हिऱ्यापोटी गारगोटी

Written by

हिऱ्यापोटी गारगोटी..

रोजच्या सारखंच आज जेटूडी पुन्हा आपल्या तिसऱ्या डोळ्यासमोर नजर लावून बसलेला.महादेवांसारखा खराखुरा तिसरा डोळा नाही पण सतत त्यातून काहीतरी बघत बसण्याच्या छंदामुळे त्याच्या मित्रांनी त्याच्या दुर्बीणीला तिसरा डोळा नाव दिलेलं..
कधीतरी हा पोरगा हा डोळा बंद करेल नि देवाने दिलेले दोन डोळे उघडून जगाकडे बघेल असं त्याच्या आईला वाटायचं..
लहानपणापासून त्याला कधी entry नसणाऱ्या त्या गच्चीवरच्या खोलीचं फार आकर्षण होतं..मग लपत छपत त्या खोलीची जासूसी करण्याचे त्याचे पराक्रम पाहून त्याच्या बाबांनी त्याला त्याच्या १० व्या वाढदिवशी तिथे नेऊन जबरदस्त Surprise दिलेलं..तिथे असलेल्या त्यांच्या वेगवेगळ्या दुर्बीणी,काही लहान लहान तर काही लांबच लांब..
त्यादिवशी त्यातून चंद्र बघताना काळे ठिपके असलेला पांढरा गुबगुबीत ससा अगदी जवळ असल्यासारखं त्याला वाटलं..
चांदण्यांची लुकलुक, काळं कुळकुळीत आकाश ,त्यावर spray paint केल्यासारखे रंगी़बेरंगी ग्रह, सगळं सगळं जग त्याच्या हातभर अंतरावर असल्यासारखं वाटत होतं..
तेव्हापासून त्याला त्याचं जसं नवं विश्वच सापडलं होतं..शाळेतून आल्यापासून तासंतास जेटू त्यात रमून जायचा..अभ्यासाच्या बाबतीत आईच्या हातून चौदावं रत्न खूपदा मिळायचं.पण बाबा मात्र खूप लाड करायचे..
“जाऊ दे गं सगळ्याच गोष्टी शाळेत नसतात शिकायच्या .. करेल हळूहळू सगळं बरोबर..”
“अहो तुम्ही सुध्दा ,त्याला रागवायचं सोडून अजून पाठीशी काय घालता.. मला तर बाई Tension च येतं या पोराचं अहो लोक कसे बोलतात मग हिऱ्यापोटी गारगोटी निपजली म्हणून”
“अगं ,तू कशाला त्यांच्याकडे लक्ष देतेस..लोक काय; बोलतातच..पण शहाण्या माणसाने त्याकडे लक्ष न देता आपलं काम करावं तेच बरंय आणि माझ्या लेकाबद्दल म्हणशील तर माझ्याहून मोठं नाव कमावेल बरं माझा जेटू”
“करा बाबा तुम्हा बापलेकाला काय करायचं ते आणि हो तुमचा एकट्याचा नाही काही; माझाही आहे हो एवढा गुणी बाळ..”
नेहमीच या ठिकाणी येऊन fullstop घेणारा त्याच्या आईबाबांचा संवाद..
या खोलीत पाय ठेवला की आपोआप डोळ्यासमोर उभा रहायचा..आजही आठवण आली नि डोळ्यातून नकळत एक थेंब खाली घरंगळला…..
केटूपी..त्याचे बाबा ..
त्याचे Friend.. Philosopher.. Guide..Everything..
केटूपी VSO (Venus Space Organization )मधे Senior Space Scientist होते..एक अगदी हुशार,कामसू आणि अंतरिक्षाचा मनापासून गाढा अभ्यास केलेले व्यक्तीमत्व..
अवकाश निरिक्षण करणे, छोट्या छोट्या नोंदी करून टिप्पण्या काढून ठेवणे त्यांचे छंद होते..त्यांचे VSO मधील योगदानही खूप होते म्हणून खूप लोकं त्यांना मानीत..
हल्ली त्यांची अवकाश निरीक्षणं फार वाढली होती..जेवणखावण सारं विसरून फक्त त्यांच्या खोलीत ते काहीतरी करत बसायचे.. निरीक्षणे, आकडेमोड, नोंदी,सैटेलाईटस् ने पुरविलेली माहिती याच्या अभ्यासाने त्यांना त्यांच्या बाजूच्याच ग्रहावर जीवसृष्टी असल्याची जाणीव झालेली..
किती खूष होते ते त्या दिवशी..आपले भावंड सापडले..आपल्या ग्रहाची होत चाललेली दुरावस्था पाहता लवकरच आपली जीवसृष्टी आपल्या ग्रहावरून संपुष्टात येण्याची भिती वाटत होती त्यांना..म्हणून शक्य तेवढी निसर्गसंपत्ती वाचविण्याचा प्रयत्न सरकारसुध्दा करतच होतं , तरीही अडचण आलीच तर safe side म्हणून अजून कुठे वस्ती करण्यासारखी जागा बघून ठेवावी म्हणून त्यांचा आटापीटा चाललेला..
तो दिवस..
त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद..
फोनाफोनी..
मीटींग्ज..
चर्चा..
सगळं भराभर plan करून त्यांची टीम त्या ग्रहावर रवाना झालीसुध्दा..गडबडीत धड आपलं बोलणं सुध्दा झालं नाही बाबांशी..तेव्हा जे दुरावलो ते दुरावलोच…..
थोड्या दिवसांसाठी म्हणून गेलेलं यान परत आलंच नाही..फक्त ते जळून गेल्याचं कळालं..किती वाट पाहिली..VSO तले सगळेच हवालदील झालेले..

तेव्हापासून जेटूडी ची खगोलनिरीक्षणाची आवड एका वेगळ्याच ध्येयात बदललेली.. आताही तो तासंतास दुर्बीणीला डोळे लावून बसायचा..पण आता चंद्र,तारे नाही एकच एक,निळसर,हिरव्या रंगाच्या त्या ग्रहाकडे टक लावून पाहत..कधीतरी कुठेतरी अचानक तिथून जादू झाल्यासारखे बाबा उडत उडत यावे..खूप खूप गप्पा माराव्या..त्यांना घट्ट मिठी मारावी आणि आता सोडूच नये..परत कुठेही जायचं नाही म्हणून ..
वेडी आशा..
त्या ग्रहाची चीड यायची त्याला ..माझ्या बाबांना गिळून बसलाय तो ग्रह..बाबा आणि आपले कितीतरी लोक गायबच झाले..
झपाटलेलं त्याला ..
बदला..
एकच एक ध्येय..
आपणही बाबा गेले त्या ग्रहावर जावं आणि तिथल्या लोकांकडून माझ्या बाबांना हिरावल्याचा सूड घ्यावा..

तयारी सुरू होतीच..
अभ्यास,बाबांच्या वह्या..कुठे कुठे चिकटवलेली कात्रणं.. सगळं पुस्तकी किड्यासारखं वाचून झालेलं .. त्यांच्या ड्रॉवरमधे अगदी मागे एक वही शोधताना नकळत आत लावलेलं कुठलंसं बटण दाबलं गेलं नि एक कप्पा उघडला त्यात छोटी पेटी होती त्यात एक वेगळंच उपकरण मिळालं..कसली कसली बटणं होती त्यावर.. एक दाबून पाहिलं तर बाबांचा त्या ग्रहावर जातानाचा video..नव्यानेच कितितरी गोष्टींची माहिती कळत होती.. तो ग्रह म्हणे पृथ्वी नावाने ओळखला जातो..
सुरूवातीला नवीन जागा सापडल्याचा बाबांचा आनंद फार कमी काळ टिकला..
इथे तर आपल्या ग्रहापेक्षाही वाईट अवस्था आहे..अनिर्बंध वृक्षतोड,वितळणारे हिमनग,वाढती उष्णता,प्रदुषण,नव्यानेच उद्भवणारी आणि पसरणारी रोगराई..वाढती जनसंख्या..एक ना अनेक..
Video बघताना मनातल्या रागाची जागा आता सहानुभूतीने घेतलेली..काही गोष्टी अजूनही clear नव्हत्या..
त्या ग्रहावर जायचं म्हणजे जायचंच ठरवून त्याने मेहनतीच्या जोरावर VSO मधे जागा मिळवली..
आणि कमी वयातही एक हुशार Scientist म्हणून त्याची ओळख झाली..लगेचच कामाला सुरूवात करून त्याने वरिष्ठांची मर्जी संपादीत केली नि पृथ्वी mission बद्दलही सर्वांना पटवून एका टीमसह जाण्याची परवानगी घेतली..
पुन्हा सगळं..Planning..
तयारी..

मीटींग्ज..

चर्चा..
आणि On the way to Pruthvi….

इथे आल्यावर बाबांनी सांगितलेलं सगळं आठवत आणि पटत गेलं..
Plan प्रमाणे त्याच्या टीमने वेगवेगळे areas( खंड) मधे Distribute होत ठरवलेलं पार पाडायला सुरूवात केली..
वाढती स्थूलता ,लहान वयात कमी हालचालीमुळे होणारे आजार, लोकसंख्या नियंत्रण, बद्दल माहिती देत गेलो..कुठे समुद्रात बिचाऱ्या माशांभोवती प्लास्टिकच प्लास्टिक तर कुठे रोपांवर पडलेलं कीड,कुठे त्सुनामी,तर कुठे ज्वालामुखी,निसर्गापेक्षा माणसांच्या मूर्खपणामुळेच ते भोगत होते..शक्य तिथे सुधारणा करायचे प्रयत्न केले, कुठे नद्यांचं पाणी वाया जात होतं आणि कुठे कडक दुष्काळाचं सावट ..तिथे नदीजोड प्रकल्प केले..काही Technology Venus वाल्यांच्या Super होत्या तर काही Earth वाल्यांच्या..जिथे रोगराई ठाण मांडून बसलेली तिथे त्यांच्या Venus Treatment च्या पध्दती वापरल्या, हो पण हे करण्याआधी मात्र शिस्तीत प्राण्यांवर रितसर permission काढून वगैरे मग treat केले……
काही नाक मुरडायचे ,काही Ignore करायचे,आणि काही मनापासून बदलाची तयारी दाखवायचे..
अशाच एका खास कार्यक्रमात आम्ही त्या सगऴ्यांचा सत्कार करायचा ठरवलेलं..एक एक जण Stage वर येत होतं ..टाऴ्यांचा कडकडाट चालू होता..आणि एक नाव आलं..आपले पुढचे सत्कारमूर्ती आहेत मिस्टर केटूपी….
Wait..!!what..??
मी काय ऐकलं?नजर झटकन तिकडे वळली नि हळूवार पावलं टाकत स्टेजवर चढणारी व्यक्ती नजरेस पडली..

बाबा..
बाबा..
बाबा तुम्ही ..क..क..कुठे होतात एवढे दिवस..तोंडातून शब्द फुटत नव्हते .. तरीपण मनातल्या शंका कुशंकाना आज टाटा-बायबाय करायचं होतं..आज मला नवचैतन्य मिळालं होतं..माझे बाबा मला परत मिळाले होते..
बाबा-पृथ्वीच्या कक्षेत शिरल्यावर थोड्याच वेळात आम्हाला यानात गडबड झाल्याची जाणीव झालेली..पण मार्ग काहीच नव्हता..आमचा अभ्यास कुठेतरी कमी पडला आणि तो बिघाड काही सुधारणं आमच्या हातात उरलं नाही..आणि इथे अजून तरी आपल्या ग्रहावर पोहचू शकणारं यान विकसित झालं नाहीये..
बाकी इथल्या लोकांनी खूप Support केला आणि यांच्यातली माणुसकी अजून जिवंत पाहून आणि यांचं प्रेम पाहून आम्ही शक्य तितकं चांगलं पृथ्वीवासियांसाठी करत राहीलो आणि नशीबात असलं तर पुन्हा तुम्हा सर्वांना भेटायचं स्वप्न बघत जगलो..
तिथे समोर बसून तुझं कौतुक ऐकण्यात काय सुख आहे म्हणून सांगू..धावत येवून तुला भेटण्याचा मोह होत असूनही कानांवर पडणारं माझ्या बाळाचं कौतुक मला सोडवत नव्हतं..
चल ,आता पटकन तुझ्या आईकडे जाऊ आणि तिला सांगू ,हिऱ्यापोटी हिराच जन्मलाय.. तो ही लखलखता; गारगोटी नाही…..

-प्रणाली.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा