७ जून आणि बाबांची आठवण …

Written by

७ जून म्हणजे आमचा अलिबागहून सांताक्रूझला परतण्याचा दिवस. शाळेला सुट्टी लागली की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीच आम्ही आमचा डेरा अलिबागच्या घरात टाकत असू. मग दोन महिने अलिबाग एके अलिबाग असच असे. प्रशांत दादा, भाऊ, दादा, मी आणि बरोबरीला सचिन दादा, सुषमा ताई, शीतल सगळे धमाल करत असू. खा, प्या, समुद्रावर फिरा, आमचा कुलाबा किल्ला बघणे ही क्रमवारी ठरलेली असे. नुसती मजा, मजा आणि मजाचं.

पण ७ जून लक्ष्यात राहते ती वेगळ्या कारणाने, बाबांच्या आठवणीने. बाबा, श्री. पुरुषोत्तम भाऊराव पाटील, म्हणजे आमचे आजोबा. त्यांना आम्ही बाबा म्हणत असू. एका वर्षी ७ जूनला सकाळपासूनच धो धो पाऊस कोसळत होता. तेव्हा अलिबाग ते सांताक्रूझ अश्या थेट गाड्या, म्हणजे आपल्या ए. टी. नव्हत्या. रेवदंड्याहून सुटणारी ए.टी घ्यावी लागायची. तर त्या दिवशी आम्ही म्हणजे आई, पप्पा, दादा, मी आणि आम्हाला ए.टी डेपोमध्ये सोडायला आलेले बाबा असे दाखल झालो. अर्धा अधिक डेपो पावसाच्या साचलेल्या पाण्याने भरला होता. गुडघ्यार्यंत पाणी होत तिथे. इकडे पाऊस काही थांबायचं नावं घेत नव्हता. त्यावेळी आपल्याकडे मोबाईल फोन तर नव्हतेच त्यामुळे ए.स्टी महामंडळाकडून येणाऱ्या माहितीखेरीज दुसरा पर्यायही उपलब्ध नव्हता. आणि शेवटी महामंडळाकडून अनाउन्समेंट झाली की अति पावसामुळे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत. झालं आमची दिंडी बॅक तो अलीबागच्या घराकडे रवाना झाली. पाण्यामधून वाट काढत, मी लिंबू टिंबू असल्याने रिकामे हात हलवत एकदाच गाठलं. आज्जी आमच्या वाटेकडे डोळे लाऊन बसली होते. त्यात लाईट्स गेले होते. आताशा पावसाचा जोर कमी झाला होता. पहिल्या पावसाने वातावरण टवटवीत झाले होते. सर्वत्र गारवा पसरला होता. मग काय बाबांनी सामिष जेवण बनवण्याचं फर्मान सोडलं. त्वरित त्याची अंमलबावणीही झाली आणि आमचा सर्वांचा दिवसभराचा ताण सत्कारणी लागला. बाबांचं बोलणं म्हणजे आमच्या घरात अंतिम शब्द मानला जायचा. तसा वचकच होता त्यांचा. आमचे बाबा म्हणजे रुबाबदार व्यक्तिमत्व होय. त्याकाळी बाबा इंग्रजीतले काही शब्द बोलायचे ते पाहून तर मला अप्रूप वाटायचं. खूप कष्टाळू होते बाबा, अगदी रेल्वे मधून निवृत्त झाल्यावरही घरी बसणं त्यांना मान्य नव्हत, त्यांना जमेल तोपर्यंत ते काम करत राहिले. म्हणूनच तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात बाबांबद्दल आदरयुक्त भीती असायची.
त्यानंतर दरवर्षी ७ जून ही ठरल्याप्रमाणे आमच्या परतीची तारीख यायची, पाऊस ही यायचा, पण आता ना गाड्या रद्द व्हायच्या आणि बाबाही नसायचे. ७ जूनला आवर्जून येतात त्या फक्त बाबांच्या आठवणी…

स्नेहा किरण
पृष्ठ दृश्य आभार- गुगल

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत