ते विकताय…आम्ही विकले जातोय…

Written by

“चल आपल्याला त्या मामाच्या लग्नाला जायचं आहे…”

“कोणता मामा??”

“आहे एक लांबचा…”

“अगं मला जरा काम आहे, एका विषयावर रिसर्च करायची आहे…”

“नंतर कर ते, लग्नात सगळे विचारतात…रिसर्च च काय इतकं महत्वाचं नाही….”

अकरावीत असलेल्या जयेश च्या आईची त्याचा मागे ही भुणभुण चाललेली…शेवटी मुकाट्याने जयेश ला लग्नाला जावं लागलं, आणि तिथे 3 तास कसे गेले समजलंच नाही,

पुढचा एक तास लग्नातल्या मंडळींना स्टॉप पर्यंत गाडीवर सोडण्यात गेला..घरी आल्यावर इतका थकवा आलेला की आता जयेश ने चुपचाप गादीवर लोळण घेतली…झोपता झोपता मोबाईल वर फेसबुक चे अपडेट्स पाहत बसला…

प्रसंग अगदी साधा आणि सरळ, पण यात भूतकाळ आणि भविष्याचं मोठं गूढ दडलेलं आहे….

जयेश काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असताना लग्न किंवा इतर गोष्टीत त्याचा वेळ घालवायला लावणं कितपत योग्य???

आणि दुसरी गोष्ट, झोपताना तो जे फेसबुक पाहत होता…त्या फेसबुक चा शोध मार्क झुकरबर्ग ने जयेश च्या वयाचा असतांनाच लावलेला…एक शोधात रममाण झाला आणि दुसरा त्याने लावलेल्या शोधाचा वापर करत बसला…

खरी गोष्ट आहे,

2004 साली फेसबुक चा शोध लागला… मार्क ने त्याचा मित्रांसोबत वेगवेगळ्या कल्पना लढवून प्रोग्रॅम तयार केला, सुरवातीला स्वतःच्याच कॉलेज मध्ये वापर सुरू केला, हळूहळू दुसऱ्या कॉलेज मध्ये, मग शाळांमध्ये आणि मग संपूर्ण जगासाठी खुला केला..मित्रांसोबत विविध कल्पनांची चर्चा, नवनवीन शोध, नवनवीन प्रयोग….असे त्यांचे हॉस्टेल लाईफ होते…

2004 साली आपल्याकडे काय होते?? मला आठवतं, त्या साली साधी इंटरनेटशीही ओळख झाली नव्हती…आम्हाला तर पहिलीला असतांना स्टार्ट बटन आणि दहावीला कॉम्पुटर शट डाऊन कसं करायचं एवढंच शिकवलेलं..अर्थात ती त्यांची चूक नव्हती, आमच्या पर्यंत प्रगत तंत्रज्ञान पोहोचलंच नव्हतं.…

आणि आम्ही ते जाणून घ्यायचा प्रयत्नही केला नाही, कारण आम्ही बिझी होतो, लग्नातल्या कपड्यांवर मॅचिंग दागिने घेण्यात, मंडळाच्या मिरवणुकीत नाचण्यात आणि tv वरील फालतू चित्रपट बघण्यात…

वाटायचं tv बघणं, बाहेर फिरणं, मजा करणं…याहून मोठं काय हवं आयुष्यात??

पण तेव्हा समजायला हवं होतं…

आयुष्य एवढंच नसतं, नवनवीन कल्पना, नवीन तंत्रज्ञान, नवीन व्यवसाय…या गोष्टी असतात…आपण दुसऱ्याच्या गोष्टी वापरण्यापेक्षा आपणच का नाही त्या उत्पादित करत?? ते आम्हाला वस्तू विकताय… आम्हाला का नाही विकता येत?? त्यांनी शोध लावलेले गेम आम्ही खेळतो, आम्हाला का नाही बनवता येत असलं काही???

दुसरी गोष्ट, आपल्याकडे हॉस्टेल लाईफ मध्ये काय चालते? मजा, मस्ती, पार्ट्या…थोडाफार अभ्यास, मग passing पुरता पेपर लिहून सुटका….नवीन कल्पना, नवीन शोध या सगळ्याची बोंबाबोंब….तिकडे त्यांचा वयाच्या मुलांनी फेसबुक, गेम्स, app चे शोध लावावे आणि इकडे आपल्या मुलांनी तेच डाऊनलोड करून त्याच्या आहारी जायचं….एक विदारक सत्य….

तेजस तासनतास मोबाईल मध्ये बोटं घालून काहीतरी करायचा…मी विचारलं…काय करतोय??

पबजी, मिनी मिलिशिया अशी नवी नावं कळली…त्याचाच शेजारी त्याचा मित्र प्रतीक…तो यूट्यूब वर पबजी संदर्भात काहीतरी विडिओ बघत होता…

मग समजलं की का विदेशी लोकं इतकी पुढे जाताय…कारण ते आपल्याला यात अडकवून स्वतः मात्र उज्जवल भविष्य घडवताय…

भारतीय लोक आज गुगल, मायक्रोसॉफ्ट मध्ये मोठ्या पदावर आहेत, कारण तेवढीच लोकं या मोबाईल च्या व्यसनात पडली नाहीत.

भारतीयांमध्ये प्रचंड क्षमता आहेत, युट्युब वर बघाल तर मोठ्यातल्या मोठ्या तंत्रज्ञानाचे भाष्य आणि त्याचा वापर कसा करायचा याची भारतीयांनीच जास्त शिकवण त्यांनी दिलेली आहे…

मुलांचं जाऊद्या, आपणच काय करतो?? इंटरनेट वापरून नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करतो की केवळ फेसबुक वरील पोस्ट, विडिओ आणि व्हाट्सएपच्या स्टेटस आणि स्टोरीज बघण्यात वेळ घालवतो??

एखादा नवीन व्यवसाय सुरू करून मार्केटिंग साठी सोशल मीडिया चा वापर करणे, युट्युब वरील tutorial पाहून एखादे नवे तंत्रज्ञान शिकणे, अर्थार्जनाचे मार्ग शोधणे…आणि शेवटी स्वतःच या स्पर्धेत उतरणे हे आपल्यातले किती लोक करतात…

गल्लीतल्या बायका फोन घेऊन बसलेल्या…

“ए हा व्हिडिओ बघ, कसला भारी आहे…”

“टिक टॉक चा तो व्हिडीओ काय कॉमेडी आहे…”

“अनुष्का चा नवीन लूक पहिला का??”

“हे बघ तांदळात आता प्लास्टिक ची भेसळ असते…”

“आंब्यावर कोल्ड्रिंक पिल्यावर मृत्यू होतो बरका….”

लांबूनच त्यांना सोडचिठ्ठी देत मी आपापल्या घरी येणं पसंद केलं आणि सोशल मीडिया मार्केटिंग च्या माझ्या राहिलेल्या ट्युटोरिअल्स बघणं पसंद केलं….

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत