सोस काही सुटेना……..!!!

Written by

अगदी कोणत्याही वयातल्या माणसांना कशाचा ना कशाचा तरी सोस असतोच नाही???

कोणाला कपड्यांचा, कोणाला दागिन्यांचा, कोणाला भांड्यांचा, कुठल्या कुठल्या वस्तूंचा, कोणाला हिंडण्या फिरण्याचा, कोणाला खाण्या पिण्याचा तर कोणाला सत्तेचा सोस!!

सोस असावा पण किती???

आता माझ्या परिचयातीलच एक काकू आहेत. वय पंच्याहत्तरच्या आसपास. मुलं बाळं सारी आपापल्या मार्गाला. काकू काका दोघेच राहतात घरात. तर या काकूंकडे एवढी भांडी आहेत की त्यात चार संसार उभे राहतील. पण तरी काकूंचा सोस काही संपत नाही. नुकतीच त्यांनी टिव्हीवरील “नापतोल” मधून ऑर्डर देऊन कढईचा नवीन सेट मागवला. मी गेले होते भेटायला तर कौतुकाने दाखवत होत्या मला. एकात एक सहा कढाया होत्या.

मी म्हटलं, अहो काकू कितीतरी भांडी आहेत तुमच्याकडे?? काय करणार एवढ्याचं?? आता ही नवीन कधी वापरणार???

वापरेन ग कधीतरी. आवडली म्हणून लगेच ऑर्डर केली. (काडीची गरज नसताना-इति मी मनातल्या मनात)

विशेष म्हणजे काकूंना स्वयंपाकाची अजिबात हौस नाही बरं का!!!

माझ्या एका मैत्रिणीची सासू पण अशीच. तिच्या वेळची हिंडालियमची, तांब्याची मोठी मोठी पातेली, भांडी अजूनही साठवून ठेवलीत, वापर नसतानाही. सुनेला मोडीत काही टाकून देत नाही, माळा अडवून ठेवलाय सगळा. कित्येक वर्ष अशीच पडून राहिलीयेत तरी टाकवत काही नाहीत सासूबाईंना.

तसंच आणखी एक ओळखीतल्याच बाई…..

साड्यांचा भयंकर सोस यांना……कपाटात, कपाटांच्या वर बॅगांमधे,बेडच्या आत स्टोरेजमधे सगळीकडे यांच्या साड्याच साड्या.

तरीसुद्धा कुठला सण आला, कुठे बाहेर गेल्या,किंवा कधी अशीच लहर आली म्हणून साड्या घेतच असतात. आहेत त्याच नेसायचा पत्ता नाही तरी खजिन्यात नवीन भर पडते आहेच.

बरं वापरात नसलेल्या यांना सोडवत पण नाहीत, असुदे कधीतरी नसेन म्हणून पडून ठेवतात अश्याच.

कोणा गरजूला द्या म्हंटलं तर म्हणतात, अगं किती तरी दान केल्या मी, तुला काय माहीत. अशा भारी भारी साड्या मी देऊन टाकल्यात कामवाल्यांना.

तरी घर एवढं भरलेलं साड्यांनी??? आपल्याला न लागणारी गोष्ट कुणाला देणं याला दान म्हणतात का??? पण बरेच जणांना न लागणाऱ्या गोष्टी दिल्यातरी मोठे दानी असल्याचा फिल येतो.

असाच एक माझा मित्र. त्याला मोबाईलचा भारी सोस. दर तीन चार महिन्यांनी तो मोबाईल बदलत असतो. कधी कधी तर एका वेळेस तीन तीन मोबाईल असतात त्याच्याकडे. प्रत्येकवेळेस ब्रॅन्डन्यूच घेतो आणि तीन महिन्यातच तोच निम्म्या किमतीत विकून परत एक नवीन घेतो.

गरज राहिली बाजूला सोसच जास्त!!!

काय म्हणायचं आता याला?? घेणारे गरज नसतानाही घे घे घेत राहतात, आणि गरज असणारे मात्र सध्या साध्या गोष्टींसाठी तरसत राहतात.

सोस असावा पण घेतलेल्या गोष्टी धूळ खात पडत राहतील, एवढा तर नसावा ना!!!

काय म्हणता???

©स्नेहल अखिला अन्वित

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत