सैतानी पेटी (Dybbuk Box) भाग २

Written by

रॉबर्टच्या घरापासून काही अंतरावर पीटर आणि त्याची पत्नी लिसा आपल्या दोन मुली रिहाना (१० वर्ष)आणि जुलिया (१४ वर्ष) सोबत राहत होते. पण रोज रोजच्या मतभेदांमुळे पीटर आणि लिसा विभक्त झाले होते. तसेच लिसा आता दुसऱ्या एका माणसाला डेट पण करत होती. हा घटस्फोट दोघांच्या आपसी संमतीने झाल्यामुळे प्रत्येक वीकएंडला मुलींची जबाबदारी पीटर वर असे.

आज वीकएंड असल्यामुळे सकाळी सकाळीच पीटर मुलींना त्याच्या घरी घेऊन जायला लिसाच्या प्रियकराच्या घरी आला. जिथे सध्या लिसा तिच्या दोन मुलींबरोबर राहत होती. मुलीही दर विकएंडला वडिलांबरोबर वेळ घालवण्यासाठी खूप उत्साहित असायच्या. तेवढ्यात पीटर तिथे आला.

पीटर, रिहाना आणि जुलिया तिघेही लिसाला निरोप देऊन पीटरच्या घरी जायला निघाले. ते तिघे घरी जात असताना वाटेत एका घरासमोर एक माणूस घरातील काही सामान विकताना त्यांना दिसला. ते सामान बऱ्यापैकी अँटिक (पुरातन) दिसत होते आणि ते सामान विकणारा दुसरा तिसरा कोणी नसून स्टेफनीचा मुलगा रॉबर्ट होता, जो त्याच्या आईच्या सांगण्यावरून तिने साठवलेल्या पुरातन वस्तू विकत होता.

पीटर आणि मुली त्या पुरातन वस्तू पाहण्यात गुंग झाले. इतक्यात पीटरची छोटी मुलगी रिहानाची नजर त्या पेटीवर पडली आणि तिने पीटरला ती पेटी विकत घेऊन देण्याचा हट्ट केला. पीटरनेही रिहानाच्या आनंदासाठी ती पेटी विकत घेतली. ही तीच पेटी होती ज्यामुळे स्टेफनीला गंभीर दुखापत झाली होती आणि त्यातून ती थोडक्यात वाचली होती.

रिहाना खूपच आनंदी झाली पण तितक्यात तिची नजर रोबर्टच्या घराच्या खिडकीत गेली. जिथे स्टेफनी भरपूर बँडेज लावून पहुडलेली तिला दिसली. जिच्यावर काही दिवसांपूर्वीच एका अज्ञात शक्तीने हल्ला केला होता. ती रिहानाकडे सारखी एकटक बघत होती, पण जेव्हा तिने रिहानाच्या हातात ती राक्षसी, भयानक पेटी बघितली. तेव्हा ती सगळा जीव एकवटून जोरात ‘नाही’ असे ओरडली. रिहाना तो सर्व प्रकार बघून खूपच घाबरली म्हणून पीटर रिहानाला तडक तिथून घेऊन घरी निघून गेला.

पीटर, रिहाना आणि जुलिया ती पेटी घेऊन घरी आले. रिहाना स्टेफनीच्या विचित्र वागण्यामुळे अजूनही थोडी घाबरलेली होती. इतके असूनही ती पेटी उघडून बघायची तिला खूप उत्सुकताही होती. पण जुलियाला त्या पेटित काहीच इंटरेस्ट नव्हता म्हणून ती स्वतःच्या रूममध्ये निघून गेली.

पीटर रिहानाचा मूड चांगला करण्यासाठी तिला ती पेटी उघडण्यास मदत करू लागला. पण काही केल्या ती पेटी उघडतच नव्हती. कारण त्या पेटीला उघडायला कोणतीही कडी किंवा बटण नव्हते. दोघांनाही हे थोडे विचित्र वाटलं. म्हणून मग पीटरने त्या पेटीला हलवले तेव्हा त्याला त्या पेटीमध्ये काहीतरी सामान असल्याची खात्री झाली.

तो रिहानाला म्हणाला की, “आपण नंतर ती पेटी उघडू. पण आता मला एक गुडन्यूज तुमच्या दोघींबरोबर share करायची आहे” असे बोलून त्याने दोघींना एकत्र बसवून त्याला त्याच्या नोकरीत प्रमोशन मिळाल्याची बातमी सांगितली. त्या दोघीही खुपच खुश झाल्या. त्यानंतर पीटर, रिहाना, जुलिया तिघांनीही दिवसभर खूपच मजा, मस्ती केली. त्यामुळे तात्पुरता त्या पेटीचा विषय बाजूला झाला.

रात्री डिनर आटपून पिटरने दोघींना त्यांच्या त्यांच्या रूममध्ये झोपवले आणि तो स्वतःच्या रूममध्ये झोपायला निघून गेला. दिवसभराच्या एन्जॉयमेंटमुळे रिहाना खूपच थकली होती म्हणून ती पडल्या पडल्या झोपली.

अचानक मध्यरात्री कसल्यातरी भयानक आवाजाने रिहानाची झोपमोड झाली. तिने लाइट्स चालू केले तेव्हा तिच्या लक्षात आलं की, हा आवाज त्या पेटीतून येत आहे. ती त्या पेटीजवळ गेली आणि तिने ती पेटी उचलली. ती पेटी रिहानाने हातात घेताच ती आपोआप उघडली गेली. रिहाना त्या पेटीतील वस्तूंकडे एकटक बघू लागली.

त्या पेटीमध्ये तिला एक दात, एक मेलेला कीटक, एक लाकडाचा प्राणी आणि एक अंगठी दिसली. ती अंगठी तिला इतकी आकर्षक वाटली की, तिने ती लगेच स्वतःच्या बोटात घातली आणि त्या पेटीला बंद करून कवटाळून ती झोपी गेली.

दुसऱ्या दिवसाच्या सकाळी जेव्हा रिहाना उठली, तेव्हा तिला स्वतःमध्ये काहीतरी विलक्षण असा बदल झाल्यासारखा वाटला. तिला सारखे सारखे एकटे राहावे असं काहीतरी वाटत होते. इतक्यात तिला पुन्हा रात्रीसारखे तेच विचित्र आणि भयानक असे आवाज त्या पेटीतून ऐकायला यायला लागले आणि त्याचबरोबर आश्चर्य म्हणजे आतापण ती पेटी आपोआपच उघडली गेली.
रिहाना सुध्दा वश झाल्यासारखी एकटक त्या पेटीकडे बघत होती. असेच बघता बघता तिच्या एका डोळ्याचे बुबुळ सफेद झाले. हे सर्व होत असतानाच, अचानक तिथे पीटर रिहानाला न्याहरी करायला बोलवायला आला, पीटरच्या त्या अनपेक्षित आवाजाने रिहानाची तंद्री भंग पावली, जणू काही क्षणापूर्वी काही घडलेच नाही अशाप्रकारे, रिहाना न्याहरी घेण्यासाठी पीटरबरोबर निघून गेली.

पण त्या दिवशी डायनिंग टेबलवर अनपेक्षित असं काहीतरी घडलं. रिहाना ताटातील न्याहरी खाता खाता काटेरी चमचा (fork) टेबलवर सारखी सारखी आपटत होती. हे बघून पीटर तिच्यावर ओरडला आणि तिला नीट खाण्यासाठी सांगू लागला तर रिहानाने त्याच चमच्याने अचानक पीटर वर हल्ला केला आणि त्याला जखमी केले.

पण काही क्षणातच तिला तिची चूक सुध्दा कळली आणि ती पीटरला, “माफ करा बाबा. चुकुन झालं, मी मुद्दामून नाही केलं, कृपया माफ करा” असे रडत बोलून विनवणी करू लागली. पण अचानक झालेल्या हल्ल्याने पीटरचा राग अनावर झाला. त्याने लागलीच रागातच रिहानाला तिच्या खोलीत जायला सांगितले. रिहाना रडत रडत धावतच तिच्या खोलीत गेली. पीटरला रिहानच्या अशा विचीत्र वागण्याचे आश्चर्य वाटत होते. पण रिहानाच्या अशा वागण्याचा त्याला राग ही आला होता. त्या दिवशी तिघेही घरातच राहिले.

त्याच रात्री पुन्हा एकदा ती पेटी आपोआप उघडली आणि ह्या वेळी त्या पेटीमधून खूप सारे उडणारे कीटक बाहेर पडले. तेवढ्यात रात्री दात घासण्यासाठी म्हणून जुलिया तिच्या खोली बाहेर जेव्हा आली, तर तिला पूर्ण घरात खूप सारे कीटक फिरताना दिसले. ती हे पाहून इतकी घाबरली की, ती जोरजोरात तिच्या वडिलांना म्हणजेच पीटरला हाक मारायला लागली. पीटर धावतच जुलियाच्या आवाजाच्या दिशेने आला. बघतो तर सगळ्या घरात खूप सारे कीटक उडत होते.
त्याला समजत नव्हते की, हे इतके सारे कीटक अचानक कुठून येत आहेत? इतक्यात त्याची नजर रिहानाच्या खोलीकडे गेली, तेव्हा त्याच्या लक्षात आले की, हे किटक तिच्या खोलीतूनच येत आहेत. त्याने लगेच तिच्या खोलीचा दरवाजा वाजवला पण काहीच प्रत्युत्तर आले नाही. मग मात्र त्याने जोरात दरवाजा ढकलला..आणि तो रिहानाच्या खोलीत गेला आणि पाहतो तर, रिहानाच्या हातात ती पेटी होती ती पण उघडलेली आणि त्याच पेटीतून ते हजारो कीटक बाहेर येत होते.त्याने लागलीच रिहानाला त्या पेटीपासून दूर केले आणि तिला त्या खोलीतून बाहेर काढले. हे सगळे खूपच अनपेक्षित आणि विचित्र होते.
तसेच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली की, रिहाना बरोबर काहीतरी वेगळचं घडत आहे आणि ते सामान्य नाही. कदाचित ह्याचं कारण ती पेटी?????

-क्रमश:

(कथा आवडल्यास प्रतिक्रिया जरूर देणे.. धन्यवाद ?)

©preetisawantdalvi

Article Categories:
भयपट

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा