हळदीकुंकू

Written by

#हळदीकुंकू

वासुअण्णा गेल्यापासून सिंधूताई फारच अबोल झाल्या होत्या.
नटण्याथटण्याची कित्ती आवड होती सिंधूताईंना!
चेहऱ्याला टाल्कम पाऊडर लावून कपाळाला मोठं गोल कुंकू लावायच्या. किती शोभायचं त्यांना! वेणीचा शेपटा,त्यात जाई,जुई,अबोली,मोगऱ्याचा गजरा तर कधी चाफ्याचं फूल,कधी फुललेला हसरा गुलाब. विमलची बारीक फुलाफलांची साडी,मेचिंग ब्लाऊज,छान छान पर्सेस, नेलपेंट,मेंदी सारं सारं आवडायचं त्यांना.

पावसात वासुअण्णा जिन्यात घसरले ते जागेवरच बसले. सिंधूताईंनी सगळी सेवाशुश्रुषा केली त्यांची. पण नियतीच्या मनात काय होतं,ते देवाचं बोलवणं आलं नी एके रात्री वासुअण्णा गेले. चार महिने होत आले या गोष्टीला पण सिंधुताईंनी जणू स्वतःला मिटूनच घेतलं होतं. कोणाशी बोलणं नाही काही नाही.

एकेक सण आला की सणाच्या दिवशी सिंधूताईंना अगदी भरुन येई. कधी न्हाऊन आल्या की नकळत त्यांचा हात पिंजरीच्या डबीकडे जाई. मग त्या एकट्याच रडत बसत.

टेरेसमधला जाईचा वेल तर छान फोफावला होता. बरीच फूलं मिळत. सिंधूताई काही फूलं देवाला वहात पण त्यांनाही वाटे आपणही गजरा करुन माळावा पण मग वैधव्याची आठव होऊन त्या अधिकच केविलवाण्या होत.

मार्गशिर्षातल्या गुरुवारचं उद्यापन होतं. सिंधुताईंच्या समोरच्या ब्लॉकमधली वीणा सकाळीच जाऊन फुलं,फळं,वेणी,गजरे घेऊन आली. दुपारी नवरा व मुलगी आपापल्या कामांना गेल्यावर फुरसतीने तिने पूजा मांडायला घेतली. रांगोळी काढली.पाटावर तांदूळ ठेवले. कलशात पाणी भरुन घेतले. त्यात सुपारी,एक रुपयाचं नाणं घातलं. पण नेमकं दुर्वा आणायला विसरली. मग तिच्या लक्षात आलं की सिंधुताईंच्या गेलरीतल्या कुंडीत दुर्वा आहेत. ती लगोलग सिंधुताईंकडे गेली.

“काकू, जरा दुर्वा हव्या होत्या.”

“अगं बाहेर का उभी. आत ये.”

सिंधुताईंनी दुर्वा व झाडांवरचे गावठी गुलाबं,पांढरीशुभ्र जाईची फुलं एका परडीत काढली व ती परडी वीणाला दिली. वीणाने त्यांनाही पोथीवाचनासाठी यायचा आग्रह केला तशा त्या दाराला कढी घालून वीणाकडे गेल्या. वीणाने कलशाच्या अष्टदिशांनी हळदकुंकवाची बोटं उमटवली. कलशात फांद्या ठेवल्या. श्रीफळ ठेवलं. त्यावर देवीचा मुखवटा बसवला. देवीला दागिन्यानी नटवलं,वेणी घातली व पाटावर तिची स्थापना केली. मग तिने देवीला दिपाने ओवाळलं. अगरबत्ती,धूप लावला. देवीला दुर्वांनी स्नान घातले व फळं,नैवेद्य अर्पण केला. देवीच्या पाया पडली व पोथीवाचन करु लागली.

महालक्ष्मीचं ते चैतन्यमय रूप पाहून सिंधुताईंना फार बरं वाटलं. त्या पोथी ऐकत बसल्या. पोथी वाचून झाल्यावर वीणा सिंधुताईंच्या पाया पडली,पण त्यांना हळदीकुंकू लावण्याबाबत संभ्रमित झाली. सिंधूताई थोडावेळ गप्पा मारत बसल्या व नंतर त्यांच्या घरी निघून गेल्या.

वीणाचा नवरा अमोल आज लवकरच घरी आला. वीणाला असं गप्प गप्प पाहून त्याने तिला खुलवण्याचा,हसवण्याचा प्रयत्न केला तेंव्हा वीणाने दुपारी तिला सिंधूताईंना हळदीकुंकू लावावसं वाटत होतं व ते न लावल्याने कसं अपराधी वाटत होत होतं ते सांगितलं.

अमोलच्या लक्षात सारा प्रकार आला. त्याने वीणाला सांगितलं की तिने सिंधुताईंना खरंच हळदीकुंकू लावलं पाहिजे होतं. तो त्यांचा मान होता.

मग तर वीणा अजून नाराज झाली. अमोलने तिला म्हंटलं,”अशी नाराज नको होऊस. अगं काही जुन्या रितींचा पगडा असतो आपल्या मनावर त्यामुळे होतं तसं. पण,तू तुझी चूक सुधार. आज संध्याकाळी इतर महिलांबरोबरच सिंधूताईंना आग्रहाने उद्यापनाला बोलाव.

हे ऐकताच वीणाची कळी खुलली. ती मग गेली साऱ्यांना आमंत्रण द्यायला. सिंधुताईंना आग्रहाचे आमंत्रण दिले तिने. अमोलने मस्त मसालादूध बनवलं. वीणा छान पैठणी नेसली. साऱ्या बायका एकेक करुन येत होत्या पण सिंधुताई येत नव्हत्या. मग वीणा परत गेली त्यांना बोलवायला. तिने बळेबळेच सिंधूकाकूंना त्यांची आवडती लाल रंगाची साडी नेसायला लावली व तिच्या घरी त्यांना हाताला धरुन घेऊन आली.

वीणाने इतर बायांसोबत सिंधूताईंना हळदकुंकू लावलं. त्यांच्या वेणीत गजरा माळला. फळ देऊन त्यांची ओटी भरली व दोघांनी मिळून त्यांना नमस्कार केला. इतर बायांनाही हे फार आवडलं. साऱ्यांनी सिंधुताईंना मग आपापल्या घरी हळदीकुंकूला बोलावलं व असंच नेहमी छान रहाण्याचा आग्रह केला.

दुसऱ्यादिवशी वीणा कपडे वाळत घालायला टेरेसमध्ये गेली. अमोल तिथेच खुर्चीवर पुस्तक वाचत बसला होता. वीणाचं लक्ष सिंधुताईंच्या टेरेसकडे गेलं. सिंधूताईंनी आज पुर्वीप्रमाणे ठसठशीत कुंकू लावलं होतं. छान वेणी घालून त्यात गजरा माळला होता व कॉफी पित जुना अलबम चाळत होत्या. अमोलचंही तिकडे लक्ष गेलं.

अमोल वीणाला म्हणाला,”बघ वीणा,काल आपण उचललेल्या एक धीराच्या पाऊलाने सिंधूताईंत किती बदल झाला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघ. हेच तर मी माझ्या आईच्या चेहऱ्यावर शोधायचा प्रयत्न करत असे कारण माझे वडील माझ्या लहानपणी गेले. तेंव्हापासून आजूबाजूचे तिला हळदीकुंकवाला, डोहाळजेवणाला..मुद्दामहून वगळत असतं. आईच्या चेहऱ्यावरचं त्यावेळचं ते दु:ख,तिला वाटणारा एकाकीपणा टोचायचा मला. आई हळूहळू मिटत गेली दु:खाच्या खोल डोहात. तुला नंतर तिला झालेला अल्झायमर ठाऊकच आहे. माझ्या आईला जर समाजाने मानाने वागवलं असतं तर कदाचित ती आज आपल्यात असली असती.”

वीणाने अमोलच्या खांद्यावर हात ठेवला व म्हणाली,”आपण सिंधूताईंसारख्या इतर स्त्रियांना मानाने जगायला शिकवूया. हे तर आपण नक्कीच करु शकतो नं.”

——–गीता गजानन गरुड,आंब्रड.

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.