हरितालिका व्रत… आमच्याकडली पद्धत

Written by

हरितालिका….एक व्रत…ती करण्याचीआमच्याकडली पद्धत ✍️©®जयश्री कन्हेरे सातपुते
घराघरामध्ये गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु झालेली आहे… पण गणेश आगमना आधी “हरितालिका व्रत” असत. महिला खुप भक्तिभावाने हे व्रत करतात. या हरितालिकेच्या व्रताची तयारी खुप मनोभावे केली जाते.

हरितालिकेचं हे व्रत आपल्या पतीसाठी केलं जात असल्यामुळे या व्रताचं महत्व अनन्यसाधारण आहे. वटपौर्णिमा जशी, तशीच हरितालिका देखील केली जाते पूर्ण श्रद्धेने.

हरितालिका हे व्रत भाद्रपद शुल्क तृतीयेला केले जाते. भगवान शंकर आपल्याला पती रुपाने मिळावा यासाठी पार्वती देवीने हे व्रत केलं होतं.

एका गुहेत देवी पार्वती तिच्या मैत्रिणी सोबत गेली होती, तिथे तिने वाळूची लिंग पिंड स्थापन केली… त्यावर विविध प्रकारची फुले आणि पाने अर्पण केली. मनोभावे भगवान शंकराची आराधना केली

“तुम्हींच(शंकर भगवान ) मला पती म्हणून लाभावे” ही इच्छा मनात ठेऊन देवी पार्वतीने ही पूजा केली होती. दिवसभर देवी पार्वतीने काहीच खाल्लं नाही… म्हणजे उपवास घडला..

रात्रभर मैत्रिणीसोबत गाणे म्हंटले, भजन केले, या सगळ्यात दिवस कधी उजाडला हे कळलंच नाही..( रात्रभर जागरण करण्याची पद्धत म्हणूनच लागली असावी) सकाळी उठून.. देवी पार्वतीने नदीवर अंघोळ केली.. पुन्हा मनोभावे त्या लिंगपिंडीची पूजा करून आरती केली आणि नंतर तिचे विसर्जन नदीच्या प्रवाहात केले.

पार्वतीच्या या भक्तीला प्रसन्न होऊन भगवान शंकर तिला प्रसन्न झाले व वर मागायला लावला.. तेंव्हा देवी पार्वतीने “तुम्ही मला पती म्हणून मिळावे ” असा वर मागितला होता.

आणि

शंकर भगवान ने प्रसन्न होऊन त्यांना तथास्तु म्हंटल होत.

असं हे व्रत आहे. हे व्रत कुमारिकेपासून लग्न झालेल्या महिलांपर्यंत सर्व जणी करतात.

कुमारीकेला मनासारखा वर या व्रताने मिळतो असं म्हणतात..

विशेष म्हणजे हे व्रत दरवर्षी न चुकता केलं जातं. सौभाग्यप्राप्तीसाठी आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी.

अनेकजणी तर हे व्रत निर्जळी किंवा उपाशी राहून करतात. असं नको करायला.. उगाच नवऱ्याचं आयुष्य वाढवण्याच्या नादात आपल आयुष्य कमी व्हायचं.????(ज्याच्या प्रकृतीला झेपेल त्यांने नक्की करावं. पण आपली तब्येत बरी नसताना उगाच उपवासाचा अट्टाहास नको )

हरितालिका म्हणजे पार्वती माता.. त्यामुळे बऱ्याच जागी..आमच्याकडे, परड्यात गहू पेरले जातात… आठ नऊ दिवसाआधी.. म्हणजे छान ती जव मोठी होते आणि मधे पिंडीच्या आकाराची जागा ठेवतात….तिला आमच्याकडे गौराई म्हणतात..

मग हरतालिकेच्या दिवशी ( माझ्या आईकडे नागपूर जिल्हा ) आई, शेजारच्या काकू, आणि आम्ही मुली (आणि मुलंही यायचे नदीत पोहायला)छान सजून, साडी घालायच्या मुली देखील… नदीवर जायचो. नदीवर जाऊन ती गौराई रुपी पार्वतीला, गाणे म्हणत म्हणतं, पाच जणी हात लावून नदीतून धुऊन काढत असायचे..

नदीच्या काठावर पाणी टाकून जागा स्वच्छ करून नंतर त्यावर ती गौराई ठेवल्या जायची..

पुन्हा पाच स्त्रिया मिळून नदीतील वाळू (रेती ) काढत असे… ते करताना गाणी सुद्धा म्हणतं असे.

त्यानंतर गौराईच्या मधे जो पिंडीचा आकार रिकामा असायचा तिथे ती वाळू ठेऊन तिची पिंड तयार केली जायची.

माझ्या साठी व माझ्या बहिणीसाठी देखील आई छोट्याश्या टोपलीत गौराई पेरायची. आणि मी माझ्या मुलींसाठी तसंच करते.

माझी आई हळदीची सुद्धा एक छोटी पिंड बनवून त्या गौराईत.. वाळूच्या पिंडी शेजारी ठेवायची.

मनोभावे सगळ्यां स्त्रिया त्या प्रतीकात्मक शिव पार्वतीची पूजा करायच्या, आरती करायच्या, तूप आणि गुळाचा नैवेद्य दाखवायच्या (उपवास असतो न.. म्हणून ).

नदीकाठावर असलेल्या मंदिरात पूजा करायच्या आणि मग घरी येउन.. सजवलेल्या जागी म्हणजेच जिथे छान चौरंग ठेवलेला असायचा, त्याला आंब्याच्या पानाचे तोरण लावलेलं असायच, केळीची पिल(छोटे केळीचे झाड ) आणि ते नसेल तर पाच केळीची पाने चौरंगाला नीट बांधल्या जायची, चौरंग ठेवण्या आधी तिथे एक स्वस्तिक काढायची आई. त्या चौरंगावर कोरा कापड किंवा ब्लाउज पीस.. किंवा विकत मिळतात ते सुशोभित कापड टाकलं जायचं..सुंदर अशी रांगोळी चौरंगासभोवताल आई काढायची. त्यावर तांदुळाची छोटी रास टाकून.. गौराई मातेची स्थापना केली जायची.
गणपती, कलश स्थापन केला जायचा, त्यानंतर पुन्हा पाच प्रकारच्या धान्याच्या राशीं ठेऊन त्यावर पाच प्रकारचे फळ ठेवत असे. पाच केळी वेगळीच ठेवत असे माझी आई या फळांव्यतिरिक्त.

फुलांचे हार, गौराईला, कलशाला चढवले जायचे.. बादाम, खारीक, सुपारी, या सुद्धा पाच पाच ठेवत असे..

सोळा प्रकारच्या वनस्पतीची सोळा -सोळा पान, त्याच्या जुड्या बांधून गौराई मातेला व वाळूच्या पिंडीला अर्पण केली जायची. या पानाची जुळवाजुळव आधल्या दिवशीच करावी लागायची, त्यामुळे हरितालिका व्रताची तयारी देखील आधल्या दिवसापासूनच सुरु व्हायची. हे सगळं करतांना फार मज्जा यायची. आणि निसर्गाचा अनुभव जवळून घेता यायचा, विविध प्रकारच्या वनस्पतीची माहिती मिळायची. माझी आई पिंडीला 108बेलाची पाने देखील अर्पण करत असे.

चौरंगाच्या दोन्ही बाजूला दोन समई ठेवल्या जायच्या. आणि चौरंगावर नंदादीप अखंड गौराई विसर्जन होईपर्यंत तेवत असे.

अशा प्रकारे गौराईची स्थापना झाल्यावर पुन्हा आरती व्हायची घरी, मग दिवसभर हळदीकुंकू व चहापाणी हा कार्यक्रम चालायचा महिला वर्गाचा. रात्री पुन्हा पूजा आरती, नैवेद्य दिला जायचा. आणि मग सर्व महिला मंडळ, आम्ही मुली देखील एकत्र जागरण करायचो, पाळणे बांधले असायचे, गाणे म्हणणे, फुगड्या खेळणे, भजन अशा सर्व कार्यक्रमात रात्र कधी संपायची कळायचंही नाही.. मी झोपायचे बर का.. मला नाही जमलं कधीच रात्रभर जागणे. ??

सकाळी अंघोळ करून गौराई मातेसाठी पुरणाचा नैवेद्य केला जायचा. आणि नंतर कालच निर्माल्य काढून त्याजागी नवीन फुले, हार चढवले जायचे, दीप, धूप,निरांजन या सगळ्यांनी वातावरण प्रसन्न होऊन जायचं. घरी नैवेद्य दाखवून, आरती केली जायची. आणि मग गौराई मातेला घेऊन पुन्हा नदीवर विसर्जन करायला जात होते..

पूजेवर ठेवलेल्या फळांचे छोटे छोटे काप करून त्यात भिजवलेली हरभऱ्याची डाळ, साखर आणि ओल खोबरं टाकून खुप मोठा प्रसाद तयार केला जायच्या, प्रत्येकाच्याच घरी.. तो घेऊन नदीवर जात असे..

पुन्हा नदीकाठावर पूजा आरती करून.. नदीत गौराई मातेच.. वाळूच्या पिंडीसहित विसर्जन केल जात असे.

त्यांनतर.. प्रसाद वाटला जायचा, तो इतका छान लागायचा आणि खुप सारा मिळत असे..त्यामुळे पोटच भरून जायचं, ज्यांचा उपवास असायचा त्यांचे देखील पोट त्या प्रसादाने भरून जायचं..

अशा प्रकारे, आमच्याकडे गौराई/हरितालिका पूजा केली जाते. विविध जागी विविध पद्धती आहे..

काही जागी फक्त वाळूची पिंड काढून त्याची पूजा केली जाते, त्याला सोळा प्रकारची पाने अर्पण केली जातात, पूजा मांडली जाते, स्त्रियांना हळदीकुंकवाला बोलावून, त्यांची ओटी भरल्या जाते केळी , खारीक त्यासोबत तांदूळ. चहा, कॉफी, दुध जस जमेल तस दिल जात त्यामुळे दिवसभर उपवास आहे याची जाणीव होत नाही ??.

मी माझ्या आईकडील पद्धतीनेच हे व्रत करते. अधिक माहिती “हरितालिका व्रत “या पुस्तिकेत आहे, जी मला लग्नाच्या पाच वर्षानंतर मिळाली, त्याआधी मी लहानपानापासून बघत आलेल्या पद्धतीनेच हे व्रत करत आले आहे..

ज्यांना जसं जमेल तस हे व्रत करावं, आपली तब्येत सांभाळून, उपवासाचा अट्टाहास नको. कारण देव भक्तीचा भुकेला आहे.. उपवासाने देव प्रसन्न झाला असता तर देशात गरीब राहिले नसते (हे माझ वयक्तिक मत आहे )

उपवास म्हणजे शरीर शुद्धीचा एक दिवस पण… मी यावर बोलायलाच नको… कारण विविध फराळाच्या रेसिपी ट्राय केल्या जातात न.. ???.

मला लिहावंसं वाटल माझ्याकडली पद्धत..तुमच्याकडील पद्धत नक्की सांगा.. धन्यवाद ?like करा, शेअर करायचा असेल तर नावासहित करा…, ©®जयश्री कन्हेरे सातपुते.. फोटो माझ्या मोबाईल कॅमेऱ्यातून साभार..

प्रतिक्रिया व्यक्त करा