स्वातंत्र्य??????

Written by

 

15  ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. आहे म्हणजे गल्लीबोळात आता झेंडावंदन असणार, कोणत्या तरी नेत्याला बोलावून त्याच्या हातून झेंडावंदन होणार. तो नेता त्याचा पक्ष आणि तो कसा श्रेष्ठ आहे याच्या बताया मारणार, थोडं देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचं गुणगान गाणार त्यावर आपल्यासारखे सामान्य लोक टाळ्या ठोकणार. चॉकलेट, बिस्किटे अस काहीतरी वाटून कार्यक्रम समाप्त होणार आणि आम्ही जाणार आपापल्या घरी.

स्वातंत्र्य म्हणजे  नेमकं काय आणि कसं हा प्रश्न पडतो का? नक्की स्वतंत्र आपण आहोत का याचा विचार करा बर जरा.

आजही स्त्रीला चूल आणि मूल या कक्षेबाहेर जाण्यासाठी लढावं लागतं, परपुरुषासमोर जाण्यासाठी डोक्यावर पदर घ्यावा लागतो, तिच्याच चेहऱ्यावरचा बुरखा हटवण्यासाठी कोर्टात जावं लागतं, तोंडी तलाक नाकारण्यासाठी समाज विरोधात लढा पुकारावा लागतो. एकटीने बाहेर पडली तर माणूस नावाच जनावर तिचे लचके तोडील म्हणून सातच्या आत घरात यावच लागत. बलात्काऱ्याला शिक्षा न मिळता तिलाच समाजाच्या अव्हेलनेची शिक्षा भोगावी लागते, हुंडा प्रथेचा विनाकारण बळी व्हावं लागत,अँसिडचे चटके सहन करावे लागतात. तिच्याच आभाळात तिला मुक्त भरारी घेण्यास  बंदी , असा भारत खरंच स्वतंत्र झालाय का?

विद्यार्थ्यांना अभ्यास करून चांगले गुण पडूनही चांगल्या कॉलेज मध्ये प्रवेश नाही मिळत, जातीवाद तिथेही आड येतो म्हणून विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होतायत. कॉलेजची फी परवडत नाही म्हणून शिकायची इच्छा असून शिकता येत नाही, mpsc,upsc अश्या सरकारी स्पर्धा परीक्षेतही डमी बसवले जातायत. त्याविरोधात लढा देण्यात, परीक्षा देण्यात वर्षच्या वर्ष वाया जातात. रोज इथे लोकसंख्या वाढते तशी बेरोजगारी वाढते असा भारत खरंच स्वतंत्र झालाय?

जय जवान जय किसान असा नारा कधी काळी भारतात घुमायचा त्या भारतात आज शेतकरी आत्महत्या करतोय. शेतीच्या पिकाला बऱ्यापैकी भाव मिळेना. सामान्यांना तेच पीक डबल दरात इकडे विकत घ्यावे लागत. मधल्या मध्ये व्यापारी गलेलठ्ठ होतो आणि सगळ्यांना पिकं पूरवणाराच

एक वेळच्या अन्नासाठी दारोदारी फिरतो. शेतीच्या योजना आल्या पण पोहचल्याच नाहीत आणि निवडणूका  आल्याकिच यांना या योजना आणि शेतकरीही आठवतो

असा भारत स्वतंत्र आहे का नक्की?

ग्रामीण भागात ना वीज,ना पाणी ना अन्न. शिक्षणाची तर दुरावस्थाच. निवडणूक आल्यावर जोडलेले हात घरी येतात आणि समस्या घेऊन गेल्यावर तेच हात ओळख दाखवायला तयार नसतात. झुकलेली मान निवडून आल्याबरोबर ऐटीत वर निघते आणि सामान्यांनाच अरेरावीची भाषा ऐकायला मिळते.

राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी सामान्य जनतेचा वापर करतात आणि नंतर जनतेकडे पाठ फिरवतात. भ्रष्टाचाराच्या आहारी इतके जातात की जनतेने जनतेसाठीच त्यांना निवडून दिलय हे सहज विसरून जातात.

स्त्रीच्या मूलभूत अधिकारांवरच बंदी, विद्यार्थी आत्महत्या,अवाच्या सव्वा प्रत्येक शिक्षण क्षेत्रातील फी वाढ, आवरता न येणारी बेरोजगारी, बळीराजाची पिळवणूक, प्रत्येक क्षेत्रात फोफावलेला भ्रष्टाचार, राजकारण्यांचा मनमर्जी कारभार,तरुणाईचं वाढत व्यसनं इतके सगळे प्रश्न आज आवासून उभ्या असताना आपण खरच स्वतंत्र झालोय का?

झालोयच तर नक्की कधी आणि कस.?

वारकरी महिनोंमहिने पायी चालून विठूच्या दरी येतो आणि पूजेचा मान मात्र कोणीतरी तिसऱ्यालाच मिळतो. झेंडावंदनच मानही जवानाला ना देता कोणीतरी तिसरा घेऊन जातो. जातीपातीच्या नावाखाली राजकारण केलं जातं, जाळपोळ,दंगली केल्या जातात. पुराच्या नावाखाली मदत कमी आणि राजकारण जास्त.

तिरंगाच्या प्रत्येक रंगाला विशेष अर्थ आता तुम्हीच सांगा शांतता कुठे आहे, सर्वधर्मसमभाव कुठे हरवलंय आणि खरंच सुजलाम सुफलाम भारत आहे का आज?

ज्या लाखो,करोडो हुतातम्यांनी आपले जीव देशासाठी गमावले,तेही आज म्हणत असतील ज्याच्यासाठी आपण एवढं रक्त सांडलं तो भारत इंग्रजांच्या पारतंत्रत्र्यातुन सध्या फक्त मुक्त झालाय, तो स्वतंत्र तर अजून व्हायचाय.

कोणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही. वास्तव मांडायचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला आहे.. तरी कोणाला त्रास झाला असेल तर क्षमस्व.

लेख लेखिकेच्या नावासाहित शेअर करण्यास काहीही  हरकत नाही.

 

©सरिता सावंत भोसले

 

 

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत