‘स्नेहाचा सण मकरसंक्रांत’

Written by

स्त्रियांच्या आनंदाला उधाण आणणारा सण म्हणजे मकरसंक्रांत .या संक्रातीच्या सणाची तयारी त्या पंधरा दिवस अगोदरपासूनच करायला लागतात . या सणासाठी पूर्ण घराची स्वच्छता करून घेतात, अन् लगबग सुरू होते नवीन लग्न झालेल्या सुवासिनींच्या ववशाची (वसा)तयारीची .       

 वेगवेगळे गोडाधोडाचे पदार्थ तयार होतात . नवीन साडी खरेदी केली जाते . हात भरून हिरव्यागार बांगड्यांचा चुडा लेऊन त्या संक्रांतीच्या स्वागतासाठी तयारी करतात . हा सण तीन दिवसांचा असतो भोगी, संक्रांत आणि किंक्रांत .भोगी हा संक्रांतीचा आदला दिवस त्या दिवशी शेतात आलेल्या सगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्यात तीळ घालून भोगीची भाजी बनवतात. ज्वारी बाजरीची भाकरी तीळ लावलेली, कारेळा कूट घालून केलेली घेवड्याची भाजी, चाकवताची भाजी, खिचडी, मसालेभात पुलाव अशा पदार्थांचा भोग म्हणजे नैवेद्य देवाला दाखवतात .

         दुसरा दिवस असतो संक्रातीचा हा महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी पुरणपोळी गूळपोळी, तीळ पोळी अशा पक्वानांचा नैवेद्य असतो. सुगडाची पूजा करतात व त्या सुगडात ऊस, हरभरा गव्हाच्या लोंबी भूईमुगाच्या शेंगा, मटार, घेवडा, पावटा, तीळगूळ असं टाकून त्यांना वाहून त्यांची पूजा करतात या सगळ्या भाज्या हिवाळी मोसमात मिळणाऱ्या असतात. एक प्रकारे ही निसर्ग देवतेची अन्नपुर्णेची, लक्ष्मीची पूजा असते .विड्याच्या पानावर वसा मांडून तो ओटीत घेतला जातो. 

‌ सुवासिनी स्त्रिया या दिवशी खूप आनंदी असतात. विशेषत: नवीन लग्न झालेल्या मुलींचा हा पहिला संक्रात सण असतो त्या नवेलेपण मिरवत असतात अन् सुगड घेऊन मंदिरात सगळ्याजणी मिळून जातात, उखाणे घेतात, एकमेकींना भेटतात, हळदीकुंकु लावतात. या निमित्ताने त्या एकमेकींना भेटून गुजगोष्टी करून एक प्रकारे आनंद साजरा करतात. भांगात गुलाल, कपाळावर ठसठसित हळदीकुंकू दागिने लेऊन, नाकात नथ घालून, साज श्रृंगार करुन आपल्या सौभाग्य रक्षणासाठी आणि सौभाग्यवर्धनासाठी देवाकडे त्या सुखी संसाराचे मागणे मागतात .

‌ तिसरा दिवस असतो किंक्रातीचा. या दिवशी मांसाहाराचे जेवण असते. चिकन वडे , मटन भाकरी असा फक्कड बेत असतो. या दिवशी शुभ कार्य वर्ज असते, कारण हा करी दिन असतो .

‌ संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत स्त्रिया हळदी कुंकू करत असतात. छोट्या मुलांना बोरन्हान घालतात. सुर्याने मकर राशित प्रवेश केलेला असतो,उत्तरायणाला सुरवात झालेली असते,म्हणून सज्ज होतात सूर्य नारायणाच्या पूजेला.

‌ आपले प्रत्येक सण हे आयुर्वेदिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. या सणा मागे पण आयुर्वेदिक दृष्टिकोन आहे. हा थंडीचा महिना असतो व थंडीच्या दिवसात खूप भूक लागते शरीराला उष्णतेची गरज असते आणि ती उष्णता बाजरीची भाकरी व तिळातून मिळते. सगळ्या प्रकारच्या भाज्या आहारात आल्यामुळे शरीराला आवश्यक पौष्टिक सत्त्व ही मिळते. असे म्हणतात भोगीची भाजी खाल्ली की वर्षभर शरीराला पुरेल एवढी पोषक तत्व मिळतात.

‌ शेतकऱ्यांच्या शेतातलं पीक ही ऐन बहरात आलेले असते. शेतकरी राजा सुखावलेला असतो. आणि हा आनंदाचा,स्नेहाचा सण साजरा करतात सगळेजण मिळून, स्रीया पुरुष, मुले मुली एकमेकांना तिळगुळ देत. तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणत, स्नेह, प्रेम,गोडी, आनंद वाटत फिरतात.

‌ या आनंद देण्याच्या आणि आनंद घेण्याच्या या गोड सणासाठी माझ्याकडून सर्वांना खुप खुप शुभेच्छा.

‌ माझा तीळ सांडू नका माझ्याशी भांडू नका……😊

‌ तिळगुळ घ्या गोड गोड बोला……☺️

‌       

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.