#स्वप्न_एक_रहस्यकथा #भाग_पहिला

Written by

© अश्विनी कपाळे गोळे

     गौरी नेहमीप्रमाणे सकाळी उठून फिरायला निघाली. दररोज सकाळी सहा ते सात मॉर्निंग वॉक हे ठरलेलेच. सोसायटीच्या जवळ एक बाग होती,‌तिथे दहा राऊंड मारले की योगा‌ करून सात वाजता घरी परत असा हा मॉर्निंग वॉक चा कार्यक्रम असायचा. त्या दिवशी मात्र काही तरी वेगळंच घडलं. गौरी बाहेर पडली तेव्हा छान गार वारा सुटला होता, “अहाहा! किती रम्य वातावरण आहे.”🥰😍 असं मनात पुटपुटत ती बागेच्या दिशेने निघाली. सोसायटी आणि बागेच्या मधल्या रस्त्यावर दोन्ही बाजूला हिरवी झाडे होती, सकाळी फिरणार्‍यांची दररोज वर्दळ असायची.

आज मात्र सोसायटीच्या गेट बाहेर येताच गौरीला ते रम्य वातावरण जरा‌‌ भयानक झालेलं जाणवलं. 💀झाडांवर पक्ष्यांची किलबिल नसून वादळ आल्यावर असतो तसा झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासून निघणारा आवाज जाणवला. इतक्या अलगद वार्‍याने असा भयानक आवाज कसा याचं तिला आश्चर्य वाटलं पण दुर्लक्ष करून ती पुढे निघाली. एक किलोमीटर अंतरावर असलेली बाग आज जरा‌ जास्तच दूर आहे असं वाटायला लागलं, शिवाय रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. आज असं काय वाटतं आहे, किती भयाण शांतता पसरली आहे असं मनात विचार करत ती चालत होती.. कितीतरी दूर गेली तरी बाग‌ काही येत नव्हती. घड्याळात पाहिलं तर सहाच वाजलेले.  असं कसं होऊ शकतं, मी सहा वाजता घरून निघाली आणि अर्धा तास तरी चालत आहे पण बाग कशी येत नाही, घड्याळ सुरू असूनही सहाच कशे वाजलेत. मोबाईल मध्ये वेळ बघितली तर त्यातही सहाच वाजलेले. आज कुणीच फिरायला कसं आलं नसेल. अशा विचारात ती चालत होती, जरा थकवा आला पण घाबरल्या मुळे थांबण्याची हिम्मत होत नव्हती. आता पुढे न जाता घरी परत जाऊया असा विचार करून ती मागे फिरली तर मागे वेगळंच चित्र.

ती ज्या रस्त्याने आली तो हा रस्ता नव्हताच,  मागे दिसत होता झाडाझुडूपांमधून जाणारा एक कच्चा रस्ता ज्याच्या आजूबाजूला जीर्ण वृक्ष, सर्वत्र पालापाचोळा पसरलेला, त्यातून नजरेस पडणारा अंधूक प्रकाश तोही शंभर मीटर पेक्षा पुढे दृष्टी जाणार नाही इतकाच.  एका किर्र जंगलातल्या वातावरणासारखे भासत होते. वार्‍याचा तो भयानक आवाज त्या भयाण शांततेचा भंग करत होती.

आता गौरी अजूनच घाबरली, काय करावं काही सुचत नव्हतं. घरी फोन करून नवर्‍याला‌ बोलावून घेऊ असा विचार करून फोन बघते तर फोन मध्ये नेटवर्क कव्हरेज नव्हतं. आता गौरीची धडधड वाढली, ती झाल्या प्रकाराने अक्षरशः रडकुंडीला आली. पुढे जावं की मागे तिला काही सुचत नव्हते.

दोन पावलं पुढे जायची परत मागे यायची. अजूनही घड्याळ बघितले तर सहाच वाजलेले होते. हा काय प्रकार आहे, कशी बाहेर पडणार मी आता‌ विचारात असतानाच नवर्‍याने म्हणजेच निशांतने तिला हलवून उठवले आणि म्हणाला, ” गौरी, सहा वाजलेत, फिरायला जायचं नसेल तर अलार्म तरी बंद कर. कधी पासून वाजतोय तो. ”

गौरी दचकून उठली, घामाघूम झाली होती ती. उठल्यावर तिला जाणवलं की जे काही अनुभवलं ते एक भयानक स्वप्न होतं, बाजूला ठेवलेले घड्याळ बघितले तर सहा वाजले होते. अलार्म बंद करून मोबाईल बघितला, त्यातही सहाच वाजलेले होते. 
जे काही बघितले, स्वप्नात अनुभवले ते आठवून आज मात्र मॉर्निंग वॉक ला जायची गौरीची हिम्मत होत नव्हती.

गौरी खूप घाबरली होती. हे असं स्वप्न काही तिला पहिल्यांदा पडलं नव्हतं. नेहमीच तिला अशी भयानक स्वप्न पडायची आणि आश्चर्य म्हणजे तिला पडणार्‍या या स्वप्नांमध्ये तोच भयाण रस्ता , तेच जीर्ण वृक्ष, तोच वार्‍याचा भयाण आवाज ऐकू यायचा. कधी स्वप्नात दिसायचं, रस्त्याने जाताना गाडी बंद पडली आणि मदतीला आजुबाजूला बघते तर काहीही नसून तेच जंगल, कधी काही आणायला बाहेर पडले आणि परत येताना घरचा रस्ता सापडत नाही आणि शोधताना दिसते तेच भयाण जंगल. अशी भयाण स्वप्ने लहानपणापासून तिला पडायची पण या भयाण स्वप्नाचे रहस्य तिला अजूनही गवसले नव्हते. लहान असताना आई बाबा म्हणायचे मैत्रिणी खेळताना भूताखेताच्या गोष्टी करत असणार म्हणून घाबरते‌, विचार करू नकोस पण हल्ली मात्र गौरीला ही स्वप्न सारखीच पडायला लागली.

गौरी बेडवर बसून घामाघूम होऊन एकटक कुठेतरी बघत घाबरलेल्या अवस्थेत विचार करत आहे बघून निशांत म्हणाला, “गौरी, काय झालं..? ”

गौरी त्यावर म्हणाली, “निशांत, अरे आज परत तसचं स्वप्न पडलं मला. तीच जागा, तेच भयाण जंगल, ते जीर्ण वृक्ष.. खूप भिती वाटते आहे मला..”

निशांत तिची समजूत काढत म्हणाला, ” घाबरायचे काय त्यात, अगं स्वप्न होतं ते..जास्त विचार करू नकोस. चल तयार हो, आज तुला मी सोडतो ऑफिसला आणि जाताना वाटेतच नाश्ता करू..”

गौरी आणि निशांत तयार होऊन ऑफिसला जायला निघाले. गेटच्या बाहेर पडताच गौरीने आजुबाजूला घाबरतच नजर फिरवली तर सगळं अगदी नेहमीप्रमाणे प्रसन्न वाटत होतं. कामावर जाणर्‍यांची वर्दळ, शाळेच्या बसची वाट बघणारे लहान मुले, पालक. गौरी मात्र नकळत परत त्या स्वप्नात शिरली आणि विचार करू लागली, “काही संबंध असेल का माझा त्या जागेशी, म्हणून तर सारखं तेच दिसत नसेल ना..काय करावं आता..निशांतचा असल्या गोष्टींवर विश्वास नाही..घरी अजून कुणाला सांगावं तर सगळे उगाच मला वेड्यात काढतील.”

गौरी त्या भयाण स्वप्नाचा विचार करत असताना निशांतने गाडी थांबवली आणि म्हणाला,” गौरी, अगं लक्ष कुठे आहे तुझं..मी काय विचारलं , इथे या रेस्टॉरंट मध्ये जायचं का नाश्ता करायला..”

गौरी अडखळत म्हणाली, “हा..चालेल ना..चल जाऊया..”

नाश्ता केल्यावर निशांतने गौरीला ऑफिस जवळ सोडले आणि तो त्याच्या ऑफिसला निघून गेला.

काही वेळाने नैना म्हणजेच गौरीची ऑफिसमधली खास मैत्रीण आली आणि गौरीला हाय हॅलो म्हणाली पण गौरी कॉम्प्युटर समोर बसून काही तरी विचारात गुंग होती, चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. तिची अशी अवस्था बघून नैना ने गौरीच्या चेहर्‍यापुढे बोटांनी चुटकी वाजवली तशीच गौरी दचकून म्हणाली, “नैना, अगं काय हे..किती घाबरले मी…”

नैना – ” मॅडम, दोन तीन वेळा हाय हॅलो करत हाक मारली पण तुझं लक्ष कुठे होतं..कशाचा विचार करत आहेस इतका..काही टेन्शन आहे का?”

गौरी – “हो अगं, ऐक ना..तू मला वेड्यात काढणार नसेल तर सांगते…पण इथे नको. आपण चहा घ्यायला जाऊया कॅन्टीन मध्ये..”

नैना – “गौरी, अगं बेस्ट फ्रेंड मानते ना मला..मग जे काही आहे ते बिनधास्त सांग..एकदा इमेल चेक करते मग लगेच जाऊया चहा ला..तिथे बसून नीट काय ते बोलता येईल..”

दोघीही ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये गेल्या. गौरी ने तिला लहानपणापासून पडणार्‍या स्वप्नांची सगळी कहाणी नैनाला सांगितली. ते सगळं ऐकून नैनाला सुद्धा जरा विचित्र वाटले. ह्या स्वप्नामागे खरंच काही कारण तर नसेल ना, म्हणजे तीच जागा, तेच जंगल, तोच भयाण आवाज, अशी शंका नैनाला सुद्धा आली.
जरा विचार करून नैना म्हणाली, “गौरी ऐक, माझ्या ना माहितीतील एक मांत्रिकबाबा आहेत, आई बाबा जातात त्यांच्या आश्रमात कधी कधी कुंडली, भविष्य बघायला. माझा ना या गोष्टींवर विश्वास नाही पण तू म्हणशील तर आपण त्यांच्याकडे जाऊन येऊ. ते तुला काही मदत करू शकतील तर बघूया.‌काय म्हणतेस..”

गौरी – “विश्वास तर माझाही नाही गं या गोष्टींवर पण आता सारखीच ती स्वप्नं पडतात, त्यामुळे आता मला वेड लागायचं बाकी आहे. खरंच जाऊया का आपण तिथे. बघू तरी ते काय म्हणतात..”

नैना – “चालेल, आईला फोन करून विचारते मी त्यांच्या आश्रमाची वेळ, पत्ता..आपण आज सेकंड हाफ सुट्टी घेऊन जाऊया..”

गौरी – “चालेल.. तसंही आज माझं कामात लक्ष लागणार नाही पण आहे तितकं काम संपवू लवकर आणि निघू..”

क्रमशः

कथेचा पुढचा भाग लवकरच.

कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. केवळ मनोरंजन म्हणून वाचावी ही विनंती. 😄

आपला अभिप्राय नक्की कळवा 😊

© अश्विनी कपाळे गोळे

Article Categories:
भयपट

Comments are closed.