हरवलेलं माहेर…

Written by

©अर्चना anant धवड

निधी खिडकीतून बाहेर बघत होती… सायंकाळ चे सहा वाजले होते… भाऊबीजेचा दिवस.. तिला फार उदास वाटत होत. छोटीशी चंद्रकोर आकाशात दिसली.. तिला आईची आठवण आली.. लहानपणी भाऊबीजेला आई चंद्राला ओवाळायची..

आई, आपण चंद्राला का ओवाळतो  ग?

अग, ज्यांना भाऊ नसतो, किंवा भाऊ लांब असतो.. त्या भावाला ओवाळू शकत नाही म्हणून त्या चंद्राला ओवाळतात.

काही पण.. मी तर आपल्या भावालाच ओवाळनार …

ओवाळशील ग बेटा…. त्यासाठी लग्न झाल्यावर माहेरी यावं लागत…

मग काय झालं…. मी येणारच दर दिवाळीला…

तिच्या मनात आठवणी दाटून आल्या… तिला भावासोबत घालवलेली प्रत्येक भाऊबीज आठवली..

निधीचे  बाबा वारले तेव्हा ती  बारावीत अणि भाऊ चार वर्षाचा… चार बहिणी एक भाऊ… ती  सगळ्यात मोठी…. तिच्या आईनी तिच्या परीने सगळे व्यवस्थित पार पाडले… त्यांना  शिकवले… सगळ्यांची लग्न केली…  भाऊ  साऱ्यांचा खूप लाडका…. आई, बहिणी हेच त्याच विश्व…. निधीचे  लग्न झाले तेव्हा असेल आठ, नऊ वर्षाचा…. सासरची दिवाळी झाली की निधी  भाऊबीजेला माहेरी…  भाऊ पण वाट पहायचा कारण लहान मुलांना एक ड्रेस पण खूप असतो अणि तोही ताई नी म्हणजे कौतुक…. नंतर  सगळ्या बहिणींची लग्न झाली अणि त्याला एक च्या जागी तीन ड्रेस मिळायला लागले…. तेव्हाही तो लहानच होता…. जस जसा मोठा झाला तसा त्याचा ड्रेस चा इंट्रेस्ट कमी झाला…. मग तो म्हणायचा… कशाला ग ताई….. पण त्यांची  भाऊबीज मात्र सोबत ठरलेलीच असायची….त्यात कधी खंड पडला नाही…

                    तो कमवायला लागला…. अणि त्यांच्या भाऊबीजेचे स्वरुप बदलले… आता त्या  बहिणी त्याच्या साडीची वाट पाहायच्या ….. तस बघितलं तर सगळ्या आपल्या घरी सुखी होत्या. त्यांना काही कमी नव्हते…. पण दिवाळीच्या महिन्यापुर्वी भावाचे  सुरू व्हायचे ताई तुम्ही साड्यांची खरेदी करून घ्या ना…. बाबा नसल्याने जी हौस, कौतुक, निधीचं आणि तिच्या बहिणीचं  माहेरी झाल नसेल ते सगळे त्यांचा भाऊ त्यांचं करायचा. .. दिवाळीच्या  खरेदीला तो क्रेडिट कार्ड द्यायचा…. दहा हजाराची साडी घेतली तरी मनाई नसायची….. बहिणी समजदार होत्या.. इतकी महाग कधीच नाही घ्यायच्या   भाग वेगळा….

                            नंतर त्याचे लग्न झाले…. लग्न झाल की मूलं बदलतात पण निधीचा भाऊ मात्र त्याला अपवाद होता…. तो आताही त्यांना दिवाळी ला तो क्रेडिट कार्ड द्यायचा अणि म्हणायचा जा… तुम्हाला जी साडी घ्यायची ती घ्या….

                     आज लग्नाला पंचवीस वर्ष झाले.. एकही वर्ष सुटले नसेल कि ती दिवाळीला माहेरी गेली नसेल …

पंचवीस वर्षात असं पाहिलांदा घडलं होत…

वर्षांपूर्वी भावाचा अपघाती मृत्यू आणि तो  धक्का  बसून आईचा मृत्यू..

पण तिने ठरविले होते.. भाऊ नाही तर काय झालं.. भावजय तर आहे.. भावाच्या आठवणी आहेत.. मी जाणारच दिवाळीला….

वहिनीला फोन केला, अग मी येते दिवाळीला.. तू कधी येते परत माहेरून

ताई, मी पंधरा दिवस इकडेच थांबणार…

ठीक आहे.. म्हणून फोन ठेवला…

आज खरंच तिला जाणवलं आपल माहेर कायमच हरवलं…

तिने खिडकीतुन  दिसणाऱ्या चंद्रकोरीकडे  पहिले.. तिला त्यात तिचा भाऊ दिसत होता….. तिने मनोमन हात जोडले..

आई, काय बघतेस ग … तुला कधीची आवाज देते.. निधी  च्या मुलीने तिला आवाज दिला..
अग आई, ही पोस्ट वाचली का फेसबुक वर.. ज्यांना माहेर नाही त्यांना माहेरचं सुख देणारी संस्था  आहे…

तिने मुलीला जवळ बसवल. बेटा, प्रत्येक नात्याला पर्याय नसतो .. आणि रक्ताच्या नात्याला तर नसतोच नसतो…

आईच प्रेम आणि भावाच्या मायेला पर्याय नसतो… आणि तो शोधूही नये बेटा…..

आपल्या नशिबाचा भाग म्हणून स्वीकारायच असत  आणि त्यांना आपल्या आठवणीत कायम जपायचं असत..

©अर्चना अनंत धवड

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा