हो..मी खरचं चुकीचे वागले…!

Written by

हो..मी खरचं चुकीचे वागले…!

एकुलती एक राणेंची मुलगी.. पण फार हट्टी, मनात असेल तरच दुसऱ्याचे ऐकायचे नाही तर मेरे मुर्गी की एकिच टांग म्हणून आपलाच म्हणणं खरं करायचे.आवडेल तरच एखादी गोष्ट करायची असा काहीसा वेगळाच स्वभावाने ती मोठी झाली. प्रत्येक आईवडिलांना आपल्या पाल्याच कौतुक असतं तसे तिचे ही कौतुक तिचा आईवडिलांना होते. तिचा अशा स्वभावाला त्यांनी मुरड घालण्या ऐवजी प्रोत्साहनच देत आहे आणि वागणुकीत ती मोठी होत गेली. तिचा ‘हो’ मध्येच तिला त्यांचे ‘हो’ करीत आले.त्यांचे आपल्या कुटूंबातील लोकांसोबत सुद्धा त्यांचा हेकेखोर स्वभावामुळे फारसे चांगले संबंध नव्हते.

शिक्षण सुरु असतांना एका चांगल्या घरची राणेंचा मुलीला लग्नाची मागणी आली. एका भरभरून स्नेह असलेल्या घरात ती एक सून म्हणून जाणार होती. घरातील प्रत्येक जण आपापल्या कामात कितीही व्यस्त असेल तरी एक वेळच जेवण सगळेच सोबत अगदी प्रत्येकाचा दिवस भराचा आढावा घेत करत. आई , बहिण ,भाऊ , वहिनी प्रत्येकाचे आपापले वेगळे विश्व असेल तरी एकमेकांना सांभाळून सगळे आनंदाने सोबत राहत असत. अशा घरात लग्नाला होकार देत राणेंनी सुटकेचा श्वास सोडला.

ओठात एक आणि पोटात दुसरे असा तिचा स्वभाव पहिले कोणालाच तिचा सासरी लक्षात आला नाही. पण हळूहळू तिचा चालीरीती आणि बोलण्यातला फटकळ स्वभावाने तिने सगळ्यांच दुखविले. लग्न करुन सासरी आल्यावर सगळ्यांशी जुळविताना थोडा वेळ लागतो करत तिचा सासरी तिला कोणी काही बोलत नसे.

तिची सासू सुद्धा काळानुसार बदलत्या स्वभावाची. सासू म्हणून वागण्यापेक्षा एक मैत्रीण म्हणून नेहमीच मैत्रीचा हात तिचा समोर केला होता. तिला तिचा घरी कधीच कामाची सवय नाही म्हणून घरात चार माणसे असून सुद्धा स्वयंपाकाला बाई लावली. आपल्या नवऱ्याला “अहो.. जावो” करणारी तिला कधीच ह्या गोष्टीची जबरदस्ती केली नाही. “अरे… तुरे ” ह्यातही तिने गोडवा मानला. तिचा हा तिरका स्वभाव तिचा नवऱ्याचा नजरेतून लपला नव्हता. तिचा नवरा सुद्धा ह्याच भ्रमात की आज ना उद्या तरी ती बदलेल. माहेरचा लोकांसोबत सासरच्या मंडळींना देखील ती आपलंस करेल… पण इथे चित्र पार उलटे होत होते.

नवीनच लग्न झालेली राणेंची मुलगी दर वेळेला माहेरी आलं की आई जवळ नवऱ्याची तक्रार करीत असे.. तो रागीट आहे, मला समजावून घेत नाही, नेहमी लहरी आहे, त्याला माझ्या भावना कळत नाहीत वगैरे आईला सांगत असे. तिची आई सुद्धा तिचातच सूर मिळवत असे.

राणेंची मुलीला दिवस गेले तेव्हा, इतकी आनंदाची बातमी मिळाल्यावर तिचा घरी सगळ्यांचाच आनंद गगनात मावेनासा झाला. सासूने तिचे सगळे डोहाळे अगदी आनंदाने पुरविले. खूप खूप लाड केली. तिचा आवडीचे सगळे पदार्थ स्वतः करून तिला खाऊ घातले. तीही त्याचा आनंद घेत होती. तेव्हा आपल्या घरची माणसं वाईट नाही ह्याची तिला जाण झाली. पण तिचा आईने तिचा मनात आधीच सगळ्यांबद्दल विष ओतून ठेवले होते. म्हणून तिला काही फारसं बोलता येत नव्हते.

बोलता बोलता नवीन बाळाचे घरात आगमन झाले. वातावरण अगदी आनंदमय होते, पण राणेंचा मनात काही वेगळेच सुरु होते. मुलीला आपल्या शब्दांचा जाळ्यात फसवून तू माहेरचं चल तुझे इथे खूप हाल होतील म्हणून सरळ घरीच घेऊन गेले. इकडे सासरी सगळेच नाराज झाले. आजीला आपल्या नातवाचे खूप लाड करायचे होते. पण आता सगळं राहून गेल्याने त्या फार दुखावल्या. नवऱ्यांच्या सुद्धा नाराजीचा सूर होता. त्यावेळी तिला कोण काही बोलले नाही. हळूहळू राणेंचा मुलीने सासरी जाण्यासाठीच नकार दिला.आणि माहेरीच राहण्याचा निर्णय घेतला.

एक दिवस तिचा आईने तिचा साठी शिरा केला आणि म्हणाली “मी जरा बाहेर जात आहे,माझी मैत्रिणीकडे आज पार्टी आहे. तू उठून तुझा हाताने शिरा घेऊन घेशील.” आईचे हे बोलणे कानावर येताच काही वेळ ती जरा शॉक मध्येच होती. कारण आई तिला तिचा मुलासोबत एकटे घरी सोडून कशी गेली ह्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिला असे अनुभव आता नेहमीच येऊन गेले. आणि टचकन डोळ्यात पाणी आले, आणि आपल्या सासूची आठवण आली. सासूने आपल्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीची तिला आज जाणीव झाली. तिने लागलीच आपल्या सासूला फोन लावला, आणि विचारले,” कशा आहात आई तुम्ही..?”

“मी छान आहे ग सूनबाई, माझा नातू कसा आहे ?? मजेत आहे ना..? आता तर छान रांगत असणार ना…? काळजी घेत जा ग स्वतः ची पण. काही हवं असेल तर सांग…” सासू बाई बोलल्या….
” आई नातवाला त्याचा घरी न्यायला कधी येता? तो वाट बघतो आहे सगळ्यांची…” ती दबक्या आवाजात बोलती झाली…
हे शब्द ऐकताच सासूला तर आनंदाला पारावर राहिला नाही. मी उद्याच येते सांगून त्यांनी फोन ठेवला….
दुसऱ्याच दिवशी तिने आपली बॅग भरली तेव्हा मिस्टर राणे आणि मिसेस राणे दोघेही तिला पूर्ण थांबण्याचा प्रयत्नात होते. पण आज त्यांना यश येणं शक्य नव्हते , कारण त्यांचा मुलीला परिस्थितीची जाण झाली होती.

निघतांना ती आपल्या आईला म्हणाली..”खरंच ग आई, तुझी शिकवण माझ्या कामी आली, पण फक्त माणस तोडण्यात , जोडण्यात नाही. माझा इतक्या समंजस आणि साध्या माणसांना मी ओळखुच शकले नाही. मी स्वतःचा स्वभाव थोडा बदलून घेतला आणि क्षणातच मला माझं घर परत मिळालं. 

एका मुलीला लग्नानंतर सुद्धा माहेरी मान हवा असेल तर तिने माहेर हे माहेर सारखेच जपावे हे कळले आहे मला…मी खरचं चुकीचे वागले…!..आणि आई, आणखी एक गोष्ट मी शिकले, ते हेच, “की आपल्या अडचणी आपणच सोडवल्या पाहिजेत, चिडून ,बोलून काहीच मिळत नाही.थोडी स्वतःची बुद्धी वापरली पाहिजे. आपल्या EGO थोडा बाजूला सारला पाहिजे, दर वेळी आई वडील तरी काय करणार..? शेवटी संसार आपल्याला करायचा आहे. मी येते आई…”…म्हणत राणेंची मुलगी परत आपल्या सासरी आनंदाने रवाना झाली, आणि मजेत आपल्या संसारात रमली.

समाजात “सासू” ह्या व्यक्ती बद्दलचा नकारात्मक अशा काही मान्यता अगदी लोकांचा मनात पक्क्या झाल्या असतात की जरी सून चुकीचे किंव्वा वाईट वागत असेल तरी दोष हा नेहमी “सासुलाच ” दिला जातो. सासू कितीही चांगली वागत असेल तरीही सुनेकडून पण चूक होते हे अपेक्षितच नसते. 

कथा काल्पनिक असून कशी वाटली ,हे सांगायला विसरु नका. तुमच्या प्रतिक्रियांच्या वाट बघणारी तुमची मैत्रीण…

धन्यवाद.

नेहा खेडकर❤✍

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा