स्वयंपाकघरातील गमती जमती

Written by

माझं नुकतंच लग्न झालेलं, लग्ना आधी नोकरी शिक्षण यामुळे स्वयंपाक फार काही शिकले नाही, लग्ना नंतर शिकता येईल बरोबर सासूबाईंच्या मदतीने, हाच विचार केला. पण हे शिकताना अनेक गमती जमती अनुभवास आल्या त्या तुमच्यासोबत शेयर करते.
सकाळी पतीला डबा करून द्यावा लागणार होता, पहिलीच वेळ, काय करावं ठरलेलं नव्हतं. पण त्याच इतकं टेन्शन आलं की सकाळी 4 वाजताच उठून स्वयंपाकघरात गेले. सासूबाई उठल्या, घडयाळा कडे पाहिलं, “जा झोपून घे, अजून वेळ आहे”
माझ्या लहान दिरासाठी डबा बनवायचा होता. पहिल्यांदाच भेंडीची भाजी करत होते. फोडणी देताना शक्यतो आपण कढीपत्ता टाकतो म्हणून मीही भेंडीत कढीपत्ता टाकला. 2-3 वेळा हे झाल्यानंतर “वहिनी, भेंडीत कढीपत्ता….नको ना” 
कढीपत्ता कुठे टाकायचा आणि कुठे नाही हे दिराने शिकवलं. 
पुरणपोळ्या आम्ही बाहेरूनच मागवायचो, पण नुकतंच लग्न झालेलं आणि उत्साहाचं भरतं अंगात आलेलं. मी सासूबाईंना म्हटलं आपण करू पुरणपोळ्या. “अगं खूप दमावं लागेल त्यासाठी” पण माझ्या जणू अंगातच आलेलं, “मी करेल”
पुरणपोळी कशाशी खातात याचा मागमूसही नसताना सासूबाईंना विचारत विचारत सुरवात केली, शेवटी पोळ्या करायला घेतल्या, जमेना…सासूबाई बरोबर बोलत होत्या…
शेवटी पोळ्या त्यांनाच कराव्या लागल्या हे वेगळं सांगत नाही. 
त्यानंतर घरी पुरणपोळी करायचा विषयही आम्ही काढत नाही. 
भाकरी नेहमी सासूबाई करत, एकदा मी घेतल्या करायला, शेजारी सासूबाई उभ्या होत्या. “एकच करायची” 
असं त्यांनी बजावून सांगितलं. मी बनवली, काहीतरी भलताच बनलेलं. कोणी खाणार नव्हतं, उरलेल्या भाकरी सासूबाईंनी केल्या. माझी भाकरी कोणी खाणार नव्हतं, बाहेर गेट जवळ कुत्रं उभं होतं त्याचा पुढे टाकली. तो जवळ गेला आणि तोंड वाकडं करत तसाच निघून गेला. कुत्रं सुदधा माझी भाकर खात नाही हे पाहुन घरात एकच हशा पिकला. 

कढी करताना बेसन अगदी थोडं घालावं लागतं हे मला कोण सांगणार? बरं कोणाला विचारायला जावं तर माझा अती आत्मविश्वास आड यायचा. कारण माझे काही पदार्थ खूप चांगले बनायचे. 
मुठा भरून भरून कढित बेसन पीठ टाकलं आणि त्याचं पिठलं कधी बनलं कळलंच नाही. 
सगळ्यांनी वेगळ्या प्रकारचं पिठलं म्हणूनच ते खाल्लं, ती कढी होती हे आजवर मी त्यांना सांगितलं नाही. 
रव्याचा शिरा बनवतांना सासूबाईंनी सगळी कृती सांगितली, पण रवा आधी भाजून घ्यायचा असतो हे सांगायचं विसरल्या. पण तरीही छान झालेला शिरा. 
सरबत साठी मी साखर बारीक करून बरणीत भरून ठेवली ती सासूबाईंनी मीठ म्हणून भाजीत टाकलं, आणि मग 2 दिवस रागानिशी दीर बाहेरच जेवला. 
गावाला गेलेलो, मी चुलीवर खिचडी करणार म्हणून हट्ट धरला, तांदूळ फुलून भात जास्त होतो हे लक्षात नाही आलं. 6 लोकांसाठी मोठे पातेले भरून ती बनली. 3 दिवस जेवलो असतो तरीही नसती संपली. मग काय, शेजारी पाजारी , मित्र मंडळी या सगळ्यांना आग्रह करून करून जेवायला बोलावलं आणि ती संपवली.
तुमच्याही बाबतीत अश्या काही गमती जमती झाल्या असतील, नक्की शेयर करा कंमेंट मध्ये.. 🙂

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत