#स्वप्न_एक_रहस्यकथा #भाग_दुसरा

Written by

      गौरी आणि नैना ठरल्याप्रमाणे बाबांच्या आश्रमात जायला निघाल्या. रिक्षात जाताना नैनाची बडबड सुरु होती पण गौरी मात्र तिच्याच विचारात गुंतली होती. असं मांत्रिक बाबांच्या आश्रमात जायची वेळ येईल अशी तिने कधी कल्पनाही केली नव्हती. अशातच आश्रम कधी आला दोघींनाही कळाले नाही.

बाबांचा आश्रम म्हणजे एखाद्या झोपडी सारखं काही तरी असणार त्यात भली मोठी दाढी वाढलेले जरा वयस्कर व्यक्ती झोपडीच्या परीसरात एखाद्या वृक्षाखाली ध्यान वगैरे करत बसलेले असणार असं काहीसं चित्र गौरीने मनात रेखाटलं होतं. पण इथे मात्र चित्र काही तरी वेगळंच होतं.

बाबांचा आश्रम म्हणजे हिरव्यागार झाडांनी व्यापलेली एक दुमजली इमारत होती. त्यात आश्रमाच्या गेटवर सिक्युरिटी गार्ड नी कम्प्युटर वर डिजिटल एंट्री करून घेत दोघींनाही आत जायला परवानगी दिली. गेट मधून आत जाऊन बघतात तर दोन्ही बाजूंनी सुंदर असे गार्डन आणि त्याच्या मधोमध रस्ता जो गेट पासून त्या दुमजली इमारती पर्यंत छान सुशोभित केलेला होता. ते बघून गौरीचे मन अगदी प्रसन्न झाले. एकंदरीत चित्र बघून गौरी नैनाला म्हणाली,
“नैना, आपण नक्की बाबांच्या आश्रमात आलोय ना की चुकून भलत्याच ठिकाणी आलोय.”

नैना – “आईने हाच पत्ता दिला गं, बघ ना नाव तर तेच आहे..आता जाऊन बघूया तरी..”

इमारतीच्या आत जाताच समोरच एका टेबल खुर्चीवर एक व्यक्ती पुस्तक वाचण्यात अगदी रममाण झालेली होती. टेबलवर एक लॅपटॉप सुद्धा होता. गौरी त्यांना म्हणाली, “नमस्कार, आम्हाला ना देवधर बाबांना भेटायचं आहे..”

ती व्यक्ती प्रसन्न मुद्रेने उत्तर देत म्हणाली, ” आमच्या आश्रमात तुमचं स्वागत आहे. मी नरेंद्र देवधर म्हणजेच देवधर बाबा..बोला मी तुमची काय सेवा करू शकतो..”

त्यांचं बोलणं ऐकून गौरी आणि नैना जरा चकित झाल्या. मनात कोरलेली बाबांची व्यक्तीरेखा म्हणजे दाढिवाले वयस्क व्यक्ती पण हे देवधर बाबा मात्र चाळीशीतले, डोळ्यांवर चश्मा, नीट शेव्ह केलेली दाढी, कडक इस्त्री केलेले कपडे, बोलण्यात नम्रपणा. बाबांनी दोघींनाही समोरच्या खुर्चीत बसायला सांगितले. गौरीने आजुबाजूला नजर फिरवली,भला मोठा हॉल होता, त्यात एका बाजुला लायब्ररी सारख्या पुस्तकांच्या रॅक, मोठमोठ्या शास्त्रज्ञांचे फोटो लावलेले होते.

एका बाजुला वर जाण्यासाठी जिना होता आणि त्याच्या जवळच लॅबोरेटरी लिहून वरच्या दिशेने एक बाण दाखविलेला होता.

सगळं निरीक्षण करत असताना एक व्यक्ती मातीच्या ग्लास मध्ये पाणी घेऊन आलेत. थंडगार पाणी पिऊन दोघीही फ्रेश झाल्या. बाबांनी तिघांसाठीही चहा आणण्याचा आदेश दिला . ती व्यक्ती “जी बाबा..जसा आपला आदेश..” म्हणत चहा आणायला निघून गेली तसंच बाबा म्हणाले,
“आपला परिचय..?”

गौरी आणि नैना यांनी आपापला परिचय बाबांना करून दिला.

नंतर गौरी तिच्या स्वप्ना बद्दल बाबांना सांगू लागली, “बाबा, मला ना बालपणापासून भयानक स्वप्न पडतात ज्यात एक ठिकाण नेहमी दिसते. जंगल, जीर्ण वृक्ष, अंधूक प्रकाश, वार्‍याचा भयाण आवाज..त्यात मी एकटीच..हतबल, कुणाच्या तरी मदतीची वाट बघत असते. कधी गाडी बंद पडली म्हणून मदत शोधते पण आजुबाजूला जंगल आणि मदतीला कुणीच नाही, कधी मी वाट चुकलेली दिसते पण आजुबाजूला कुणीच नसते. काल रात्री सुद्धा असंच स्वप्न पडलं मला.. खूप भिती वाटते आता या स्वप्नाची. हल्ली तर हे भयाण स्वप्न सारखंच पडतंय. लहानपणी मी आई बाबांना सांगायची पण कुणी विश्वास ठेवत नव्हते. आता नवर्‍याला सांगते तर तो म्हणतो तू खूप विचार करतेस, स्वप्न समजून विसर. पण बाबा मला नाही विसरता येत आहे ते स्वप्न. प्रत्येक स्वप्नात तेच ठिकाण का दिसते हे कळत नाहीये मला.. काय संबंध असेल माझा या स्वप्ना सोबत,  स्वप्नातल्या त्या ठिकाणा सोबत. मला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. प्लीज हेल्प मी..”

बाबांनी अलगद डोळ्यांवरचा चश्मा काढून बाजूला ठेवला आणि म्हणाले, “नक्कीच शोधून काढू आपण..तुम्ही घाबरू नका. पण मला त्यासाठी तुमच्याकडून अधिक माहिती लागेल. मला सांगा तुम्हाला स्वप्नात काही खूण किंवा काही पाटी वगैरे दिसलेली आठवते का? नीट आठवून बघा..”

बाबा सगळी माहिती कम्प्युटर वर पटापट टाइप करत गौरीच्या केसचा रिपोर्ट बनवत होते.

गौरी जरा विचार करून म्हणून म्हणाली, “नाही, मला तर फक्त ती जीर्ण वृक्ष, अंधूक प्रकाश, तो‌ रस्ता इतकंच काय ते आठवतं..”

बाबा म्हणाले, “हरकत नाही. आपण लॅबोरेटरी मध्ये जाऊया. तुमची एक टेस्ट घ्यावी लागेल त्यातून काही कळतंय का बघूया..”

ते ऐकून गौरी आणि नैना जरा घाबरल्या. इथे काही विचित्र घडणार नाही ना याची दोघींना जरा भिती वाटली. त्या काहीही न बोलता एकमेकांकडे बघत होत्या. बाबांनी दोघींच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले आणि ते एक पुस्तक दोघींच्या दिशेने सरकवत म्हणाले,
“घाबरू नका. हे बघा मी लिहीलेलं पुस्तक. स्वप्नांच्या पलीकडचे विश्व, पूनर्जन्म याविषयी. या विषयांवर माझा सखोल अभ्यास आहे. ही लायब्ररी तुम्ही बघत आहात त्यात विज्ञानावर आधारित बरीच पुस्तके आहेत. माझे काही सहकारी आश्रमात योगा शिकवतात, बालसुधारगृहात जाऊन आमचे सहकारी तिथल्या बालकांना मार्गदर्शन करतात, त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.
मी काही कुणी भोंदू बाबा नाही. मला लोक मांत्रिक बाबा म्हणतात पण माझे मंत्र म्हणजेच मानवाला प्रेरणा देणारे माझे स्वलिखीत वैज्ञानिक मंत्र आहेत ज्यामुळे माझ्याकडे मदतीसाठी येणार्‍यांना एकाग्रता वाढवायला मदत मिळते, मनाला शांती मिळते. मी काही कुणी अंतर्यामी नाही, मी फक्त तुमच्या समस्या दूर करण्यासाठी मार्ग दाखवतो तेही विज्ञानाच्या मदतीने. तेव्हा घाबरण्याचे कारण नाही.”

बाबांचे बोलणे ऐकून दोघी अगदी आश्चर्याने देवधर बाबांना बघत होत्या तितक्यात कडक गवती चहाचा सुगंध दरवळला आणि एक व्यक्ती चहा घेऊन आली. तिघांनी चहा घेतला.

गौरीला आता त्या स्वप्नाचे रहस्य जाणून घ्यायचे होतेच शिवाय सोबतीला नैना होती त्यामुळे ती बाबांनी सांगितलेली टेस्ट करायला तयार झाली. तिघेही लॅबोरेटरी मध्ये गेले. लॅबोरेटरी मध्ये एक स्त्री कम्प्युटर वर काम करत होती. तिघांना येताना बघून त्या स्त्रीने  तिथल्या एका उंच टेबलावरचे मंद लाइट लावले, गौरी आणि नैनाला स्मित देत त्यांचे स्वागत केले. बाबांनी गौरीला त्या उंच टेबलावर झोपायला सांगितले. बाजुला ती स्त्री आणि नैना सुद्धा होती. गौरीच्या मनात जरा भिती होतीच पण आज काय तो सोक्षमोक्ष सुद्धा लावायचा होता. बाबांनी सांगितल्याप्रमाणे गौरीने डोळे बंद केले आणि बाबांनी तिला श्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगितले. बाबांनी जवळपास दहा मिनिटे काही तरी वैज्ञानिक मंत्र म्हंटले. ती आता एकाग्र चित्ताने निद्रावस्थेत गेली आहे याची खात्री होताच त्यांनी गौरीला प्रश्न केला, “गौरी तू आता कुठे आहेस..”

गौरी अडखळत हळूच बोलत होती, “मी कुठे आहे मला कळत नाहीये.. परत तेच स्वप्न दिसते आहे..ती जीर्ण वृक्षे, तो रस्ता..”

बाबा लगेच म्हणाले, “आजुबाजूला बघ काही खूण, काही बोर्ड दिसतोय का..नीट बघ गौरी, काही तरी असेल..घाबरू नकोस..मी तुझ्या सोबत आहे..”

गौरी म्हणाली, “काहीच नाही इथे..जंगल आहे हे..दूरवर अंधूक प्रकाश आहे..मला भिती वाटत आहे..”

बाबा परत मंत्र म्हणत म्हणाले, “डोळे विस्फारून बघ, काही तरी असेल..तुला बाहेर यायला मदत मिळेल..मी आहे मदतीला.. घाबरू नकोस..”

गौरी – “एक काही तरी चिन्ह दिसते आहे..काय आहे कळत नाहीये मला..पण एका झाडाखाली पत्राचा बोर्ड मोडून पडलाय त्यावर काही तरी चिन्ह आहे..”

इतकं बोलून गौरी घाबरून घामाघूम होऊन खडबडून जागी झाली. बाजुला उभ्या त्या स्त्रीने गौरीला पाणी देत तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवत तिला शांत केले.

जे काही चाललं होतं ते बघून नैना तर पार घाबरली होती पण गौरीला धीर देत ती म्हणाली, “रिलॅक्स गौरी..मी आहे इथेच..”

गौरी बाबांना म्हणाली, “बाबा, परत ते स्वप्न..ते जंगल..ती जीर्ण वृक्ष..तो रस्ता..”

बाबा पुढे म्हणाले, “आणि ते चिन्ह.. ”

गौरी – ” चिन्ह…? हो आता मला काही तरी चिन्ह दिसले.. पहिल्यांदाच त्या ठिकाणी एक चिन्ह दिसले..”

बाबा -“पूर्वी स्वप्नात भितीपोटी तुम्ही त्या चिन्हावर नकळत दुर्लक्ष केले पण आता त्या एका चिन्हामुळे आपल्याला या स्वप्नातल्या सत्याचा उलगडा होऊ शकतो..चला आपण बाहेर बसून बोलूया..”

बाबांचे बोलणे गौरी आणि नैना यांना कोड्यात टाकणारे होते पण आता बाबा सांगत आहेत तसं करायचं असं त्यांनी ठरवलं.

क्रमशः

कथेचा पुढचा भाग लवकरच.

कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. केवळ मनोरंजन म्हणून वाचावी ही विनंती. 😄

आपला अभिप्राय नक्की कळवा 😊

© अश्विनी कपाळे गोळे

Article Categories:
भयपट

Comments are closed.