स्पर्शाची परिभाषा.

Written by

स्पर्शाची परिभाषा..

‘छुकर मेरे मन को किया तुने क्या इशारा’.. रेडिओवर लागलेलं हिंदी गाणं कानावर पडल. सुरेख गीत.. मनाला स्पर्शून गेलं. एक विचार मनात आला. काय जादू आहे नाही या स्पर्शात!!!
जे काम शब्द करू नाही शकत ते स्पर्श करते. किती ताकत आहे ना या स्पर्शाच्या भाषेत..

मूल जन्माला येत तेंव्हा त्याला काही कळत नसत. कोणाशी ओळख नसते पण ते आपल्या आईला बरोबर ओळखत,ते तिचा मायेचा स्पर्श अचूक ओळखते. मग त्याला उमजत जातं निरनिराळ्या नात्याच्या स्पर्शाची परिभाषा. ते बाबांचं प्रेमाने जवळ घेणं, दादाचा प्रेमाचा फटका, ताई सोबतची मस्ती, मैत्रिणीने मारलेली आनंदाने मिठी, आपल्या शिक्षकांनी ‘शाब्बास’ म्हणून पाठीवर मारलेली थाप, अडचणीत मित्राने ‘मी आहे ना’ या अर्थाचा खांद्यावर ठेवलेला हाथ.प्रियकराने हाती घेतलेला हात.. तो नाजूक मोहरणारा स्पर्श, किती प्रकार.. जीवन समृद्ध करणारे..न बोलताही भावना पोहचवणारे..

या बाबतीत निसर्गही काही कमी नाही बरं!! समुद्र किनारी चालताना पायांना होणारा तो लाटेचा अवखळ स्पर्श,पाण्याचे उडणारे तुषार अंगभर पसरताना होणारा स्पर्श, पहिल्या पावसाचा स्पर्श, मातीचा तो मोहित करणारा गंध, अंगावर रोमांच उभे करणारा अल्लड वाऱ्याचा स्पर्श, सगळं कसं आनंदोत्सव जणू💐💐

आठवतं मला माझी माई (आजी) मला जवळ घ्यायची न खूप छान वाटायचं. प्रेमानं चेहऱ्यावरून हात फिरवायची. ती मायेची ऊब हवीहवीशी वाटायची. अजूनही तो तिचा मायेनं फिरलेला हात आठवतो. डोळ्यात पाणी तरळुन जात. आमच्या घरातली मनीमाऊ हात लावली की पायाशी घुटमळायची. आणि मोती तर आमच्या घरातल्या माणसांशीवाय कोणाला हात लावू द्यायचा नाही लगेच भुंकायचा. कसं कळायचं कोण जाणे त्या मुक्या जनावरांना!!! लाजाळू च्या पानांना स्पर्श केला की लगेच पान मिटुन घ्यायचं.काय किमया होती नाही त्या प्रेमळ स्पर्शात!!!

हल्ली मात्र या स्पर्श सुखाच्या अनुभूतीला पारखे झाल्यासारखं वाटतं. नवविवाहित जोडप्यांमधला तो हळुवार स्पर्शाचा संवाद लोप पावत चाललाय जणु. प्रियकराच्या त्या नाजूक स्पर्शाने मोहरून जाणं, पाहिलं चुंबन, पहिली आश्वासक मीठी, हळूहळू नात फुलत जाणं, हल्ली दुर्लभच. तें स्पर्श कुठेतरी आधुनिकीकरणाच्या नावाखाली हरवून गेलेत.

मनात येत जशी आपल्याला स्पर्शाची गरज वाटते तशी सगळ्यांनाच वाटते का?? आपल्या आई-बाबाना, आजी आजोबांना ही हवाहवासा वाटत असेल का हो मुलांचा प्रेमळ स्पर्श?? जस मला माईने प्रेमाने जवळ घेणं आवडायचं तिलाही वाटत असेल का? ‘आपलं माणूस’ चित्रपटातला एक संवाद आठवला’ नाना पाटेकर मुलाला विचारतात शेवटचा कधी रे शिवला होता म्हाताऱ्याला?? अंगावर शहारा आला.
स्पर्श इतका महत्त्वाचा?

माझा मित्र महिन्या दोन महिन्यात एकदा तरी वृध्दाश्रमात जाऊन येतो. सगळे त्याची आतुरतेने वाट पाहत असतात. 90 वर्षाची त्याची गर्लफ्रेंड चक्क रुसते त्याच्यावर !!!!. बोलत नाही आजिबात.नाक फुगवून बसणार.. मग हा गोड गुलाबजाम भरवून तिचा रुसवा काढणार.. आढेवेढे घेत तिचा रुसवा जाणार.. 😊😊 तिथे गेल्यावर त्याला कळतं या स्पर्शाची किमया.. मुलांनी कंटाळुन त्यांना तिथे सोडून गेलेल्या आजी आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी तो आवर्जून जातो. खूप आनंद मिळतो त्याला. ‘आपण हवे आहोत कोणालातरी’ हे फीलिंग च त्यांना जगण्याचं बळ देते. तो त्याचा स्पर्श त्यांना तुम्ही हवे आहात याची जाणीव करून देतो ना तेंव्हा त्यांच रूप पाहण्यासारखं😊😊

तुम्ही कधी आईचा हात हाती घेऊन पाहिला का ओ? तिचा स्पर्शाने कळेल तुम्हाला तिला काय म्हणायचं ते.? स्पर्शानेच विचारा काय दुखतंय का आई?? डोळ्यातलं पाणी सांगून जाईल तुमच्या शिवाय तीच जग नाहीच मुळी!! एकटे बसलेल्या बाबाना जवळ घेऊन विचारा कसे आहात.आजीच्या कुशीत विसावून बघा तिला किती आनंद होतोय. आजोबांना बागेत फिरायला घेऊन जाऊन पहा किती खुश होतात ते.. अगदी राजे झाल्याचा फील येईल त्यांना😊😊

इतके वर्षे ते आपले पालक होते. आपल्याला काय हवं नको ते पाहिलं, अगदी शी-शु पासून सगळं केलं. आपलं बालपण त्यांनी एन्जॉय केल. त्यांचा प्रत्येक स्पर्श आपण अनुभवलाय.
आता आपण ही होऊया ना त्यांचे पालक. करूया ना एन्जॉय त्यांचं बालपण.जगुया ना एक कर्तव्यदक्ष पालक बनून.
जाणवून देऊया ना त्यांना तीच स्पर्शाची परिभाषा.
समजून घेऊया ना प्रेमाची परिभाषा.. 😘😘

Article Categories:
प्रेम

Comments are closed.