हो! माझा निर्णय योग्यच होता

Written by

कितीतरी वेळ काशीबाई अपर्णाकडे मोठ्या कौतुकाने डोळे भरून पहात होत्या.साध्यासुध्या पंजाबी कपड्यातली अपर्णा त्या खुर्चिवर बसून सगळी कागदपत्र पूर्ण करत होती आणि तिथे बसलेल्या साहेबांशी मोठया आत्मविश्र्वासाने बोलत होती. तिच्या चेहऱ्यावर कुठेही घाबरगुंडी उडाली नव्हती जणूकाही तीला नक्की काय करायचंय हे पक्कं ठाऊक होतं. अपर्णाच्या त्या अशा आत्मविश्र्वासाकडे अश्रुभरल्या कौतुकाने बघत काशीबाई भुतकाळात गेल्या.

त्या दिवशी पाटलांच्या घरात खुपच गडबड होती. त्याला कारणही तसच होतं आज साहेबरावांच्या सगळ्यात धाकटया मुलाचं अन् त्यांच्या घरातलं हे शेवटचं लग्न होतं. साहेबराव आणि काशीबाई यांना तिन मुलं च होती मुलीची आस असूनही ती त्यांना झाली नाही.  श्रीकांत, अविनाश या दोन्ही मुलांची लग्न झाल्यावर धाकट्या मुलाचं आशीष चं लग्न अगदी थाटामाटात पार पडत होतं. साहेबरावांचा कॅन्सरचा आजार बळावत असल्याने आशीष चं लग्न लवकरात लवकर व्हावं ही त्यांची शेवटची इच्छा होती. म्हणून बावीस वर्षाच्या आशीषचं लग्न एकोणीस वर्षाच्या अपर्णाशी लावण्यात आलं.अपर्णाचं शिक्षण चालू होतं पण…. ‘पुढे आम्ही शिकवू’ ह्या आश्वासनावर अपर्णाने लग्नाला होकार दिला अन् ती पाटलांच्या घरात धाकटी सून म्हणून नांदायला लागली.

थोड्याच दिवसांत साहेबरावांचा मृत्यू झाला अन् काशीबाई कोलमडल्या पण धाकटी असून त्यात सून असनूही अपूर्णाने त्यांची अगदी स्वतः च्या आईप्रमाणे काळजी घेतली. नंतर सगळं गुण्यागोविदानं चालत होतं. अाणि संसाराच्या रहाटगाडग्यात अपर्णाचं शिक्षण घेण्याचं स्वप्न हे अपूर्णच होत राहिलं.

तिन पोरं, तिन सुना, दोन नातवंडं ह्यामधे काशीबाई हरवून गेल्या होत्या तोच काळाचा ह्या पाटलांच्या घरात अचानक प्रहार झाला अन् एकाएकी एका रोड अँक्सिडेंट मधे घरातल्या धाकट्या मुलाचा आशीषचा मृत्यू झाला.

साहेबरावांच्या मृत्यूनंतर घरात जरा चांगले दिवस आले होते  तोच हा आघात काशीबाईंना सहन होत नव्हता आणि कोवळ्या अपर्णाकडे पाहताना त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होत होती की, जर लग्न लवकर नसतं केलं तर कदाचित अपर्णा आज विधवा झाली नसती. आणि ह्या कोवळ्या वयात तिच्यावर एवढं मोठं संकट आलं नसतं.

पाटीलांची शान आणि लोकांमधल्या दिखाव्यामुळे, चाली-रितीमुळे अपर्णाच्या राहणीमानावर बरीच बंधनं आली होती. जाणारा हा गेला होता पण इथे जिवंत माणसांना रोज रोज मरण्यासाठी तो सोडून गेला होता.

अपर्णा रोजचं मरण जगत होती आणि तिचं हे असं जगणं काशीबाईंना मान्य नव्हतं.

इकडे त्यांची दोन्ही मुले आणि सुनांनी स्वतःचा खरा रंग दाखवायला सुरूवात केली होती. साहेबराव आणि आशीषच्या मृत्यूने खचलेल्या काशीबाईंवर आता इस्टेटीसाठी छळ होऊ लागला.

“आई कधीतरी वाटणी होणारच आहे ना? …मग आताच करून टाक तू वाटणी … आणि तुला म्हातारीला काय हवय फक्त जेवण आणि घरच ना ते देतोच की आम्ही” …आता काशीबाईंना सगळं समजून चुकलं होतं की आता सगळ्यांना फक्त पैसाच दिसतोय. आता नात्तांना महत्त्व राहिलं नाहीये.

आता मात्र काशीबाईंना अपर्णाची जास्तच काळजी वाटली कारण आता अपर्णाला कोणीच बघणार नाही हे सत्य त्यांना समजलं होतं. त्या रात्री त्या झोपल्याच नाहीत आणि मग भल्यापहाटे त्या अपर्णाजवळ आल्या त्यांनी हळूच तीला जागं केलं आणि तिच्या हाती एक पिशवी देत तिला त्या फक्त एवढचं म्हणाल्या की,

“पोरी मला माफ कर, आता तुझं आयुष्य तू तुला हवं तसं जग आणि आता इथून लगेच निघ आणि इथे परत कधीच येऊ नकोस… घाई कर ग् पोरी सगळे उठायच्या आत तू जा इथून खुप लांब जा “… अपर्णाने पिशवी उघडून पाहिली तर त्यात भरपुर पैसे आणि काशीबाईंचे दागिने  होते …. तीला गलबलून आलं आणि ती तिथून जिवानीशी पळाली.

अपर्णा गेली आणि तीला पळवल्याचा आरोप काशीबाईंवर आला आणि नंतर काशीबाईंचे भोग सुरु झाले……सख्या मुलांकडून त्यांना नोकरासारखी वागणूक मिळायला लागली.कधीकाळी ज्या वाड्यात त्या मालकीण होत्या तिथेच आज नोकर बनल्या होत्या. तरीही त्यांना कसलीच खंत नव्हती फक्त काळजी होती ती अपर्णाची ….ती कशी असेल ह्याची त्यांना चिंता होती.

असेच दिवस सरत गेले. मुला-सुनांचा जाच वाढतच गेला. सगळंकाही आमच्या नावे कर म्हणून साम-दाम-दंड-भेद सगळंकाही काशीबाईंवर ते वापरत होते.

दिवस जात होते बघता बघता सात वर्ष गेले 

अन् एक दिवस …

आपलीच पोरं इतक्या खालच्या दर्जाला जातील हे काशीबाईंना कधीच वाटलं नव्हतं…. वाटणी करत नाही म्हणून एक दिवस काशीबाईंना गुंगीचं औषध देऊन त्यांचा अंगठा सगळ्या कागदपत्रांवर घेतला आणि सगळंकाही ते आपापसात वाटून घेत होते. सोबत त्यांचे वकील पण होते.

“का केलत रे असं ?…आपल्या आई सोबतच, माझ्यानंतर सगळं तुमचंच होतं ना रे … मग का मला असं केलत …. नोकर तर बनूनच होते मग का मला असा धोका का दिलात”?….पण आता काशीबाईंचं ऎकणारं कोणीच नव्हतं …. थोड्याच वेळात त्या वाड्यात पार्टी सुरु झाली अन् काशीबाई नोकर बनून कामाला जुंपल्या पण तेवढ्यातच दारावर थाप पडली……दार उघडलं गेलं आणि एक सुंदर स्त्री दारात उभी होती.

श्रीकांतला ती भेटली अन् पुढं बोलू लागली.

Hello, I am Advocate. Aparna Patil…..काशीबाईंची वकील …..आतापर्यंतचे झालेले सगळे व्यवहार रद्द करण्यात आले आहेत ……हे बघा कोर्टाचे पेपर म्हणत अपर्णा तिथल्याच खुर्चीवर बसली आणि सगळंकाही नियमानुसार सगळ्यांशी बोलत होती. 

काशीबाई तिला दुरूनच पहात होत्या…..आज त्यांना समजलं होतं की समाजाचा विचार करून जर आज अपर्णाला विधवा म्हणूनच ह्या वाड्यात ठेऊन शिकवलं नसतं तर आज परिस्थिती वेगळी राहिली असती.

अपर्णा लाचार अन् मीही बिचारी राहिले असते. अन् आज कुठल्यातरी वृध्दाश्रमात खितपत पडले असते……माझा त्यावेळचा निर्णय योग्यच होता.

तेवढयात अपर्णाचा आवाज आला ….

“आई भुक लागलीये जेवायचं का? असं अपर्णाने म्हणत, काशीबाई भानावर आल्या “….

तिच्याशी कौतुकानं आणि प्रेमाने हसत त्यांनी तिला मिठी मारली आणि म्हणाल्या …

‘बाळा थालिपिट टाकू का तव्यावर’?……

समाप्त ……

©Sunita Choudhari.

(मित्र -मैत्रीणींनो नमस्कार …आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे आवर्जून सांगाल आणि लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका ? तुमचीच मैत्रीण ,सुनिता ? )

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा