सून माझी लक्ष्मी

Written by

“काही संस्कारच राहिले नाही हो आजकालच्या मुलींमध्ये,लग्न नंतर कसं राहायचं याचंही भान ठेवत नाहीत”…
“हो ना, काय तर म्हणे नोकरी करते, आपल्या वेळी नोकरी नव्हत्या करत का बाया? आजकालच्या पोरीचं फार कौतूक”..
सर्व सासवांची एकदा चर्चा चालू होती…
“सून येते म्हणजे घरात लक्ष्मी येते असं म्हणतात, अहो कसली लक्ष्मी, लक्ष्मी म्हणजे कशी एकदम पवित्र, सोज्वळ आणि प्रेमळ”
छाया काकू अगदी पोटतिडकीने हे बोलून गेल्या…
एकंदरीत काय तर आजच्या सुना म्हणजे अगदी वाईट अश्या निष्कर्षाला त्या पोचल्या होत्या..

एकमेकींशी असे गार्हाणे करून त्यांचे मन हलके होऊन जाई, रोज प्रत्येक सासू काहीतरी नवीन गोष्ट ऐकायला घेऊन यायची…

आणि माझीच सून कशी वाईट याबद्दल चढाओढ चालायची…
आज छाया काकूंनी मात्र फार मनावर घेतलं होतं, 

त्या मनाशीच म्हणाल्या की “लक्ष्मी देवी, खरंच तूच ये ग बाई प्रत्यक्ष आणि दाखव माझ्या सुनेला बाईने कसं वागायचं ते”
विचारमग्न अवस्थेत त्या घरी आल्या, येतांना आणलेली दुधाची पिशवी कॉट वरच ठेवली, रेडिओ चालू होता आणि त्या तश्याच झोपी गेल्या..
दुसऱ्या दिवशी उठून बघतात तर काय चमत्कार, 
एक लख्ख प्रकाश त्यांचा समोर, डोळे दिपून गेलेले..

छाया काकू प्रचंड घाबरल्या, धीर करत त्यांनी निरखून पहायला सुरवात केली, बघतो ते नवलच… साक्षात लक्ष्मी????
ताडकन अंथरुणावरून उठत त्यांनी देवीचे पाय धरले,
“आई, हे काय पाहतेय मी..साक्षांत लक्ष्मी आईने मला साक्षात्कार दिला?? माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये…”
“तुझी प्रार्थना मी ऐकली आहे, आणि म्हणूनच तुझी मदत करायला मी इथे आली आहे, तुला तुझ्या सुनेला दाखवायचं आहे ना की लक्ष्मी सारखं कसं वागायचं ते? ठीक आहे, मी काही दिवस इथेच थांबेन… माझं वागणं बघून ती आपोआप शिकेल..”
छाया काकूंना देवीने आपली प्रार्थना ऐकली असे वाटले..त्या मनातून खूप खुश झाल्या….
“छाया, मी एक स्त्री च्या रूपाने इथे राहील, पण रीमा ला कळू द्यायचे नाही की मी कोण आहे ते”
असं म्हणत लक्ष्मी एका साध्या स्त्री च्या रुपात प्रकटली..

तेवढ्यात रीमा आली, “आई मी येते आता, ऑफिस ला उशीर झालाय, अय्या… ह्या कोण?”
“अगं…. ह्या की नाही…त्या…आपल्या….हां… आपल्या जोशी काकू आहेत ना, म्हणजे तुझ्या चुलतसासू…त्यांची ही सून…लक्ष्मी नाव तिचं”
“त्यांच्या मुलाचं तर लग्न व्हायचं आहे अजून”
“त्या नाही काही, ह्या दूरच्या आहेत…लांबचे नाते आहे…जाऊदे तुला उशीर होतोय तू जा…”
रीमा निघून गेली, तसं छाया काकू लक्ष्मी चा पाहुणचार करण्यात मग्न झाल्या…
संध्याकाळ झाली, रीमा घरी आली…आल्यावर स्वयंपाक केला, लक्ष्मी ने तिच्या जेवणाचे भरभरून कौतुक केले आणि सगळे झोपी गेले…दुसऱ्या दिवशी रविवार होता…
छाया काकू आनंदात होत्या, आता रीमा घरी असेल, लक्ष्मी ला दिवसभर पाहून ही काहीतरी शिकेल असं त्यांना वाटलं…
रविवार उजाडला….रीमा उठली, सडा रांगोळी केली…नाष्टा बनवला…छाया काकू लक्ष्मी ची वाट बघत होत्या…”लक्ष्मी देवी उशिरा उठते? असेल, हा जगाचा संसार सांभाळून थकत असेल बिचारी…”
लक्ष्मी उठली तशी दिवाणखान्यात आली, “गुड मॉर्निंग काकू”

“गुड मॉर्निंग बेटा”…रीमा ला ही लक्ष्मी ने गुड मॉर्निंग केले…रीमा हॉल मध्ये साफसफाई करण्यात व्यस्त होती…लक्ष्मी हातात वर्तमानपत्र घेऊन चाळू लागली…”एक ठार, 3 जखमी…खून…दरोडा…” एकेक बातमी वाचून लक्ष्मी चा जीव वरखाली व्हायचा…छाया काकू वाट बघत होत्या… लक्ष्मी कधी एकदा रीमा ला दाखवते की कसं वागायचे ते…
लक्ष्मी ने अंघोळी साठी विचारलं, आणि सोबतच कपडे आणले नाही म्हणून काकूंना सांगितलं..
“रीमा, अगं लक्ष्मी ला तुझे कपडे दे बरं, तिचं मुक्कामाचं काही ठरलं नव्हतं म्हणून तशीच आलीये बिचारी…”
रीमा ना लक्ष्मी ला आपल्या खोलीत नेलं, आणि आपलं कपाट उघडलं…”घे तुला जे कपडे हवे ते…” गॅस वर दूध ठेवलेलं रीमा ला आठवलं आणि ती पटकन किचन मध्ये पळली…लक्ष्मी ने कपडे घेतले आणि ती अंघोळीला गेली…
लक्ष्मी जशी बाहेर आली तशी छाया काकू तिच्याकडे बघतच बसली…लक्ष्मी चक्क जीन्स घालून आली…
रीमा ला हसू आवरले नाही, ती खोलीत पळाली आणि तोंड दाबून हसू लागली…
छाया काकू चाट पडल्या…
“लक्ष्मी आई, अगं हे काय?? तू आणि जीन्स??”
“मग काय झालं, चांगलं नाही दिसत??”
“नाही ग, पण तुला आम्ही नेहमी साडीत पूजतो, तुझे सगळे फोटो साडीतले..”
लक्ष्मी हसायला लागली…
“अहो काकू, माझं रूप तुम्हा माणसांनीच तयार केलंय तुमच्या कल्पनाशक्तीं ने, मी पैसे देते असा तुमचा समज, म्हणून एका हाताने मी सुवर्णमुद्रा देतेय असं चित्र तुम्ही साकारलं, मी देव म्हणून डोक्यावर मुकुट चढवला, अंगावर भरभरून दागिने चढवले…देव्हारातल्या फोटो कडे बघून लक्ष्मी म्हणाली…”
“मग तुझं रूप तरी कसं??”
“मला रंग नाही, रुप नाही आणि आकार नाही, मी एक तत्व आहे एक प्रतीक आहे…अंशरूपाने मी सर्वांमध्ये असते…”
“हो पण ही जीन्स…” छाया काकू थोड्या नाराज होत म्हणाल्या…
“हो…मी बरेच कपडे पाहिले रिमाचे, त्यात हे मला एकदम कम्फर्टेबल वाटले…आणि मी गॅलरी मधून काल खाली पाहिले तर बऱ्याच मुली हेच घालून फिरत होत्या…साडी पेक्षा हे किती सोपं नाही का??”
छाया काकूंनी बळजबरीने होकार दिला…रीमा ला पंजाबी ड्रेस मध्ये बघून त्यांना हायसं वाटलं…
पुढे लक्ष्मी रीमा सोबत किचन मध्ये गेली..अन्नपूर्णाच ती…छाया काकूंना वाटलं आता लक्ष्मी रीमा ला स्वयंपाकाचे धडे देणार…
दोघी बऱ्याच वेळ किचन मध्ये होत्या…जेवायची वेळ झाली तसं दोघींनी वाढायला घेतले…छाया काकूंनी एक घास खाल्ला…कधी नव्हत ते इतकीं तृप्ती त्यांना आज जाणवत होती…
“वा वा वा, लक्ष्मी, जेवायचं तर तुझ्या हातचं… काय सुंदर केलीये ही मेथीची भाजी, आणि वरण तर एकदम चविष्ट…वा वा…”
रीमा आणि लक्ष्मी एकमेकीकडे बघत हसू लागल्या..
“अहो काकू, मी पाहुनी आहे म्हणून रीमा ने मला काहीच करू दिलं नाही…सगळं तिनेच तर केलं आहे…तुम्ही फक्त एका वेगळ्या दृष्टिकोनातून हे चाखलं म्हणून तुम्हाला यात वेगळेपणा जाणवला..
“अहो आई, हे काय पहिल्यांदा बनवलंय का मी…नेहमीचंच तर आहे…”
छाया काकू गोंधळल्या…
“रीमा खरंच चांगलाच स्वयंपाक बनवते म्हणजे” मनाशी पुटपुटल्या..
लक्ष्मी रीमा आणि छाया काकूंना म्हटली की चला आपण बाहेर फिरून येऊ…मला हे शहर दाखवा…
“आज सुट्टी होती, घर आवरायचं होतं.. लक्ष्मी ने कशाला हा घाट घालावा…” छाया काकू मनातल्या मनात बोलल्या…
तिघेही बाहेर फिरायला गेले, 
लक्ष्मी एका पुस्तकांच्या दुकानात गेली…तिथून किरण बेदी, कल्पना चावला, मदर तेरेसा अशी पुस्तकं तिने घेतली आणि आपल्या छोट्याश्या पाकिटातून पैसे काढत दुकानदाराला दिले…
तिघीही सोबत होत्या…”हे बघ रीमा, आपण मरतांना काहीही सोबत नेत नसतो, सगळं काही इथेच ठेवून जातो..एकच गोष्ट असते ती म्हणजे कर्तृत्व… ती मात्र आपल्या जाण्यानेही चिरकाल टिकेल…ही जी पुस्तकं आहेत त्यातल्या स्त्रियांनी अशीच कर्तृत्व गाजवली…तुही आयुष्यात काहीतरी करून दाखव की तुझ्या नंतरही कित्येक पिढ्या तुला ओळखतील… “
रीमा एकदम आश्चर्यचकित झाली, तिला लक्ष्मी चं हे बोलणं खूप आवडलं आणि तिने मनावरही घेतलं…
लक्ष्मी ने परत आपल्या छोट्या पाकिटातून पैसे काढत रीमा ला दिले आणि त्या तिघींना पॉपकॉर्न आणायला सांगितले…रीमा गेली तशी लक्ष्मी छाया काकूंना सांगू लागली की “बघा, तुमच्या सुनेला शिकवलं की नाही कसं वागायचं ते? कशी ही रीमा, फक्त घर आणि नोकरी यातच अडकून पडायची, काहीतरी वेगळं करण्याची उमेदच नव्हती तिच्यात… आता बघा कशी फुलते ती…”
छाया काकूंनी मान डोलावली, हे सगळं उलटंच होतंय, मी काय अपेक्षित केलेलं आणि काय घडतंय….
तिघी घरी आल्या, काही वेळाने रीमा चे आई वडील तिला भेटायला आले…रीमा ने त्यांचं स्वागत केलं आणि घरात किचन मध्ये चहा नाष्टा बनवायला गेली…लक्ष्मी तिच्या मागोमाग गेली आणि रीमा ला तिने बाहेर काढलं, रीमा आई वडिलांसोबत बसून गप्पा मारायला लागली…
छाया काकूंना वाटलं की रीमा ने लक्ष्मी ला कामाला लावलं की काय??
त्या किचनमध्ये गेल्या, “अगं लक्ष्मी, तू का बनवतेय नाष्टा?? रीमा बनवेल की..” 
“पहा ना काकू, रीमा ला अजिबात कळत नाही…आपले आई वडील आलेत, त्यांच्याशी बोलायचं सोडून इकडे काय करत होती ती?? म्हणून मीच तिला बळजबरी तिकडे पाठवलं…तुम्ही बरोबर म्हणत होत्या, आजकालच्या मुलींना कसं वागायचं तेच कळत नाही…”
छाया काकू काही न बोलता तिथुन निघून गेल्या….
एकदा तिघीही खरेदीला गेल्या…साडीच्या दुकानात रीमा ने सासूला एक साडी घेतली…बिल करायला ती बाजूला गेली…लक्ष्मी छाया काकूंच्या कानात पुटपुटली…”रीमा ला खरंच काळत नाही कसं वागायचं ते…”
छाया काकू खुश झाल्या, आता तरी लक्ष्मी ला समजलं असेल की रीमा किती वाईट आहे ते, रीमा ने नक्की हलकी साडी काढली असणार, इतका पैसा कमावते तरी सासू ला इतकी हलकी साडी….
लक्ष्मी तातडीने रीमा कडे गेली, त्यांचं काहीतरी बोलणं झालं आणि त्या 2 साड्या घेऊन आल्या…
“रीमा, अगं एक साडी बस झाली की…2-2 कशाला…” बळेच फॉर्मालिटी म्हणून सासू बोलू लागली…
“काकू तुम्हाला नाही दोन्ही साड्या, एक तिच्या आईला…रिमाला काळतच नाही, तिच्या आईने तिच्यासाठी एवढं केलं तरी तिला एक साधी साडी सुद्धा घेतली नाही हिने….मी बळजबरी घ्यायला लावली…” 
असं म्हणत लक्ष्मी परत दुकानात गेली, स्वतःसाठी एक साडी घेतली…आपल्या छोट्याश्या पाकिटातून पैसे भरले आणि बाहेर आली…
एवढ्याश्या पाकिटात इतके पैसे कसे मावताय हे रिमाला काळात नव्हतं…तिला काय माहीत ती साक्षात देवी लक्ष्मी होती ते…
छाया काकूंना आता गरगरायला झालं…लक्ष्मीचं अजून इथे राहणं त्यांना धोक्याचं वाटू लागलं…
लक्ष्मी आली, “काकू आता माझी जायची वेळ झाली, मला वाटतं रीमा ला मी बऱ्यापैकी शिकवलंय कसं वागायचं ते…मला निरोप द्या…”

“आई लक्ष्मी…देवी माते…. लक्ष्मी…लक्ष्मी…”
“आई उठा, काय झालं? कोण लक्ष्मी?? स्वप्न पाहताय का???”

रीमा छाया काकुला हलवून उठवत होती…
छाया काकूने डोळे उघडले… कॉट वर दुधाची पिशवी तशीच होती, रेडिओ चालूच होता…
हे सगळं स्वप्न होतं तर…???.हुश्श…
छाया काकु च परिवर्तन झालं होतं, त्या रिमाला आज बाहेर घेऊन गेल्या… जाताना तिला जीन्स घालायला लावली, बाहेरून चांगली चांगली पुस्तक आणून रिमाला वाचायला दिली, तिच्या स्वयंपाकाचे कौतुक केले..तिच्या आई वडिलांना जेवायला बोलावले…
रीमा थक्क झाली हे पाहून, आणि हा बदल बघून खुप आनंदली…
तिचे आई वडील आले, छाया काकूंनी तिला त्यांच्यासोबत गप्पा मारायला लावून आज स्वयंपाक मीच करणार म्हणुन गळ घातली..
जेवण झाले आणि छाया काकू रीमा च्या आईला म्हणाल्या..
“रिमाच्या रूपाने साक्षात लक्ष्मी आलीये हो आमच्या घरात..”
देवी लक्ष्मी हे सगळं पाहत होती, 
साक्षात देवी लक्ष्मी जरी सून म्हणून अवतरली तरी या सासवांचं समाधान होत नसतं हे पाहून लक्ष्मी ला हसू आवरलं नाही….

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत