हितगुज

Written by

#हितगुज

रमाई: काय सुधाकाकू एकट्याच बाकावर बसलात त्या.दिवाळीला लेकाकडे गेला नाहीत का?

सुधाकाकू: अगो मी ठीक जाईन पण त्यांनी बोलवावयास हवे ना.माझ्या मेलीचा कंटाळा गो सुनेला.तिच्या आयशीशी बरे गुलूगुलू बोलेल.सासरकडची चार पावणी गेली की रक्तदाब वाढतो हो तिचा, कारंजासारखा.माहेराकडची गेली की हिची कळी लगेच खुलते.,स्वैंपाक बनवते त्यास ना काडीची चव ना रव.बोलायला गेलं तरं खायला उठेल.नवऱ्यालाही मुठीत ठेवले आहे हो.नुसता नंदीबैलासारखी मान डोलवतो.

रमाई: वाटत नाही ओ काकू ,मिना एवढी वाईट.

सुधाकाकू: अगं बाई दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं.तिच्या गोडूस बोलण्याला भाळला ग प्रदीप माझा.कधी माझा लेक माझ्या शब्दाबाहेर नव्हता बघ.आत्ता नुसता बायकोचा पदर धरून असतो.बाईलवेडा कुठचा.
तुला म्हणून सांगते,अगं बाईच्या जातीने कसं चार पैसे गाठीशी साठवले पाहिजेत नं.तसलं काही नाही.खाल्लं की ढुंगणाला हात पुसले.असा संसार होतो का गं रमे?

रमाई: चालायचंच ओ काकू.पदरी पडलं नी पवित्र झालं म्हणायचं.सांभाळून घ्या जरा तुम्हीच.

सुधाकाकू: अगं किती सांभाळून घेणार.पाच वर्ष झाली त्यांच्या लग्नाला.तेच तर करतोय.म्हणून तर हिचे रागरंग बघून दोन वर्षापूर्वी यांनी आमचं बिराड या गावच्या घरात हलवलं.रविवार आला की चालली सगळी मिळून फिरायला.हाफ चड्डया घालून पिकनिकला जातात.मला सांग बाईमाणसाला बरं दिसतं का गं असं चारचौघात हाफचड्डीत हिंडणं आणि पुरुषमाणसालासुद्धा.अगदी साडीबिडी नको नेसू पण जरा अंग झाकतील असे तरी कपडे.बघणाऱ्यांना लाज गं बाय.नी सासऱ्यांना येऊन विचारते,बाबा मी कशी दिसते?म्हणजे बघ.शाप आटा ढिला गं मिनेचा.

रमाई: मग तुम्ही दोघं काय जेवायचा तेंव्हा?

सुधाकाकू: अगं हे जायचे बाजारात.मासळीबाजार जवळच होता.छान ताजे पापलेट,सरंगे घेऊन यायचे.मग काय..तिरफळं घालून सार बनवायचो नी हाणायचो.दुपारचा पिक्चर बघीत ताणून द्यायचो.ही कधी रात्री आठ नऊला यायची.मग मासळीभातावर ताव मारायची.पण एका शब्दाने बाबा हे कितीला मिळालं किंवा आई किती छान बनवलंत,मला शिकवाल का? असं निघायचं नाही गं त्यांच्या तोंडून.

रमाई: नोकरी करते म्हणे मिना

सुधाकाकू: हो गं पंधरा हजार पगार आहे तिला.कुठे शिकवायला जाते म्हणे.मुलांना सांभाळायला बाई ठेवलेय.तिला चार हजार देते.घरकामाला बाई..तिला चार हजार..दोघींची ट्यूशन हजारभर रुपये.हीचा नट्टाफट्टा,ड्रेसमटेरियल मासिक दोन हजारच धर तरी बघ अकरा हजार उडाले.हातात चार हजार रहातात त्यातले अर्धे ह्याला पार्टी त्याला पार्टी.आणि मग काय खर्च आला..मुलांच्या शाळेच्या फिया भरायच्या आल्या की लावते ह्यांना फोन.बाबा जरा अडचण आहे.एवढे पैसै ट्रान्सफर करा हं लवकर.की चालले बाबा ट्रान्सफर करायला.मला नाही हं कधी अडचण सांगीत.तिला माहितीय माझ्याकडून एक छदामदेखील मिळायची नाही.सासरा मिळालाय साधाभोळा त्याला लुटतेय.चड्डीपण काढून घेतील गं यांची.तरी हे देतील.असला कर्णाचा अवतार.पण मी काय घेवू म्हंटलं तर लगेच आहे त्यात भागव म्हणून सांगतील.बायकोची कसली ती हौसमौज नाही.कधी कुठे नाटकालाही नेलं नाही.त्या टीवीवर आलं की पहायचं म्हणे.

रमाई: माझा लेक लहान आहे अजून.मोठा झाला की काय वाढून ठेवलंय देव जाणे.चार बुकं कमी शिकलेली सून मिळाली तरी चालेल पण काळजात माया हवी ओ काकू.

सुधाकाकू: अगदी बरोबर बोललीस.आगीशिवाय कड नाही नी मायेशिवाय रड नाही गं रमे.आत्ता माझी ढोपरं धरलेत गं.सकाळी उठताना अगदी जीवावर येतं बघं.हे वय आहे का गं माझं स्वैंपाकपाणी करायचं.पण बरोबर सहाला चहा हातात ठेवावा लागतो ह्यांच्या.पाणीपण घेत नाहीत गं स्वत:च्या हाताने.सगळं,अगदी आंघोळीचं पाणीपण द्यावं लागतं ओतून.मी गेले तर यांचं कसं होणार..चिंता लागून राहिलेय बघ.एक दिवस झोपून राहिले तर उपाशी रहातात गं पण चुलीजवळ जाऊन काय बनवत नाहीत.खरंच रमे नवरा म्हणजे नं क्षणाचा पती अन् आयुष्यभराचं लेकरु असतं गं बाईचं.मुलं तरी मोठी होतात पण नवरा नाही गं मोठा होत.त्याचं सगळं करावंच लागतं.

रमाई:म्हणून तर मी आत्तापासून थोडी आळशीच रहाते.यांची कामं यांनाच करायला लावते.रविवारी अमंळ उशिराच उठते मग बरोबर चहा बनवतात,पाणी तापत ठेवतात.भांडी घासली तरी दोन चार शिल्लक ठेवते..ते आपणच घासतात.

सुधाकाकू: तशी हुशार आहेस गं रमे तू.मलाच बाई नाही जमलं ते.पण तू अशी हुशारच रहा हो.नवऱ्याला पोळीभाजी करण्याचं ट्रेनिंग देऊन ठेव.स्वावलंबी कर.उद्यासकाळी अडायला नको त्याचं.तुलाही कधी माहेराला जायचं झालं की बिनधास्त जाता येईल.जीव टांगणीला लागणार नाही.काय खाल्लं असेल की नाही..असे प्रश्न सतावणार नाहीत.

रमाई: चला काकू जाते.मुलं यायची वेळ झाली.

सुधाकाकू : ये हो परत अशी.जरा जीव रमतो माझा.

———-गीता गजानन गरुड,आंब्रड,मोगरणेवाडी.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा