स्पेस नवरा बायकोची

Written by

मी आणि माझ्या मिस्टरांनी वीकेंड मस्त घालवला होता, दर आठवड्याला कुठेतरी बाहेर जायचं, फोटो काढायचे, रोज सकाळी, संध्याकाळी एकत्र वेळ घालवायचा आणि गप्पा मारायच्या,रात्री एकत्र शतपावली ला जायचं, कधी त्यांनी स्वयंपाक करायचा कधी मी…अगदी समाधानी आयुष्य जगत असताना मी विचार केला की सगळ्यांनाच असं आयुष्य मिळत असेल का? माझ्या ओळखीतल्या अनेक मुलींची आयुष्य माझ्या डोळ्यासमोरून गेली…

त्यांच्याकडून ज्या ज्या गोष्टी ऐकल्या त्या अगदी थक्क करणाऱ्या होत्या… विचार करण्यासारखी गोष्ट आहे, मुलगी लग्न करून घरात येते ती आधी तिच्या नवऱ्याची बायको असते..मग कोणाची तरी सून, वहिनी असते… तिला तिची आणि तिच्या नवऱ्याची स्पेस हवी असते, एक एकांत हवा असतो, संबंधासाठी केवळ रात्रीचा एकांत नको तर एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी, एकमेकाला जास्त समजून घेण्यासाठी, एकमेकांचे विचार समजून घेण्यासाठी…मिळतो का प्रत्येकाला? सुषमा, तिच्या सासरी एकरूप होऊन गेलेली, सासू सासरे नणंद दीर .. सगळ्यांना आपलं मानून त्यांच्यासाठी वाहून घेतलं..

खरं तर दुःख करत बसण्यासारखं काही कारणही नव्हतं,पण वरचेवर ती सतत दुःखी दिसायची, भेटायची तेव्हा डोळ्याच्या कडा ओलसर दिसायच्या आणि डोळेही सुजलेले दिसायचे, ती आधी सारखी दिसत नव्हती, तिचा वेषही गबाळ्यासारखा, वैतागून काहीतरी चढवलेला वाटायचा… तिच्याशी जेव्हा बोलले तेव्हा लक्षात आलं की तिचा तिच्या नवऱ्याशी संवादच होत नव्हता… नवरा कुठे जातोय, केव्हा येतोय, त्याचे काय काम चालले आहे तिला कसलाच पत्ता नसायचा… तिचा नवरा, घरी आल्यानंतर घरात भरपूर वेळ देत असे, आई वडील बहिणीशी गप्पा मारी, सुषमा तिथेच असे पण ऐकण्यापालिकडे तिला काही येत नव्हतं, कारण सगळ्यांसमोर काय गप्पा मारणार आणि विषय तरी काय हवा गप्पांना?

ती फक्त ऐकत असे, तिला नवऱ्याला सांगायचं असायचं की “आज पाणीपुरी खायची ईच्छा झालीये, चला जाऊया ना आपण…मी नवीन साडी घातलीय, कशी दिसते मी?? तुम्हाला मला काहितरो सांगायचंय, काल ना तुम्ही खूप छान दिसत होतात त्या निळ्या शर्ट मध्ये, मला अंगणात एक बाग तयार करायचीय, मदत कराल मला?? बाहेर पाऊस पडतोय, चला ना मनसोक्त भिजूया आपण…”

अशा कितीतरी गोष्टी मनाशी ठरवून त्याला सांगू…असा विचार ती करायची… रात्री जेवणं उरकली, सगळं आवरून झालं, सुषमा बेड मध्ये गेली, हे आले की सगळं सांगेन यांना… नवरा जेवण झालं तरी रात्री उशिरा पर्यंत घरच्यांसोबतच बोलत बसायचा…घरच्यांनाही आपला मुलगा किती मातृ पितृ भक्त आहे याचा अभिमान वाटायचा… मग त्याने बायकोसाठी सुद्धा वेळ द्यावा हे त्याला सांगणं दूरच…
मग रात्री तो शतपावली साठी निघत असे, निदान ही वेळ तरी मिळेल म्हणून ती सोबत जायला निघायची आणि मग तो त्याचा आई वडिलांना आग्रह करून करून सोबत घेई, मग काय, परत माय लेकाच्या गप्पा, ही त्यात भाग घ्यायला जाई तर तिच्याकडे दुर्लक्ष…. रात्री उशिरा पर्यंत ती वाट बघे, किती वेळ झाला तरी हा आला नाही म्हणून ती पाहायला गेली तर तो आई वडीलांसोबतच हॉल मध्ये गप्पा मारत झोपी गेलेला…

म्हणूनच अशा कित्येक गोष्टी त्याला सांगायच्या राहून गेल्या, आणि आपल्याला आपल्या जिवाभावाचा नवरा आहे हे ती जणू विसरून पूर्णपणे एकटी पडत गेली.. कुठे बाहेर जायचं ठरलं की तिचे सासू सासरे नणंद आणि दीर आधी तयार होऊन बसतील, नवरा बायको बाहेर जाताय, त्यांना खासगी आयुष्य जगू द्यावं हा विचार ती माणसं करत नसत… बरं कधी त्यांना दुसरी कामं असतील, त्यांनी यायला नकार दिला तर तिचा नवरा आग्रह करून करून सोबत यायला भागच पाडी… एके दिवशी तिने नवऱ्याला या बद्दल सांगितलं, “मग तुला घरच्यांसमोर बोलता येत नाही का, की ते खटकतात तुला?

तू काय घरापासून वेगळी आहेस का? तुसुद्धा या कुटुंबतलीच आहेस ना? ” शेवटी तिने विषय सोडून दिला… मनात विचार आला… नवरा बायकोला एकमेकांशी जे शेयर करायचं असतं, ज्या गप्पा मारायच्या असतात त्या आई वडीलांसमोर कशा करता येतील?? आई वडिलांना वेळ द्यावाच पण सोबतच बायकोलाही तिचा हक्काचा एकांत वेळ हवाच की, की शारीरिक संबंधांसाठी रात्री काही खासगी क्षण फक्त द्यायचे??त्या पलीकडेही नातं फुलू द्या की….हे घरातल्या व्यक्तींना आणि नवऱ्या मुलालाही समजायला हवं, ह्या गोष्टी कोणी बाहेरची व्यक्ती सांगणार नाही

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा