेंगेसारखी कमनीय देहयष्टी.
लांबसडक बोटं. स्वैंपाकात कुशल,
सुसंस्कारी.
नोकरी करणारी,
कामाचा भारी खटारा अगदी सहजतेनै आवरणारी,
चारचौघात उठून दिसणारी,
मोगर्याच्या टवटवीत फुलासारखी..

कोणतीही मुली पहायची झाली की जोशीकाकू तिचा फोटो मागवत.
मग आपल्या लिस्टीच्या चाळणीत त्या फोटोला गाळीत नी नाक मुरडीत.
शी बाई हिचे जरा ओठ जाड वाटतायत.
हिला किती जाड ढापण आहे
हिचं नाक अर्धा सेंटिमीटर वरती हवं होतं.ही बरी वाटते पण जरा जास्तीच जाड वाटतेय.
हिच्या चैहर्यावर मुळी तेजच नाही….
एक ना दोन जोशीकाकूंनी इंटरनेट साईटवर,खात्रीच्या भटजींकडून मागवलेले शंभर एक फोटो सटासट रिजेक्ट मारले.
असेच पाच सहा महिने जातात.

त्यात युवराजांचे प्रेम हाफिसातील रेवावर जडले.
वरदच्या अंगात पिरेमाचा किडा घुसला.
घुसला तो घुसला लयच वळवळ करायला लागला.
या किड्याने त्याच्या अंगात आपली वंशावळ वाढवली.
वरदच्या अंगभर पिरेमाचे किडे त्याला गुदगुल्या करु लागले.
वरद रोज बसस्टापवर रेवाची वाट पाहू लागला.
ती ज्या नंबरच्या बसमध्ये चढे तिच्यातच चढू लागला,
गाणंही गुणगुणायचा,
घरसे निकलतेही, कुछ दूर चलतेही
रस्तेमें है उसका घर
कल सुबहा देखातो
बाल बनाती वो
खिडकीमें आई नजर….??

दांड्या मारणारा वरद रोज हाफिसात जाऊ लागला.
इंप्रेशन का काय असतं ते मारण्यासाठी चोख कामं
करु लागला.
परिणाम चांगलाच झाला.
खडूसचंद बाँसने सगळ्यांसमोर कौतुक केलं.
बढती मिळाली.
प्रत्येकजण अभिनंदन करु लागला.
रेवा डेस्कजवळ आली.
वरदची छाती लागली धडधडायला.
हातापाय लागले थरथरायला.
डोळे सताड उघडे.

रेवाने बाजूच्या फुलदाणीतला लाल गुलाब ग्लासातल्या पाण्यात बुडवला व त्या गुलाबाने त्याच्या चेहर्यावर
गार पाण्याचा शिडकावा केला…
तब जाके कभी होश में आया बंदा ।
रेवाने वरदचा उजवा हात हातात घेऊन त्याला अभिनंदन केलं.
हातातलं गुलाबाचं फुलं तोडून त्याच्या बटणात खोचलं
व एक दिलखेचक हसू फेकून ती आपल्या जागेवर
जाऊन बसली.
वरद घरी येईपर्यंत हवेतच तरंगत होता.

आईने केलेली शेपूची भाजीही आज वरदने दाद देऊन खाल्ली.
आईला भांडी घासून दिली.
स्वैंपाकघरात आवराआवर करायला मदत केली.
आईच्या दुखर्या कमरेवर मुव लावून दिले.
आईबाबा दोघेही अवाक.
वरद निजायला गेल्यावर आई बाबांना विचारते,
” हे आपलचं पोरगं न व?
काय झालं माझ्या बाळाला?
असं का करायला लागलंय श्रावणबाळावाणी?”
बाबा: नको काळजी करुस.बढती मिळालेय,पगार वाढलाय म्हणून खुश असेल स्वारी.
आई: ती बढती काय आधीपण मिळायची.
पण येवढा आनंद

आईला वाटतं, दालमें कुछ काला है
दुसर्यादिवशी नेहमी दाढीचे खुंट वाढवणारा वरद
छान गुळगुळीत मैदान करतो.
लेझर मशीनने कानाजवळचे केस बारीक करून घेतो.
नावडणारा पिंक कलरचा शर्ट घालतो.
शर्टावर सुगंध शिंपडतो.
आईला येतो म्हणून स्माईल देतो नी निघतोही.
आई पुरी सदमेमे.
नेहमी नऊ वाजले तरी तंगड्या वर करुन निजणारा,
कशीतरी दहा मिनटात तयारी करणारा,महिनाभर दाढीला
हात न लावणारा,चुकुनसुद्धा सुगंधी द्रव्य
न वापरणारा तिचा लेक.
त्याच्यातला हा बदल तिला shock वर shock देतो.

हाफिसात सगळेच वरदमधला हा बदल नोटीस करतात.
पिंक शर्ट घालणार्यांची टेर घेणारा हाच का तो
कलिग आपापसात खुसुफुसु करतात.
लंच टाइममध्ये रेवा सगळ्यांना तिच्या नव्या पिंक स्कुटीचे पेढे देते.
वरदही पेढा खातो पण आत्ता आपल्याला बसमध्ये मिळणारी तिची सोबत मिळणार नाही या विचाराने
नाराजही होतो.
बसस्टापवर थोडा नाराजीनेच पावलं टाकतं जात असतो..
मागून पिंक स्कुटी येऊन थांबते.
रेवा त्याला तिच्या मागे बसायला सांगते.
तो सहज बसून जातो.
तिच्या घराजवळ तो उतरतो व मी पुढं चालत जाइन म्हणून सांगतो.
हळूहळू त्यांचं एकत्र येणंजाणं सवयीचं होऊन जातं.
रेवाही कधी वरदमध्ये गुंतुन जाते, तिचं तिलाचं उमगत नाही.
जोशीकाकूंचं वधु संशोधन चालूच असतं..

एकदा ब्रेकमध्ये रेवा वरदला पाय मोकळे करुन येऊया म्हणते.
हाफिससमोरचं अथांग अरबी समुद्र असतो.त्याच्या कठड्यावर दोघं जाऊन बसतात.
निळाशार समुद्र कितीतरी गुपितं पोटात घेऊन अस्ताव्यस्त पसरलेला असतो.
इथल्या सगळ्यांच्या प्रेमकहाण्यांचा,आणाभाकांचा,
वाळूत उमटवलेल्या लवच्या चिन्हाचा तो गोड साक्षीदार असतो.
कितीतरी वेळ ती दोघं सागराची निळाई बघत बसतात.
रेवा दि ब्रेव्ह गर्ल,वरदचा हातात हलकेच तिचा नाजूक हात ठेवते.
वरदच्या बोटांत आपली नाजूक बोटं गुंतवते..
वरद तिच्याकडे बघतो.
रेवा त्याच्या डोळ्यांत डोळे घालून विचारते?
वरद मी प्रेम करते तुझ्यावर न् तु माझ्यावर.
ते व्यक्त होतयं आपल्या हालचालींतून,
शब्दांची गरज नाही.
“वरद तु लग्न करशील माझ्याशी?”

वरद तिला आईच्या एकशेएक अपेक्षांविषयी सांगतो.
रेवा म्हणते,”ते माझ्याकडं लागलं.”
रविवारची सकाळ….
वरदचे बाबा पेपर वाचत असतात.
वरद मेच बघत.
मिसेस जोशी ओले सोफ्यावर टाकलेले टावेल दोरीवर टाकत…
इतक्यात दारावरची बेल अंमळ जोरात वाजते.
जोशीकाकू दार उघडतात.
समोर गोड हसरी,पावसाच्या सरीसारखी,बकुळफुलावानी रेवा सुहास्य वदन करीत दारात उभी.☺️

रेवा:काकू मी येऊ का आत.
जोशीकाकू??: येना ये.
रेवा: काकू मी तुमच्या वरदची हाफिसातली मैत्रीण.
काकू वरद मला अन् वरदला मी आवडतो.
मला तुमची सुन व्हायचं आहे.
काकू तोंडाचा मोठ्ठा आ करतात.
रेवा घरुन आणलेली गुळपापडी त्यांच्या तोंडात घालते.
गुळपापडी म्हंजे काकूंचा विक पाँइंट.?
रेवा त्यांना खुर्चीवर बसवते व विचारते,कशी वाटते मी तुम्हाला.
जोशीकाकू गुळपापडीच्याच नादात ‘छान हो’ असं कधी
म्हणतात ते त्यांच त्यांनाच कळत नाही.
वरदच्या बाबांना तिचा हा लाघवीपणा,बोलघेवडेपणा भावतो.
वरद येकदम खुश होतो रेवावर, अगदी अगदी टांगा पलटी घोडे फरार….
वरदचे बाबा तिची जुजबी चौकशी करतात.

मग रेवाच्या बाबांना फोन करुन दुपारच्या जेवणाचं आमंत्रण देतात.
रेवा व जोशीकाकू दोघी स्वैंपाकाला लागतात.
मसालेभात,वालाचं बिरडं,कांदा भजी,पुर्या,कोशिंबीर,चटणी,,,
दोघी मिळून गप्पा मारत मारत कधी स्वैंपाक होऊन जातो. त्यांच त्यांना कळतही नाही.
वरदही मदत करतो,कुठे नारळ खवून दै, कुठे पुर्या तळून दे, भाज्या चिरुन दे अशी…..
तेवढाच त्याला या दोघींतला सुसंवाद ऐकायला मिळतो.
जोशीकाका जिलबी, नारळी पाक घेऊन येतात.
ते घरी आल्यावर मठ्ठा बनवतात.
त्यात त्यांचा हातखंडा असतो.
रेवाला जोशीकाकांच्या हातचा मठ्ठा खूप आवडतो.
मग चौघे गप्पा मारत बसतात.
वरदची जरा खेचतात.

इतक्यात रेवाचे बाबा, तिचा भाऊ येतो.
मग सर्वजण पंगतीत बसून जेवणाचा आस्वाद घेतात.
जोशीकाकांना रेवाचे बाबा त्यांची माहिती देतात.
रेवाचे बाबा: मी माधव सदाशिव खोत. आमचं गाव तळेरे,तालुका कणकवली. गावी मोठा भाऊ, वहिणी,त्यांची दोन मुलं, गुरं वासरं.आईवडील आमच्याबरोबर रहातात. या लेकरांची आई त्यांच्या लहानपणीच,छोटसं तापाचं निम्मित्त
होऊन गेली.तेंव्हापासून माझ्या आईवडलांनी माझं घरटं सांभाळलं.मला परत लग्न कर म्हणत होते.पण मी समाधानी आहे,माझ्या रेवतीच्या आठवणींत….. रेवावर तिच्या आजीने चांगले संस्कार केले आहेत.☺️
जोशीकाकू : हो ते तिच्या वागण्यातून जाणवतं आहे. माझी अपेक्षांची चाचणी किती चुकीची होती ते मला हिच्याशी बोलून कळलं.
मला लेक कम सून मिळाली.मग संगिताचा कार्यक्रम होतो. सगळीचं गाण्यात वरचढ,
वरदचे बाबा गातात,
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा
मन करा थोर…..

रेवाचे बाबा त्यांना पेटीची साथ देतात.

जोशीकाकू गातात,
सांगा माझ्या लेकीला मी येणार गं
तुझ्या पोटी नवा जन्म घेणार ग….

रेवा भावूक होते.जोशीकाकू तिला कुशीत घेतात.
रेवाच्या भावालाही जवळ घेतात.
त्या बहीण भावंडांना खूप बरं वाटतं….

वरद गाऊ लागतो,

मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत,
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत,
देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो,
हवय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो,
आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं,
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं,
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत,

सगळीजणं वरदच्या सुरात सुर मिसळतात

© गीता गजानन गरुड.
आंब्रड

छायाचित्र सौजन्य : देवेंद्र साटेलकर.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत