स्त्रीजन्मा..

Written by

स्त्रीजन्मा…….

खेड्यामधल्या कौलारू घरात विठा, तिच्याहून दहा वर्षांनी लहान भाऊ उमेश व तिचे वडील रहायचे.
उमेशला जन्म दिल्यावर तीन महिन्यांत तिची आई देवाघरी जाते.
तान्हया उमेशची जबाबदारी ओघाने विठावर येते.
घरात अठरा विश्व दारिद्र्य.
वडील हातातोंडाची जुळवाजुळव करण्यात सदैव व्यस्त असत.

उमेशला पाय फुटले तशी विठाची जास्त त्रेधातिरपीट होऊ लागली.
काही खाली ठेवलं की उमू लगेच दुडूदुडू धावत येई व ती वस्तू तोंडात घाले.
फणी,पाऊचा डबा,भांडी सगळं तिला त्याच्यापासून दूर मांडणीवर ठेवावं लागे.

आत्ताशी तो विठाला वित्ता वित्ता करु लागला होता.
विठा उमूला टबमधे बसवून न्हाऊमाखू घाले.
त्याला पाऊ लावे.काजळाची तीठ लावे.
उमू फुर्र फुर्र करुन गाडी चालवे व लाळेने त्या मेकअपचा पार नकाशा करुन ठेवी.
छोटी विठा उमूला परसात कडेवर घेऊन फिरवत दूधभात भरवे. पिठी भात भरवे.

या धबडग्यात विठाचं शिक्षण वाया जाऊ नये असं तिच्या शाळेतल्या राणे सरांनी मनावर घेतलं.
राणे सर तिला दर शनिवार, रविवार दुपारी तीन तास
अभ्यास शिकवीत. या वेळात सरांची पत्नी छोट्या उमूला खेळवी.
दिवस फुलपाखरासारखे उडून जात होते.

उमेश आत्ता शाळेत जाऊ लागला होता.
उमेश विठाला विचारे,”ताई सगळ्यांची आई आहे.आपलीच का नाही?”
विठा म्हणे,”बरंका उमू ,आपली आईना अगदी सुगरण होती.
मऊसूत पुरणपोळ्या बनवे.खूप छान लाडू बनवे.
तिच्या आमटीला तर काय चव?
वरती बाप्पाच्या नाकात तो सुवास गेला.
त्याला आपल्या आईच्या हातचं जेवण खावसं वाटू लागलं.म्हणून एकदा अनंत चतुर्दशी
दिवशी बाप्पा घेऊन गेला आपल्या आईला त्याच्याबरोबर.”

उमेश म्हणू लागला, “ताई, मी आत्ता गणपती बाप्पाला सांगतोच.तुझी तु सोय बघ.नाहीतरी मोठा आहेस.स्वत: स्वैंपाक करायला शीक, माझ्या ताईसारखा पण मला माझी आई परत दे म्हणजे देच.”
विठा त्याला अंगाई गाऊन झोपवते.

विठाई दहावी पास होते.
पुढच्या शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी जावं लागे.
ते विठाच्या आवाक्याबाहेरचं होतं.
वेळ व पैसा दोघांचीही टंचाई होती.

विठा टेलरिंगचा कोर्स करते.
राणे सर त्यांच्या घरातली त्यांच्या सासरी गेलेल्या मुलीची
शिलाई मशीन,कातर,सुईधागा विठाला आणून
देतात.
आजूबाजूच्या बायका विठाला आपले ब्लाऊज, मुलींचे फ्राक शिवायला देऊ लागतात.
विठाच्या शिवणकामात कमालीची सफाई होती.
ब्लाऊज तर अंगाला असा बसे की बघतचं रहावे.
एखाद्या निष्णात टेलरला तोंडात बोटं घालायला लावेल
असं तिचं शिवणकाम.

विठाच्या वडिलांना तंबाखू खायची सवय असते.
विठा त्यांना हरतर्हेने तंबाखू किती अपायकारक आहे हे समजावून सांगे पण तंबाखू गालाच्या खाचीत भरल्याशिवाय त्यांचं कामच होत नसे.
शेवटी त्यांना तोंडाचा कर्करोग होतो.
त्यात ते वर्षभरात दगावतात.
जाताना विठाला सांगून जातात,”विठाई , माझे बाई मला माफ कर.मी तुला सुख देऊ शकलो नाही.”
पित्रुशोकातून विठाई हळूहळू सावरते.

राणे सर एक गरीब होतकरु मुलगा बघून त्याच्याशी विठाचं वैदिक पद्धतीनं लग्न लावून देतात.
ताई सासरी जाताना उमेश ओक्साबोक्शी रडतो.
राणे सर त्याला कसं तरी गप्प करतात.
त्याच्या ताईने त्याला स्वैंपाककला शिकवली असल्याने
त्याचा स्वैंपाक तो घरीच बनवी.
पण तोंडात घास घालताना त्याला त्याच्या ताईची आठवण येई कारण विठा त्याला नेहमी पहिला घास भरवायची.
उमेश शिक्षक म्हणून नोकरीला लागतो.
मुलांना जीव ओतून शिकवतो.

विठाच्या संसारवेलीवर एक कळी उमलते.
तिचं नाव अवनी ठेवतात.
वर्ष होतं तरी अवनीत काही सुधारणा दिसत नाही.
उमेश त्या दोघींना मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जातो.
अवनी मतीमंद आहे तेही तीव्र मतीमंद असं डॉक्टर
सांगतात.
हा धक्का अवनीच्या वडिलांना सहन होत नाही. त्यांच्या डोक्यावर परिणाम होतो.
असंबंध बोलू लागतात,उगीचच हवेत हातवारे करतात
व एका दिवशी घरातून निघून जातात.
उमेश खूप शोध घेतो , पण ते कुठे सापडत नाहीत.

विठा अवनीला घेऊन भावाकडे रहायला येते.
पाच सहा वर्षे होतात तरी अवनीत तिळमात्रही फरक पडत नाही.
ती एका जिवंत गोळ्यासारखी असते. तिला उठून उभं रहाताही येत नाही.
फक्त तोंड उघडून आय आय असा काहीसा आवाज काढी.मग विठा समजे हिला भूक लागली.
मग ती अवनीला जेवण भरवी.
तिला न्हाऊमाखू घाले.अवनी फक्त हसत राही.
तिचे ते हसण्याचे चित्कार ऐकले की वाटेतून जाणार्या माणसांच्या काळजाला चिरा पडत .

यथावकाश उमेशचे लग्न झाले.
उमेशची बायको मायाही गुणी होती.
ती विठाला, अवनीला अंघोळ घालताना,कपडे घालताना
मदत करे.
विठा कपडे शिवत असताना माया अवनीची काळजी घेई.

मायाला एकापाठोपाठ एक दोन मुलगे झाले.
शरद व वरद अशी त्यांची नावं ठेवली.
पण सगळी त्यांना चंगु मंगु म्हणत.
चंगु व मंगु अवनी ताईशी खेळत.
अवनीला नीट दिसतही नसे.
चंगुमंगु आत्तेला फार मदत करीत.
पण अवनी जसजशी मोठी होऊ लागली तशी विचित्र वागू लागली.
विठा जरा बाहेर गेली की ती मोठ्यामोठ्याने गुरासारखी ओरडे.
जमतील ते अंगावरचे कपडेही काढून टाकी.
लोक त्यांच्या घरी यायला टाळाटाळ करु लागले.

शेवटी विठाने दादा वहिनीला, चंगुमंगुला कसेबसे
समजावले व बाजूलाच एक खोली भाड्याने घेऊन ती राहू लागली.
एका रात्री उनउन भाकर्या करताना विठाला लक्षात आले की तिची अवनी वयात आली.
ती नवर्याचा फोटो हातात घेऊन बादलीभर रडली.
आत्ता या मुलीला मी सांभाळू कशी ?असा प्रश्न ती फोटोतल्या नवर्याला विचारते.
पण ती रात्रच,मग ती निश्चय करते आत्ता असं रडून चालणार नाही.
आत्ता तर अजून खंबीर बनलं पाहिजे.
मायाही अधनामधना विठाला अवनीची आवराआवर करायला मदत करते.

विठा आता म्हातारी झाली आहे.
पाठीला पोक आलंय.
तोंडातल्या दातांनी रामराम ठोकला आहे.
अवनीची चाळीशी होऊन गेली आहे.
सकाळी उठून विठा तिची शीशू काढते.
गरम पाण्याने तिला न्हाऊ घालते.
कपडे घालते.
जेवण,खाऊ भरवते.
त्या चार दिवसात तिची सगळी उत्सवार करते.
यात विठाला देवाने आधी नेलं तर अवनीचा भयाण प्रश्न आहे.
वहिनी कितीही चांगली असली तरी एवढी मोठी
जबाबदारी विठा तिच्या अंगावर टाकणार नाही.

विठा रोज तिच्या गुरुंचा अध्याय वाचते
व प्रार्थना करते की माझ्याआधी माझ्या अवनीचे
डोळे मिटूदे.
अवनी मात्र मोठमोठ्याने हसत असते.
त्या टिचभर अंधार्या खोलीत अवनीचा तो भेसूर आवाज
अधिकच भयाण वाटत आहे.😢😢

तळटीप : ही एक सत्यकथा आहे.अवनी व तिच्या आईचं आयुष्य असचं चालू आहे.म्हणून सुखांत दिलेला नाही.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा