❤आगळं वेगळं माहेरपण❤(थोडसं मनातलं)

Written by

©® सुनीता मधुकर पाटील.

टिंग !!! टॉंग दारावरची बेल वाजली. दार उघडले…समोर पाहते तर रुपाली…आज बऱ्याच दिवसातुन घरी आली होती .थोडी त्रासलेली , वैतागलेलीच वाटली…आल्या आल्याचं फर्माईशली…” होऊन जाऊ दे गं एक कप चहा…”. चहा सोबत भज्यांचा मेळ झाला तर छान रंगत येईल गप्पानां म्हणून घेतले कांदे चिरायला…कांदे चिरता चिरता सरळ मुद्द्यालाच हात घातला…

” काय ग काय झालं चिडायला “… तर म्हणते कशी ” हे जगणं पण काय जगणं आहे…रांधा , वाढा , उष्टी काढा , नुसता वैताग…थोडीसुद्धा उसंत नाही या जीवाला…अगं हे…अगं ते…मम्मी माझं पुस्तक…मम्मी माझा होमवर्क…सुनबाई हे आणि सुनबाई ते…”

“पण मला काय हवंय हे विचारताय का कोणी…जाणार आहे चार दिवस माहेरला मग कळेल सगळ्यांना किंमत माझी…”

आता आलं ध्यानात माझ्या…ती आली होती चार क्षण सुखाचे वेचायला थोडसं माहेरपण जगायला…किती जादू आहे नाही ” माहेर ” या शब्दात…माहेराला जायचं म्हटलं की मूठभर मांस अंगावर चढतं…नुसता मााहेर असा शब्द जरी उच्चारला तरी जाणवतो आईच्या माायेचा स्पर्श…एक हळूवार फुंकर  प्रेमाची…काळाच्या ओघात थकलेल्या पावलांना एक विसावा…जिथे आपण जन्म घेतला , रुजलो , वाढलो , खेळलो , भांडलो लहानाचे मोठे झालो…लग्न होत आणि ते घर बनतं आपलं माहेर…आणि आपण माहेरवाशीण…

अचानक मनात एक विचार चमकून गेला… ” ही धरती माता पण साऱ्या विश्वाचा भार सांभाळून थकून गेली असेल ना…?” तिला ही हवी असेल मायेची एक हळुवार फुंकर… जात असेल का ती पण माहेरवाशीण बनून माहेरपणाला… 

मग काय!!! कल्पनेच्या विश्वात काय अशक्य आहे हो…केली कल्पना ह्या वसुंधरेच्या आगळ्या वेगळ्या माहेरपणाची…

चला तर अनुभवूया आगळं वेगळं माहेरपण ह्या वसुंधरेचं माझ्या नजरेतून…

❤आगळं वेगळं माहेरपण…❤(थोडसं मनातलं)

पाहुनी उष्ण तप्त आग ओकणाऱ्या भास्कराच्या
बाहुपाशात जखडलेल्या वसुंधरेला…
रात्र धाडते अंधाराला बनवूनी मुराळी
तिला आणाया माहेरपणाला…

जात असे लावूनी कळ नारदा परी
मंद मंद झुळूक वाऱ्याची स्पर्शूनी आवनीला…
घालुनी हळुवार फुंकर देत असे शीतल गारवा
ताप सहुनी आदित्याचा लाही झाल्या तनामनाला…

सप्त रंगाची झाली मुक्त उधळण
गळाभेट होता अंधार आणि प्रकाशाची…
मोहरली , बावरली धरित्री सप्तरंगात न्हाऊन
नेसुनी पिवळा शालू आतुरली भेट घेण्या रजनीची…

पायघड्या घालुनी सुंदर चांदण्यांच्या फुलांच्या
चामरे ढाळीत शीतल प्रकाशाची चांद उभा स्वागताला…
पाहुनी कोडकौतुक ओलावल्या कडा पापण्यांच्या
सुखावली अंतरी सासुरवाशीण आली माहेरपणाला…

रात्र आसवे गाळीती ओढावण्या
चादर मखमली दवबिंदूंची…
निद्रारानी पसरुनी बाहु घेई कुशीत
गाई अंगाई नेई सैर करण्या स्वप्न नगरीची..

स्वप्न रंगी रंगली हरवली आभासी जगात
विसरुनी भान विहार करीत विसरली स्वतःला…
अरे!!!हे कोण उभे पाहुनी त्याला ती
उगी दचकली मनात…

काळ उभा समोर तिच्या ठाकला
गिळंकृत करण्या साऱ्या सृष्टीला…
तुटली निद्रा भंगले स्वप्न बहु घाबरली ती मनाला
आली जाग झाले भान स्वीकारले वास्तवाला…

प्रकाश आदि , प्रकाश अंत , प्रकाश जीवन
प्रकाशावीन अर्थ नाही तिच्या जीवनाला…
प्रकाशावीन होणार नाही सृष्टीचे सृजन
प्रकाशावीन तिचे अस्तित्व शून्य कळले मोल वसुधेला…

सारूनी दूर मळभं अंधाराचे
निघाली शोध घेण्या प्रकाशाचा…
लागले वेध प्रकाशाचे
वेडावल्या मनाला…

तांबडे फुटले झाली पहाट
नवचैतन्य संचारले कणाकणात…
सोन पावलांनी चालत अंधाराला चिरत
सोन किरणे देऊन गेली नवा विश्वास तनामनात…

ओढूनी हळदुल्या पिवळया रंगाचा शेला
सूर्य आला भेटाया धरतीला…
नेसुनी हिरवा शालू
ती लाजत उभी स्वागताला…

ओढ लागली अनामिक
नाते असे जन्मजन्मांतरीचे…
वेडावल्या मना लागली आस
पुन्हा मिलनाची…

घेऊनी निरोप देऊनी वचन पुन्हा भेटीचे
माहेरवाशीण आलेली माहेरपणाला…
करुनी उत्पत्ती भाग्य उजळण्या सृष्टीचे
निघाली सासुराला…

©® सुनीता मधुकर पाटील.

(आवडल्यास नक्की लाईक , कमेंट आणि शेअर करा…पोस्ट नावासहित पोस्ट करावी.)

Article Categories:
प्रेम

Comments are closed.