#स्पर्धा,….दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती

Written by

समाधानाचे फुगे,…
©स्वप्ना मुळे(मायी)
घरभर झालेला पसारा आवरताना तिचं नेहमीसारखं बडबड करणं सुरूच होतं,… नुसती तणतण सगळा जीव त्या स्वच्छतेत अडकलेला,… पोरं, नवरा कंटाळून जायचे हिच्या ह्या वागण्याला,…त्या स्वच्छतेच्या पायी सगळ्यांना गरम खाणं पिणं देणं म्हणजे कटकट वाटायची तिला,… एकदाच सगळा स्वयंपाक धोपटून ती नुसती ह्या निर्जीव गोष्टीत अडकायची सासुबाई नेहमी म्हणायच्या अग कामापूरती स्वछता महत्वाची आहे पण त्याही पेक्षा अन्नपूर्णेसारखं गरम ताज अन्न खाऊ घालावं ग लेकरांना नवऱ्याला,…इतका दमून भागून येतो तो आणि तू त्याला सकाळी सातला केलेल्या पोळ्या वाढते,…ह्यावर तिच वाद घालत बसणं,..मग दोन दिवस अबोला,…ह्या सगळ्या गोष्टींना तो कंटाळून गेला होता आणि सासूबाईंच्या लक्षात आलं होतं,…समजवण्यात आणि वाद घालण्यात काही अर्थ नाही,…बऱ्याच बायकांना फक्त घरदार टापटीप ठेवण्यात फार इंटरेस्ट असतो,,…आणि त्या पुढे स्वयंपाक हे कंटाळवाण काम,…खरंतर माणसाची सगळी धावपळ पोटासाठी,…सकस,ताज अन्न मिळालं तर मनही छान प्रसन्न आणि शरीरही पण हिला ऐकायचं नाही तर बोलून काय उपयोग म्हणून त्या त्यांच्या परीने करायच्या आणि बाकी सोडून द्यायच्या,…
पण ह्या दोन दिवसात काय घडलं होतं कुणास ठाऊक,…दोन्ही वेळेस गरम अन्न बनत होतं घरात,…आवश्यक स्वछता होत होती,…त्यामुळे तिचीही ओढाताण होत नव्हती आणि दोन्ही वेळेस छान ताज अन्न मिळाल्याने सगळेच तृप्त होत होते,…शेवटी आज त्याने जरा वेळ काढून विचारलंच तिला,… काय मॅडम आम्ही एवढं समजावत राहिलो तरी नाही लक्षात आलं,…आणि आता कोण गुरू मिळाला हा बदल घडवायला,…ती हसली आणि म्हणाली,…तसंच समज गुरुच मिळाला,…परवा दिवाळीच उरलेलं फराळाच देऊन टाकावं म्हणून मी रस्त्यापलीकडे फुटपाथवर ती प्लास्टिकचा आडोसा केलेली झोपडी आहे ना तिथे गेले होते,…तिथलं दृश्य पाहून तर मन नतमस्तक झाल माझं,…अरे ती बाई कमरेपासून अधू आहे,…त्या माणसाला एक पाय नाही,…तो फुगे विकतो,…तो निघण्याच्या घाईत तर ती बाई त्याला गरम भाकरी करून वाढत होती,…दोघांच्या चेहऱ्यावर कुठलाच त्रागा नाही,…ती खरडत खरडत सगळं काम करत होती,…झोपडी अगदी प्रसन्न,… त्याची ती अपंगांची सायकल त्याला फुगे फुगवून लावलेले,…पलीकडे एक पोरगा फुगे फुगवत होता त्याला म्हणाली,”गरम गरम खाऊन घे मग दिवस भर काही नाही खाल्लं तरी चालत,..”त्यालाही गरम भाकरी वाढली,…मी बघत होते सगळं तेवढ्यात माझ्याकडे लक्ष गेलं,…पटकन आली खरडत बाहेर,…मी उरलेलं फराळाचे दिल तर म्हणाली,…बाई तुम्ही दिलंत पण आता हे खाण्याजोग नाही खुप शिळ झालंय पण माझ्या कामाच आहे,…तो मागचा ड्रम आहे ना त्यात टाकते म्हणजे आम्हाला गॅस मिळतो त्यातून,… लै बायका शिळं आणून देतात,…पण बाई दोन वेळच गरम खाण्याएवढ कमावतो आणि देवाने पाय नाही दिले तरी हात आहेत ना लेकराला आणि नवऱ्याला गरम खाऊ घालते,… बुद्धीचे,मनाचे मार्ग शेवटी पोटातून तर जातात ना,…पण बाई, बायकांनी दिलेलं अन्न फेकत नाही मी,…पोरानं शिकुन मास्तरशी डोकं लावून तो बायोगॅस बनविलाय,… शिळ्या अन्नावर,खरकट्यावर चालतोय तो,… थोडा खर्च लागला पण व्हते काही मनी सोन्याचे मग म्हंटल सोन्यासारखा जोडीदार आहे ना,..मग मोडून करूच बायोगॅस,… माझी चुलीची कटकट गेली आणि मला गॅस मिळाला,…चला येऊ का,…ह्यांना फुगे विकायला जायचंय,… ती खरडत परत झोपडीत गेली आणि मला प्रकर्षाने जाणवलं,…किती ते समाधान तिच्या वागण्यात ,….गरिब म्हणून मिळणाऱ्या शिळ्या अन्नाचा वापर करण्यासाठी असलेली ती कल्पकता,…आणि मुख्य म्हणजे आपल्या घरच्यांना गरम अन्नच खाऊ घालण्याची तयारी देखील अपंगत्व असून आणि आपण मात्र धडधाकट असुन फक्त निर्जीव वस्तुत गुंतलेलो,…कंटाळा येतो म्हणून सकाळीच थापलेली पोळ्याची चळत आली डोळ्यापुढे,…तुमचे जेवताना वैतागलेले चेहरे आले समोर,…आणि मग ठरवलं मनाने,…दोन्ही वेळेस गरम जेवण बनवायचं कुटुंबियांसाठी,…त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला थँक्स,…ती म्हणाली,” असं नाही मला बायोगॅस बनवायला मदत करा,…मगच “.तो हसला म्हणाला नक्कीच फक्त त्यात टाकायला परत शिळं अन्न स्पेशली करू नकोस,…ती म्हणाली छे,… ओला कचरा माझ्या डस्टबिनला टाका असं सांगितलं आहे मी अपार्टमेंट मध्ये,..
आपला श्वास फुग्यात भरून विकणाऱ्या कुटुंबियांसाठी त्याचे हात मनोमन जुळून आले,…शिक्षणाचा अभाव असून,पैसा नसुन,… समाधानाच्या आणि कल्पकतेच्या जगण्यालाच तो नतमस्तक झाला….
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा