हर्ष

Written by

#हर्ष

आज दिवाळीची पहिली पहाट.वासंती व विजय एकटेच बसले होते .विजयराव ऐंशीच्या आसपास तर वासंती सत्तरीची.
पहाटे उठून वासंतीने सचैल स्नान केलं.मग विजयरावांना उठवलं. त्यांना सुगंधी तेल चोपडलं.स्वत:च्या हाताने बनवलेलं घरगुती उटणं त्यांच्या सर्वांगाला लावलं व न्हाऊमाखू घातलं.त्यांना अंग पुसायला पंचा दिला,नरकासुराचा वध करण्यासाठी कारेट आणून दिलं.तुळशीसमोर दिवा लावला.विजयरावांनी गोविंदा गोपाळा म्हणत कारेट फोडलं.कपाळाला विजयाचा तिलक लावला.दरवर्षीसारखंच जरासं कारेट्यात बोट बुडवून
वासंतीच्या अपरोक्ष तिच्या तोंडात ते कडू बोट घातलं.

वासंती म्हणाली,” काय हे,पुरे झाली थट्टा.मेलं ते कारेटही कडू राहिलं नाही पहिल्यासारखं.”

विजयराव मात्र खुदकन हसले.कालच पानांत गुडाळून आणलेला मोगऱ्याचा गजरा त्यांनी अलगद थरथरत्या हातांनी सोडला व वासंतीच्या इवल्याशा वेणीत सेफ्टीपीनने माळला.

विजयरावांच्या हौशी फार सुवासिक.बायकोच्या केसांत गजरा माळायचे व आपण वर्तमानपत्र वाचत बसायचे.मग वासंती घरकाम करताना घरभर फिरत असताना इथेतिथे त्या धुंद मोगऱ्याच्या सुवास सांडे अन् विलासराव तो सुगंध साठवून घेत.

पुस्तकं वाचण्याचंही भारी वेड त्यांना.वासंती बाजारात गेली की आवर्जुन चाफा आणायची .मग विलासरावांच्या टेबलापाशी एक चाफेकळी ठेवायची.तिने यजमानांची आवड या वयातही जपली होती.दोघेही एकमेकांना पुरक होते.

सुमन कल्याणपूरची जुनी गाणी दोघांचीही अत्यंत प्रिय.अशी सुंदर भावगीतं लावून दोघं त्या संगीतात तासनतास बुडून जायचे.

दु:ख नव्हतं का त्या उभयतांच्या जीवनात?

होतं की.ते तर पाचवीला पुजलेलंच होतं.लग्नानंतर दहा वर्षांनी दोन मुलगे झाले पाठोपाठ.एक आनंद दुसरा हर्ष.हर्ष दोन वर्षांचा होता तेंव्हा त्याला मेंदूज्वर झाला..आणि तो कायमचा मतिमंद झाला.केवढं भयाण दु:ख.कैक डॉक्टरांच्या पायऱ्या झिजवल्या छोट्याशा हर्षला घेऊन .पण काही उपयोग झाला नाही.अखेर त्यांनी सत्य स्वीकारलं.

आनंद लहान होता तेंव्हा ठीक होतं.जसजसा मोठा होऊ लागला तसतसं आपल्या लहान भावातलं हे वेगळेपण त्यालाही लक्षात येऊ लागलं.त्यालाही वाटे,आपला भाऊ आपल्यासारखाच असता तर कित्ती मजा आली असती.पण तरीही त्याचं हर्षवर भरपूर प्रेम होतं.आनंद दात घासताना हर्षकडूनही दात घासून घेई.तो आंघोळ करताना हर्षलाही आंघोळ घाली.त्याचे केस विंचरी.सगळं आईच्या मायेने करी.त्यांच्यातला गोडवा पाहून विजय व वासंती त्रुप्त व्हायचे.

आनंदमुळे हर्ष बरेच शब्दही बोलायला शिकला.स्वतःची स्वच्छता करायला शिकला.चाळीतली मुलंही हर्षला फारच प्रेमाने वागवत.हळूहळू दोघे मोठे झाले.आनंद नोकरीला लागला.हर्षची शाळा मात्र चालूच होती.रोज सकाळी वॉटरबॉटल,दप्तर,गणवेश,हातात घड्याळ,खिशात मोबाईल असा तो त्याच्या शाळेत जाई.

आनंदचं लग्न करताना शलाकाला हर्षबद्दल पूर्ण माहिती दिली होती.शलाकालाही त्यात काही वावगं वाटलं नाही.घरात वहिनी आल्यामुळे हर्षही खूश होता.वहिनीचा लाडका झालेला.डब्बा वहिनीनेच भरला पाहिजे,चहा वहिनीनेच दिला पाहिजे असा हट्ट करी.शलाकाही त्याचे सगळे हट्ट पुरवी.विजय व वासंतीच्या डोक्यावरचे टेंशन मिटले होते..पण..नियतीला हे मान्य नव्हतं.

एकेदिवशी विजय आपल्या खोलीत पुस्तक वाचत बसले होते.वासंती शेजाऱ्यांकडे गेली होती व आनंद कामावर ..शलाका केसावरून न्हाली होती.घरभर शिकेकाईचा दरवळ पसरला होता.बारीक फुलांच्या गाऊनमध्ये फार मोहक दिसत होती.तिने देवाची पूजा केली.तुळशीला पाणी घातले व माजघरात ताकाची कढी करत होती.ताकाची कढी हर्षला फार आवडायची.हर्षला कसलीशी सुट्टी होती.

शलाकाला कोणीतरी मागून येऊन गच्च मिठी मारली.ती खूप भांबावली.तिला क्षणभर काही कळलंच नाही.मग हर्षच अस्तित्व कळताच तिने जोर लावून त्याच्या हातांचा विळखा सोडण्याचा प्रयत्न केला पण ती मिठी अधिकाधिक गच्च होत गेली.तेवढ्यात तिथे विलासराव चहाचा कप ठेवायला आले.त्यांनी सण्णकन हर्षच्या मुस्काटीत मारली. शलाकाला त्याच्या विळख्यातून सोडवलं.हर्ष बाहेर जाऊन धुमसत बसला.
घराला ग्रहण लागल्यासारं झालं.चूक शलाकाची नव्हती.हर्षची होती का? नाही त्याची तर मुळीच नव्हती.त्याचा मेंदू जरी वाढला नव्हता तरी शरीर वाढत होतं. शरीराच्या वाढीसोबत शरीराला देहोपभोगाची जाणीव झाली होती.

रात्री विलासरावांनी घरातल्या सगळ्यांना विश्वासात घेतलं.आनंदला सांगितलं,”मी तुमच्यासाठी ब्लॉक बुक केलाय.उद्यापासून तिथे जाऊन रहायचं.इथून तासाभरावर आहे.नाही म्हणायचं नाही.माझी एवढीच इच्छा पुरी करा.”
आनंदला वासंतीने घडलेली हकीगत सांगितली होती.पण वेगळं रहायचा विचार त्याला पटत नव्हता.तरी विजयरावांनी त्यांचं गाठोडं नवीन ब्लॉकमध्ये हलवलं.

हर्षला सांभाळायला एक पन्नाशीचा गावाकडचा माणूस आणून ठेवला.आनंद व शलाका अधूनमधून घरी भेट देऊन जायचे.पुढे आनंद त्याच्या कुटुंबाला घेऊन अमेरिकेला स्थायिक झाला.हर्षची शाळा सुरु होती.विजय व वासंती प्रौढ होत होती.काही वेळा हर्ष पिसाळायचा.त्याला गप्प करताना विलासरावांचे नाकीनऊ येत.त्याचं अती झालं की मारावं लागे मग तो रडतरडत निजे.मग त्याच्या गालावरून हात फिरवत विजयराव खूप रडत.अगदी आभाळ फुटल्यासारे रडत.वासंती त्यांना सावरे.मग लहान बाळासारखे वासंतीच्या मांडीवर झोपून जात.

आनंदला बढत्या मिळत होत्या.शलाकाही तिथे नोकरी करत होती त्यांना एक चिऊ नावाची लेक होती.अधुनमधून ते कुटुंब सणासुदीला भारतात येई.चिऊही काकाशी फार गोड वागे.

हर्षचा बेचाळीसावा वाढदिवस होता.त्याचदिवशी पुन्हा त्याला सडकून ताप आला.दोन दिवस हॉस्पिटलमध्ये होता.अखेर त्याची प्राणज्योत मालवली.विलासराव आतून तुटले.आनंदही लगेच कुटुंबाला घेऊन आला.दिवस झाल्यावर त्याने व शलाकाने त्यांना अमेरिकेत येण्यासाठी आग्रह केला.पण विलासरावांनी नकार दिला.

विलासराव व वासंतीच्या दुनियेत दाट ,मिट्ट काळोख झाला होता.एकदा हर्षच्या शिक्षिका त्यांना भेटायला आल्या.त्यांनी त्या दोघांनाही हर्षच्या शाळेत रोज येण्याचं आर्जव केलं.मग उभयता घरातली कामं झाल्यावर रोज हर्षच्या शाळेत जाऊ लागली.तिथे त्यांना त्यांचा हर्ष पुनश्च गवसला.रोज या मुलांना काही खाऊ नेऊन देणे,त्यांना गोष्टी सांगणं,त्यांना हस्तकला शिकवणं यात त्याचं मन रमू लागलं.मुलंही आवडीने या आजीआजोबांची वाट बघू लागली.विलासरावांना व वासंतीला जगण्यातला सूर नव्याने गवसला.

नरकचतुर्दशीदिवशी ठीक दहा वाजता सगळं आवरल्यावर विलासराव व वासंती शाळेत गेले.आज शाळेत कार्यक्रम होता.मुलांनी बनविलेले कंदील,पणत्या ,भेटकार्डे विक्रीला ठेवलेली.मुलंच वस्तू विकत होती.कोणी वस्तू विकत घेतल्यावर त्यांच्या बोलक्या डोळ्यांत जे निखळ हसू दिसेना ते लाख रुपये मोजले तरी कुठे सापडणार नाही इतकं अनमोल होतं.

आज विलासरावांनी व वासंतीने शाळेला या हिऱ्यांच्या वसतिगृहासाठी देणगी दिली.तसे तिथे जमलेल्या इतरही ग्राहकांनी आपल्या परीने देणगी देऊ केली.
विलासरावांच्या डोळ्यांत त्यांचा हसरा,बोलका हर्ष चमकत होता.

———–गीता गजानन गरुड.आंब्रड,मोगरणेवाडी.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा