सेकड इनिग 😊

Written by

लीनाला अचानक त्या मंदिरात भेटल्या. तीच ती प्रसन्न मुद्रा, चेहर्‍यावरून ओसंडून वाहणारा उत्साह. गर्दितुनच धावत जात लीनाने त्यांना हाक मारली,” कमल आजी ओळखलं का? मी लीना.” “हो गं ओळखलं”, आजी हसून म्हणाल्या. कमल आजी लीनाच्या जुन्या शेजारी. लीनाचं कुटुंब आधी ज्या चाळीत राहतं होतं त्याच्या शेजारीच हे वृद्ध जोडपं राहायचं. वय झालं असलं तरी मनाने तरुण असणारे दोघेजण. कमल आजीच्या दांडग्या उत्साहानं चाळीतल्या बायकाही नेहमी आनंदी असायच्या. एखादं माणूस असतं अस की त्याच्यासभोवती असण्यानेच मनाची मरगळ झटकली जाते. लीनालाही त्यांचा आधार वाटायचा. लीनाच्या नवर्‍याला प्रमोशन मिळालं. थोडे पैसे गाठीशी जमा झाले आणि त्यांचं कुटुंब फ्लॅटमध्ये राहायला गेलं. चाळ सोडल्याला सात- आठ वर्ष झाली. लीना तिच्या व्यापात मग्न झाली. एकुलता एक मुलगा, घर – संसार यात मागे वळुन पाहायला वेळच मिळाला नाही. इतक्या वर्षांनंतर ही अशी अनपेक्षित भेट.
आजींनी एव्हाना साठी पार केली होती. डोळ्यांना चष्मा लागला होता. केस जरा जास्तच पांढरे झाले होते.पण चेहर्‍यावरती थकल्याच्या खुणा कुठेच जाणवत नव्हत्या. दुसरीकडे लीना बैचेन, मनानं आणि शरीरानं थकल्यासारखी त्यांना वाटली. ” का गं,अशी खंगल्यासारखी वाटतेस, सगळं ठीक आहे ना?” त्यांनीच बोलायला सुरूवात केली.
“हो,तसं ठीकच म्हणायचं. रोहन इंजिनिअर झाला. मोठ्या कंपनीत नोकरीसुद्धा मिळाली. आता कामासाठी त्याला बेंगलोरला शिफ्ट व्हावं लागेल.” “बरं चाललंय की तुला कसली चिंता मग,” आश्चर्यचकित नजरेनं आजी म्हणाल्या. “तसं नाही आजी, त्याच्याशिवाय आम्हाला कोण आहे? तो तिकडे आम्ही इकडे. थोड्या दिवसांनी त्याचं लग्न होईल. तो त्याच्या संसारात बिझी होईल. तो म्हणतोय तुम्हीही या सोबत पण माझाच पाय निघत नाही इथून.”
” मुलांसाठी इतक्या खस्ता खायच्या आणि आयुष्याच्या संध्याकाळी मात्र!” पुढे ती काही बोलणार तोच त्या म्हणाल्या,”अगं वय कितीसं तुझं! तू शरीराने नव्हे मनानं वृद्धत्व ओढवून घेतलंयस. मुलांना त्यांचं भविष्य आहे. घेऊ दे ना त्यांना भरारी. ठरवू दे काय योग्य काय अयोग्य. ज्येष्ठांची सावली वृक्षासारखी असावी त्याचा तुरुंग बनता नये. तुला जो मोकळा वेळ मिळेल त्याचा आनंद घे. आयुष्यात जे वेळेअभावी राहून गेलंय असं वाटतं होतं ते आता करता येईल का बघ.”
लीनाला त्यांच्यापाशी मन मोकळं करून बरं वाटलं. त्यांचाही मुलगा अमेरिकेत गेला होता. तिथेच एका मराठी मुलीशी लग्नही केलं होतं. अधूनमधून येतो इकडे असं आजींकडून तिला कळलं. आजी सकाळ, संध्याकाळ बागेत फेरफटका मारायला जातात. जवळच्या महिला मंडळाच्या सदस्यही बनल्यात. मंडळाच्या उपक्रमात हिरीरीने सहभागी होतात. त्यांच्या लेखनाचा छंदही त्या जोपासतायत. वर्तमानपत्रात त्यांचं लेखनही छापून येत असतं. एकूणच काय आजी आयुष्याची सेकंड इनिंग एन्जॉय करत होत्या. त्यांचा निरोप घेताना लीनाला जाणवलं,आयुष्य माणसाला संधी देत असतं,नव्यानं जगण्यासाठी. या ‘सेकंड इनिंग’ चा मनमुराद आनंद घेता आला पाहिजे.
स्नेहा डोंगरे 😊😊😊

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.