❤लग्नबंधन❤तो आणि ती.

Written by

©® सुनीता मधुकर पाटील.

❤लग्नबंधन❤तो आणि ती

अग्नीच्या साक्षीने जुळलेले दोन जीवांचे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध म्हणजे लग्नबंधन ।

सप्तपदीची सातपावले , सात वचने , सात जन्म आणि सोबत एकमेकांची साथ म्हणजे लग्नबंधन ।।

प्रेमाच्या रेशीम गाठीने बांधलेले नात्यांचे गर्भ रेशमी पदर म्हणजे लग्नबंधन ।

हृदयाच्या कुपीत बंद प्रेमरूपी अत्तराचं दरवळणं आणि त्या सुगंधात दोघांचं हरवणं म्हणजे लग्नबंधन ।।

तिने हृदयीच्या स्पंदनात त्याचं अस्तित्व जपणं अन त्याच्या मनाच्या कोंदणात तिच्या प्रीतीचं बहरणं म्हणजे लग्नबंधन ।

नसेल जिथे फक्त वासनेचा वास , असेल फक्त विश्वास , समर्पण आणि प्रेमाचा सहवास म्हणजे लग्नबंधन ।।

प्रेम आणि आपुलकी ने घातलेला दोन घरांचा मेळ अन राजा राणीने मांडलेला भातुकलीचा खेळ म्हणजे लग्नबंधन ।

रीती रिवाज , परंपरा यांच्या नावाखाली बंधने न लादता घेऊ दिलेला मोकळा श्वास म्हणजे लग्नबंधन ।।

अव्यक्त राहून व्यक्त होणं अन न बोलताच एकमेकांच्या अंतरीचे भाव उमगणं म्हणजे लग्नबंधन ।

कधी वाद तर कधी समझौता , त्याच्या रागावर तिच्या प्रेमाची फुंकर म्हणजेच लग्नबंधन ।।

तहानलेल्या नदीचे प्रेमाच्या सागरात मिलन होऊन तृप्त होणं म्हणजे लग्नबंधन ।

त्याच्या जीवनाचं सार अन तिच्या जगण्याचा अर्थ म्हणजे लग्नबंधन ।।

ऊन सावल्यांचा खेळ अन सुखदुःखांचा मेळ म्हणजे लग्नबंधन ।

विधात्याचं सुंदर स्वप्न अन सोडवायला अवघड असं एक सुंदर गुलाबी कोड म्हणजे लग्नबंधन ।।

सृजन करण्या सृष्टीचे नवीन सुदृढ , निरोगी , जाणती पिढी घडवणं म्हणजे लग्नबधंन ।

कधी कडू तर कधी गोड अनुभवांचं न सुटणार गणित म्हणजे लग्नबंधन ।।

पिल्लानीं घरटे सोडून उंच गगन भरारी घेतल्यानंतर एकमेकांची साथ म्हणजे लग्नबंधन ।

एकमेकांच्या साथीनं स्वप्नांच्या नगरीत विहार करत
सोसलेल्या वास्तवाचे चटके म्हणजे लग्नबंधन ।।

उतार वयात एकमेकांच्या औषधांच वेळापत्रक सांभाळणं
म्हणजे लग्नबंधन ।

शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांची साथ सुटू नये म्हणून देवाकडे केलेली प्रार्थना म्हणजे लग्नबंधन ।।

तो आणि ती संसाराच्या गाडीची दोन चाकं , एक जरी निसटलं तर दुसऱ्याच कोलमडून जाणं म्हणजे लग्नबंधन ।

प्रेम असेल तर अमृत अन लादलेलं , जबरदस्तीच असेल तर विष लग्नबंधन।।

बंध योग्य जुळले तर स्वर्ग लग्नबंधन , एक जरी पदर निसटला तर नरक लग्नबंधन ।

©® सुनीता मधुकर पाटील.

Article Categories:
प्रेम

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा