हरवली ती दिवाळी

Written by

 

सण.. सण आपल्यासोबत नेहमीच आनंद,उत्साह आणि नवीन उमेद घेऊन येत असतात.. रोजच्याच धकाधकीमुळे निरुत्साही झालेल्या जीवनाला नवचैतन्य देत असतात.. या सणांचा राजा म्हणजे तुमची आमची सगळ्यांची लाडकी दिवाळी..दिवाळीची खरी मज्जा तिच्या पूर्वतयारीत असते खरंतर..रोज अगदी व्यस्त असणारे पतीदेव फोन बाजूला ठेवून मला साफसफाई करू लागतात..त्या सफसफाईच्या निमित्ताने आम्ही एकमेकांना वेळ देतो,मजाक मस्ती करतो, भांडतो, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवतो, अडगळीत सापडलेल्या प्रत्येक गोष्टींबद्दलच्या आठवणी काढून हसतो, भावुक होतो…रोमँटिकही होतो बरं😜 पण कधीकधी असं वाटतं आज सगळं आहे
पण लहानपणी दिवाळीला जी मज्जा यायची तशी नाही आता येत..
लहानपणी दिवाळी जवळ आली की सुट्टीचे वेध लागायचे..त्यावेळेला शाळेला दिवाळीची गडगंज सुट्टी म्हणजे सातासमुद्रापालिकडचा आनंद असायचा, आता शाळेत परत जावसं वाटतं तो भाग वेगळा पण तेव्हा ती सुट्टी खूप जिवाभावाची वाटायची.. दिवाळी येणार म्हणजे कपडे खरेदी, फटाके खरेदी ही सगळी पूर्वतयारी करायची उत्सुकता काही औरच होती..

मी लहान असताना आम्ही चाळीत राहायचो..मातीची घर… एकदम छोटी छोटी पण माणसांची मनं आभाळाएवढी मोठी होती..पुढे शेणामातीने सारवलेली पडवी आणि भला मोठा ओटा होता सगळ्या घराना..दिवाळीच्या वीस पंचवीस दिवस आधीपासून आमची लगबग सुरू व्हायची..आईला घराची साफसफाई, फराळ, ओट्याची भुई घ्यायची लगबग असायची तर आम्हाला प्रत्येक कामात आईच्या पुढे पुढे करायची..सुरुवात व्हायची ती घराची सफाई करण्यापासून..बरं सफाई म्हणजे अगदी भांडे, डब्बे,बरण्या, मांडणी ,अगदी गोधड्यांपासून सगळं धुवायचे अर्थात आजही आपण सगळं करतोच पण तिथल्या सफाईची मज्जा ही की घर लहान असल्यामुळे सगळं सामान आधी बाहेर पडवीत काढायचं.. मग घराची जाळीजुळी साफ करायची.. खरी मजा यानंतर सुरू व्हायची ती म्हणजे उभ्या मातीच्या भिंती सारवणे.. त्याचीही एक विशिष्ट पद्धत होती बरं..आधी सफेद मातीच्या गोळ्याने भिंतीला पडलेले सगळे खड्डे,भेगा भरून काढायचे(जसं आता आपण पुट्टी भरतो पेंट करण्याआधी) त्याला लिंपणे असं म्हंटल जाते मग एक एकदम जुनी बादली असायची माळ्यावर ठेवलेली(फक्त याच कामासाठी) तिच्यात सफेद मातीचं पाणी केलं जायचं..या पाण्यात एक कपडा बुडवून मग त्याने पूर्ण भिंतींना सारवालं जायचं.. मग आई वरती टेबल, खुर्ची, शिडी जे मिळेल त्यावर चढून वरपासून खालपर्यंत भिंती सारवायची, तिची असिस्टंट म्हणून मी प्रत्येज वेळी तो कापड त्या मातीच्या पाण्यात भिजवून पिळून तिच्या हातात द्यायचं काम करायचं.. त्याला पोचारणे असं म्हंटल जातं ग्रामीण भाषेत..जशी आपण भिंतीला रंगरंगोटी करतो तसंच पण आजच्या या महागड्या रंगांना त्या मातीच्या शुभ्र रंगाची सर कधीच येऊ शकणार नाही.. हे झालं घर सारवणे..

त्यानंतरची मज्जा म्हणजे हे काम अगदी एक दिवसात काही पूर्ण व्हायचं नाही मग सगळं सामान बाहेर पडवीतच पण भूक जाम लागलेली असायची मग त्या दिवशीचा मेनू फिक्स खिचडी नाहीतर पिठलं भात..अहाहा..जगातल्या कुठल्याच पंचपक्वानात त्या पिठलं भाताचा स्वाद नाही..मग आई जेवण बनवायला सुरवात करणार तिथेच पडवीत पण मीठ,तेल सगळं शोधण्यापासून मदत करायची आईला..भावंडांनी आणि सामानांने भरलेल्या घरात नेमकीच मोकळी जागा मिळायची.. वर्षभरात एकदाच रिकामं घर बघायला मिळायचं..मग काय आम्ही भावंडं नूसती आरडाओरड आणि दंगा करायचो.. त्या रिकाम्या घरात घुमणारे आमचे आवाज आजही माझ्या कानी येताय…जेवण फस्त करून झालं की तिथेच अंथरूण टाकून कसंही लोळायचं..सामान सगळं उघड्यावरच ठेवून हा..पण कसलीच भीती नाही वाटायची ना चोरीची ना कशाची..चोरी करण्यासारखं तेव्हा काही नसायचंच..होती ती फक्त माणुसकी,प्रेम,जिव्हाळा..ते कस कोण चोरणार ना?? घराच्या रंग रंगोटीचे काम झालं की पुढचं काम भांडे, डब्बे, मांडण्या सगळं घासून स्वच्छ धुणे, त्यातली मज्जा अशी की आम्हाला खूप पाण्यात खेळायला मिळायचे.. पाईपने एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणे, एकमेकांना ओलं करणे जणू काही आम्हाला स्वर्गसुख देऊन जायचा.. आम्ही भावंडं आईची मदत कमी आणि एकमेकांशी हुज्जत जास्त घालायचो मग आईचे धपाटे पडायचे..😊हे सगळं आटोपलं की सामान लावायचे.. एवढुश्या घरात सामानाची जागा बदलून,फेरबदल घराचं रुपडं पालटायच…चकाचक घर पाहिलं की कसला भारी फील यायचा..एक अजून भारीच काम म्हणजे गोधड्या धुणे.. ते माझं सगळ्यात आवडीचं काम कारण गोधड्या धुवायला आम्ही नदीवर जायचो..खरंतर त्याने जलप्रदूषण होतं पण त्यावेळेला कुठे एवढे ज्ञान होतं ना.. आजूबाजूच्या बायका सगळ्याच गोधड्यांची बोजकी बांधून दुपारचे जेवण सोबत घेऊन आम्हा मुलांना घेऊन नदीवर जायच्या.. त्यांच्यासोबत आम्हीही गोधड्या धुवू लागायचो, पाणी खेळायचो..तिथेच खडकावर गोधड्या वाळायला घालायचो आणि नदीकाठी खडकावर बसून खाल्लेली चटणी भाकरी काहीतरी वेगळंच समाधान देऊन जायची…

घरासमोरच्या ओट्याची भुई घेतली जायची.. पावसामुळे माती वाहून गेल्यामुळे ओबडधोबड झालेल्या ओट्याला खंदून पुन्हा मातीची भर देऊन चोपून, सारवून एकदम सपाट केलं जात असे.. कारण दिवाळीला रांगोळी याच ओट्यावर काढायची असायची ना..
मग लगबग व्हायची ती फराळ बनवायची.. चाळीमध्ये खूपच उत्साह असायचा फराळ बनवण्यात कारण प्रत्येकाच्या घरी दिवाळीला भरलेलं फराळाच ताट द्यावं लागायचं..असा काही नियम नसतो म्हणा पण तेव्हा आवर्जून बायका एकमेकींना फराळाचे ताट घेऊन जायच्याच.. एकमेकीना मदतही करू लागायच्या..आणि आम्ही मुलांना प्रत्येक घरी देवाच्या आधी फराळाचा नैवेद्य मिळायचा बरं..
दिवाळीच्या दिवशी नवीन कपडे घालून लक्ष्मीपूजन करून आम्ही भावंडं फटाक्यांची वाटणी करून मिरवायचो सगळीकडे.. सगळीकडे मातीच्या पणत्याच पणत्या,आकाशकंदील, मोठमोठ्या रांगोळ्या…सगळ्यांच्या घरून येणार पुरणपोळीचा खमंग वास..अहाहा!!!!

आज ना तर तशी दिवाळी आहे ना तर ती दिवाळीची तयारी.. आता मोठ्या मोठ्या खोल्या आहेत पण त्यात राहायला एवढी माणसं नाहीत.. आज भिंतीला महागडे पेंट आहेत पण त्या सफेद मातीतला ओलावा नाही…घरात पांढरीशुभ्र फरशी आहे पण शेणाने सारवलेली भुई नाही.. विकत आणलेल्या फराळाला चाळीतल्या फराळाची सर नाही, घरीही बनवलं तरी त्याला आईच्या हातची चव नाही… गडगंज फटाके घेऊ शकतो आज पण ते फोडायला आणि वाटे पडायला भावंडांची सोबतही नाही…कृत्रिम मेणाच्या दिव्यांमध्ये मातीच्या पणत्यांची मजा नाही…दिवाळीची सुट्टी आहे पण गप्पा मारायला मित्रमैत्रिणी नाही..

दिवाळी आजही तितकीच प्रिय आहे पण तिच्यातली मजा कुठेतरी हरवली आहे हे नक्की.. आताही पूर्वतायरीत मजा येतेच तशी..कालच घर सफाईला काढले मी.. अडगळीत जुना अल्बम आणि माझी डायरी सापडली..त्यातले जुने फोटो बघता बघता बालपणात हरवले आणि मग हे सगळं आठवलं…सुचलं..मग विचार आला पूर्वतयारीमुळे का होईना पुन्हा त्या जगात वावरून आले, फेरफटका मारून आले.. वाचून बऱ्याच मित्रमैत्रिणी ज्यांनी थोड्याफार प्रमाणात अशी दिवाळी अनुभवली असेल त्यांच्याही आठवणीना उजाळा मिळाला असेल… आवडल्यास लाइक, कमेंट, शेयर नक्की करा…

©®सुवर्णा राहुल बागुल

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा