#स्वप्न_एक_रहस्यकथा #भाग_तिसरा_अंतिम

Written by

बाबांच्या मागोमाग गौरी आणि नैना लॅबोरेटरी मधून बाहेर आल्या. तिघेही लायब्ररी जवळ एका टेबलाभोवती बसले. बाबांनी गौरीला एक पेपर आणि एक पेन्सिल दिली आणि म्हणाले, “गौरी, तुम्हाला जे चिन्ह आता स्वप्नात दिसले ना ते या कागदावर काढण्याचा प्रयत्न करा. डोळे घट्ट मिटून एकाग्रतेने ते चिन्ह आठवून बघा.”

गौरीने पेन्सिल हातात घेतली आणि स्वप्नात बघितलेले ते पत्राच्या बोर्ड वरचे चिन्ह आठवू लागली. बराच वेळ प्रयत्न केल्यावर तिला ते चिन्ह तुटक तुटक आठवले आणि तिने ते कागदावर काढण्याचा प्रयत्न केला.

ते चिन्ह काहीतरी वेगळ्याच भाषेत लिहीलेले नाव आहे असा अंदाज बाबांना आला.

बाबा – “शाब्बास गौरी..आता आपण या चिन्हाचा अर्थ लागतो का बघूया..”

बाबांनी लॅपटॉप सुरू करत गौरीने रेखाटलेल्या चिन्हाचा फोटो काढून गूगल वर टाकला. काही संदर्भ मिळतोय का हे बघण्याचा प्रयत्न ते करत होते.
गौरी आणि नैना शांतपणे सगळं बघत होत्या पण मनात वेगळीच धाकधूक सुरू होती. लॅपटॉप वर जरा वेळ शोधाशोध केल्यावर बाबा म्हणाले, “चिन्हाचा अर्थ सापडला..हे चिन्ह नसून या बोर्डवर कन्नड मध्ये ‘ कुक्के ‘ असं लिहीलं आहे ‌. हे एका गावाचे नाव आहे आणि महत्वाचं म्हणजे या गावानजीक जंगल सुद्धा आहे. ”

बाबांनी गौरीला त्या गावाच्या परीसरातील काही फोटो  दाखवले त्यात काही फोटोतील जागा गौरीला कधीतरी बघितल्या सारखी वाटत होती. लॅपटॉप वर  ते सगळं बघताना गौरीला अचानक गरगरायला लागले. कधी तरी मी या परीसरात गेलेली आहे असं सारखं तिला वाटायला लागलं. नैना ने तिला पाणी दिले, जरा शांत केले.

बाबा – “गौरी, तुम्ही या परीसरात कधी गेल्या आहात का?”

गौरी – “नाही.. लहानपणापासून या भागात तर मी कधीच गेली नाही पण मला सारखं वाटतयं की हा परिसर मी कधी तरी बघितला आहे. हे जंगल तर तेच वाटते आहे जे मी स्वप्नात अनुभवलं..”

बाबा – “गौरी, घाबरू नका पण मला असं वाटतंय की तुम्ही आता प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन आलात तर तुम्हाला तुमच्या स्वप्नाचे रहस्य उलगडणार, सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार. मी तुम्हाला एक दिशा दाखवली, ते ठिकाण शोधण्यात मदत केली. आता पुढे काय करायचं हे तुम्हाला जवळच्या कुणाला तरी विश्वासात घेऊन ठरवायचं आहे. माझी काही मदत लागली तर कधीही कळवा, मी आहे तुमच्या सोबत. आणि हो, तिथे जायचं ठरलं तर जाऊन आल्यावर तुमचा अनुभव, प्रत्यक्षात त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला स्वप्नाचा अर्थ लागतो की नाही याविषयी मला नक्की कळवा.. ”

गौरी – “धन्यवाद बाबा. मी जाईल त्या ठिकाणी, मला जाणून घ्यायचा आहे माझ्या स्वप्नांचा अर्थ, माझा त्या जागेशी असलेला संबंध..”

गौरी आणि नैना बाबांचे आभार मानून घरी परत जायला निघाल्या.

नैना – “गौरी, मला वाटतं आता तू निशांत सोबत बोलायला हवं..त्याला विश्वासात घेऊन सांग आणि त्या ठिकाणी जायचं ठरवणार असशील तर निशांतला सोबत घेऊन जा..तो करेल अगं तुझ्यासाठी इतकं..”

गौरी – “हो मी आज बोलून बघते त्याच्याशी. पण तो आला नाही आला तरी मी तिथे जाणार हे मात्र नक्की.”

घरी आल्यावर निशांत गौरीला म्हणाला, “गौरी, अगं किती कॉल केले मी तुला पण तू उत्तर दिले नाही..किती घाबरलो मी..नैनाला सुद्धा फोन लावला पण तिनेही उचलला नाही..”

गौरी – “निशांत , अरे रागवू नकोस पण मला ना तुझ्याशी जरा बोलायचं आहे..आज ना आम्ही दोघी एका आश्रमात गेलेलो देवधर बाबांना भेटायला..तुला म्हणाले ना मी मला ते स्वप्न पडतंय त्याविषयी जाणून घ्यायला..”

ते ऐकताच निशांत म्हणाला, “गौरी, तू किती विचार करते आहेस त्या स्वप्नाचा..आणि तू कधी पासून असं भोंदू बाबांवर विश्वास ठेवायला लागली..”

गौरी – “निशांत, ऐकून तर घे माझं आधी..ते काही कुणी भोंदू बाबा नाही..ते एक शास्त्रज्ञ आहेत, त्यांची बरीच पुस्तके सुद्धा आहेत..आता ऐक मी काय सांगते ते..”

गौरीने आश्रमात घडलेली सगळी हकीकत निशांतला सांगितली आणि त्या ‘कुक्के’ नावाच्या गावी तिला एकदा जायचं असल्याचे सुद्धा सांगितले.

निशांतला हे सगळं फार विचित्र वाटलं पण गौरीचे मन राखायला तो तिच्यासोबत त्या गावी जायला तयार झाला. निशांतने सोबत यायला होकार देताच गौरी आनंदी झाली. तिने लगेच येत्या शुक्रवारची रात्रीच्या बसचे दोन तिकीटे काढली. आता कधी एकदा आपण त्या ठिकाणी जातोय असं तिला झालेलं. आश्रमात त्या ठिकाणाचे फोटो बघून जसं डोकं जड झालं, गरगरायला लागलं यावरून लहानपणापासून पडणार्‍या स्वप्नाचे रहस्य नक्कीच त्या ठिकाणी दडलेले आहे याची आता तिला जवळजवळ खात्री झाली होती.

ठरल्याप्रमाणे निशांत आणि गौरी त्या गावी जायला निघाले. तालुक्याला उतरून काही अंतर रिक्षाने प्रवास करत ते त्या परीसरात पोहोचले. वाटेतच रस्त्याच्या बाजूला गौरीला एक बोर्ड दिसला ज्यावर तसेच काही तरी चिन्ह दिसले जे तिला आश्रमात असताना स्वप्नात दिसले होते. थोड्या अंतरावर परत तेच चिन्ह होते ते बघताच तिला त्या गावाच्या जवळ पोहोचल्याची खात्री पटली‌.

सकाळची वेळ होती, सुर्याची कोवळी किरणे सर्वत्र पसरली होती. दोन्ही बाजूंनी वृक्षांनी वेढलेला तो रस्ता, तो बोर्ड, त्यावरचे चिन्ह म्हणजेच कन्नड मध्ये लिहीलेले गावाचे नाव , रस्त्याच्या एका बाजूला जरा खोल भाग तर एका बाजूला शेती असा सगळा परीसर बघून गौरीचे डोके जरा जड झाले, कधी तरी हे सगळं अनुभवलं आहे असं सारखं तिला वाटायला लागलं. घाबरून तिने निशांतचा हात घट्ट पकडला. निशांतने तिला हिम्मत देत शांत केले.

मुख्य रस्त्याच्या एका बाजूला वसलेले हे गाव बर्‍यापैकी मोठे होते. कधी तरी अनुभवलेले हे गाव आता बरेच सुधारले आहे असंही तिला क्षणभर वाटलं. काय होतंय तिचं तिला कळत नव्हतं. गावातील लोक सकाळच्या कामात व्यस्त होते. कुणी शेतावर जायला निघालेले तर कुणी धावपळ करत बस पकडायला नोकरीवर जायला निघाले होते.

शेतावर जाणार्‍या एका व्यक्तीने या दोघांकडे बघत काही तर प्रश्न केला पण त्या व्यक्तीची भाषा काही दोघांना कळाली नाही.

निशांत त्या व्यक्तीला म्हणाला, “हमे कन्नड नहीं आती..हिंदी में बोलो ना..एक मदत चाहीये..”

ती व्यक्ती म्हणाली, “हम क्या मदत कर सकते हैं..बोलो साब..नये लग रहे गाव में इसलिये पुछा मैं, किसको मिलना है..”

गौरी – “हमे ये जान ना है की यहाँ आसपास कोई जंगल है क्या..हमे वो जंगल के बारेमे जानना है..”

ती व्यक्ती जरा दचकून म्हणाली, “जंगल..उधर कोई नहीं जाता..सुना है उधर भूत है..एक बोर्ड लगा है उसके आगे जाना मना है..जो जाता वो वापस नहीं आता..मत जाना उधर..”

निशांत आणि गौरी ते ऐकताच जरा चकित झाले.
निशांत त्यावर म्हणाला, “किसने देखा है भूत..भूत वगैरे कुछ नहीं होता…”

गौरी निशांतला शांत करत त्या व्यक्तीला म्हणाली, “कोई है गाव में जो इस जंगल का असली राज जानता है..”

त्यावर ती व्यक्ती म्हणाली, “एक बुढीया है..दो घर छोड के जो झोपडी है उसमे अकेली रहती है..उसको पता हो सकता है..”

इतकं बोलून ती व्यक्त निघून गेली.

दोघेही त्या आजीबाईच्या झोपडीजवळ गेले. कंबर वाकलेली , अंदाजे वयाने ऐंशी वर्षांची एक म्हातारी झोपडीच्या बाहेर डोळे मिटून माळ जपत देवाचे नामस्मरण करत बसलेली होती.

गौरीने आजीला हाक मारली, “माजी…हमे आपकी थोडी मदत चाहिये..हम दुसरे गाव से आये है..”

गौरीचा आवाज ऐकून म्हातारीने डोळे उघडले आणि म्हणाली, “मैं क्या मदत करू..अब इस उमर में मुझे खुदको मदत की जरूरत हैं..”

गौरी थेट विषयाला हात घालत म्हणाली, “यहाँ नजदीक जो जंगल है ना, हमे आपसे उस जंगल का राज जानना है…”

जंगलाचे नाव ऐकताच म्हातारी म्हणाली, “क्यू..कौन हो तुम लोग..क्या चाहते हो.. क्यू जानना है..”

गौरीने त्या म्हातारीला विश्वासात घेऊन तिच्यासोबत घडलेली सगळी हकीकत सांगितली, तिला लहानपणापासून पडणर्‍या स्वप्ना बद्दल सांगितले. ते ऐकताच ती म्हातारी म्हणाली, “पूनर्जन्म.. तुम्हारा पूनर्जन्म हुआ है..मुझे यकीन है..तुम पक्का वही लडकी हो जो…उस सुबह छह बजे मुझे जंगल में दिखी थी..”

छह बजे ऐकताच गौरीला आठवले की तिला स्वप्नात नेहमी सकाळी सहाची वेळ दिसते..पण ही म्हातारी आजीबाई काय म्हणते आहे पूनर्जन्म वगैरे हे तिला कळत नव्हते..

गौरी लगेच म्हणाली, “कौंनसी लडकी..मुझे सब ठिक हे बताईये माजी..मैं यह सपना बचपन से देखती आ रही..आज कल तो मुझे डर लगने लगा है..”

आजी तुटक तुटक हिंदी बोलत सगळं सांगायला लागली.
( मराठी कथा असल्याने आजीचे बोलणे मराठी रूपांतर करून लिहीत आहे)

“तीस वर्षांपूर्वीची गोष्ट हाय. नेहमीसारखी म्या स्वयपाकासाठी चूल पेटवायची म्हणून लाकडं गोळा करायला जंगलाच्या वाटेने जात होती. सकाळचे सहा वाजले असतील, सूर्य नुकताच उजाडत होता, अंधूक प्रकाश जंगलात पसरला होता. काही अंतर पार
केल्यावर मले एका झाडाखाली कुणीतरी पडलेले दिसलं. म्या घाबरतच जवळ गेली तर एक तरुण पोरगी जखमी होऊन तडफडत होती, लय लागलं होतं तिले, अर्धमेल्या अवस्थेत त्या पोरीला बघून मले काही सुचत नव्हतं. मोठ्याने ओरडत म्या गावाकडं धावत आली, गावकऱ्यायले मदतीले बोलावलं. लय लोकं माह्या सोबत धावतच त्या जंगलाकडे निघाले पण आमी पोहोचण्या आधीच त्या पोरीने जीव सोडला होता. कुणाला तरी रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल भागात एक गाडी सापडली त्यावरून कळालं की अपघात झालाय आणि त्यात ही पोरगी उतारावरून घसरून जंगलाच्या दिशेने येऊन पडली. ती मदतीसाठी तडफडत होती पण उशीर झाला होता. त्या काळी गावात गाड्या घोड्या कमी होत्या. इलाख्यात एखादीच पोरगी असन जी गाडी चालवते पण ही श्रीमंत घरातली पोरगी असणार म्हणून शानी एकटीच अशी गाडी चालवत जात होती अन् अपघात घडला. दिवसभर वाट पायली पण तिच्या शोधात कुणी आलं नाही. गावकर्‍यांनी तिचा अंत्यसंस्कार केला. तीन चार दिवसांनी पोलिसांना गाडी खाईत पडलेली दिसल्यावर पोलिस आले, मग तिचे नातलग आले पण त्याआधीच तिचा अंत्यसंस्कार गावकर्‍यांनी उरकला होता. त्या दिवसानंतर कुणी त्या जंगलात गेले नाही. कुणी म्हणे तिची अतृप्त आत्मा तिथे भटकत असते , एक जण गेला अन् भितीपोटी की काय मरण पावला. मग गावकऱ्यांना धास्ती भरली त्या जंगलाची. कुणी नाव पण काढत नाही आता तिकडे जायचं..”

सगळं ऐकून गौरीला धक्काच बसला. काहीतरी विचार करत ती म्हणाली, “माजी, हमे उस जंगल में लेके चलेंगी क्या..मुझे वो जगह देखना है..”

निशांत जरा घाबरून गौरीला म्हणाला, “गौरी, ऐकलं त्यात समाधान नाही झालं का तुझं..आता आपण परत जाऊ..”

गौरी मात्र माघार घ्यायला तयार नव्हती. तिने आजीला विनंती करून जंगलात जायला तयार केले. गौरीच्या हट्टापायी निशांत काही बोलला नाही.

आजी म्हणाली, “लेके जाती है जंगल में तुमको..पर मेरी तो अब उमर हो गयी..मुझे कोई डर नही पर तुम लोग को कुछ हुआ तो मुझे बोलना मत..”

तिघेही जंगलात जायला निघाले. जंगलाच्या दिशेने जाताना गौरीला धूसर धूसर काही तरी आठवतं होतं पण काही कळत नव्हतं. आपण मदतीसाठी याच जंगलात कितीतरी दूर जखमी अवस्थेत चालत गेलेलो पण कुणी चिटपाखरूही आजुबाजूला दिसलं नाही असं काही तरी तिला आठवलं. मदतीसाठी तडफडत असताना फक्त जीर्ण वृक्ष, पालापाचोळा आणि अंधूक प्रकाश इतकंच तेव्हा आजुबाजूला होतं असही जाणवलं. हेच सगळं तिला नेहमी स्वप्नात दिसायचं जे आज धूसर धूसर आठवून डोकं जड झालं होतं. तितक्यात तिची नजर गेली त्या मोडक्या पत्र्याच्या बोर्डवर, त्यावर आता गंज चढला होता. त्यावरची अक्षरे मिटून गेली होती. समोर बघितलं तर तेच स्वप्नातलं जंगल , तीच जीर्ण झाडे, वार्‍याचा भयाण आवाज.

आजी अचानक थांबून म्हणाली, ” यही वो‌ जगह है जहाँ मैने तीस साल पहले उस लडकी को तडफते देखा था..”

गौरी एकटक त्या जागेकडे बघत होती. निशांतला लक्षात आले की गौरी आता एकोणतीस वर्षांची आणि ती नेहमी स्वप्नातल्या जागेचे वर्णन करते ती जागा हुबेहूब हीच आहे.

त्या क्षणी निशांतने गौरीच्या खांद्यावर हात ठेवला आणि गौरी त्याच्या कुशीत शिरून पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली, “निशांत, आज मला माझ्या स्वप्नाचे रहस्य उमगले..  मला कुणीतरी मदत करावी अशी आशा ठेवून पूर्वीच्या जन्मी मी तडफडत जीव सोडला पण आज नैना, देवधर बाबा, तू आणि ह्या आजी सगळ्यांच्या मदतीने आज स्वप्नातल्या या ठिकाणाचा शोध लागला. आता मला खूप समाधान वाटतंय.. लहानपणापासून अनुभवलेले स्वप्न , त्यात मदतीला तडफडत असणारी मी आज प्रत्यक्षात त्या जागेवर उभी आहे…मला मदतीला तुम्ही सगळे आहात, आता मला भिती वाटत नाहीये..”

निशांतने तिला मिठीत घेतले.

काही वेळाने तिघेही सुखरूप त्या ठिकाणाहून परत गावात आले. निशांत आणि गौरी त्यांच्या घरी परतले. त्या दिवसानंतर गौरीला ते स्वप्न परत कधीच दिसले नाही आणि आता तिला त्या स्वप्नाची भितीही मनात राहीली नाही.

कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. केवळ मनोरंजन म्हणून वाचावी ही विनंती. 😄

आपला अभिप्राय नक्की कळवा 😊

© अश्विनी कपाळे गोळे

Article Categories:
भयपट

Comments are closed.