Login

"काय माझा गुन्हा...?" भाग २४

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग २४


गौरवी आणि सायली हातात हात घालून पुढे चालू लागल्या…
कॉरिडॉरमधली पावलं आता जरा ठाम, जरा आत्मविश्वासाने पडत होती…

तेवढ्यात सायली हळू आवाजात, जणू स्वतःशीच बोलत असल्यासारखी म्हणाली,
“गौरवी… खरं सांगू का…? आज जर तू नसतीस ना… तर कदाचित मी उद्याच कॉलेजला आलीच नसते…”
हे ऐकताच गौरवी क्षणभर थांबली...

ती सायलीकडे वळली… तिच्या डोळ्यांत भीतीपेक्षा जास्त थकवा दिसत होता...

गौरवी शांतपणे, पण ठाम स्वरात म्हणाली,
“मग आपण दोघी एकमेकींसाठी इथे असूया… एकटी लढायची गरज नाही आपल्याला… आपण दोघीही एकत्र उभं राहूया…”
हे ऐकताच सायलीच्या डोळ्यांत पाणी तरळलं... पण ती काहीच बोलली नाही… फक्त तीने मान हलवली…
जणू त्या एका वाक्यात तिला आधार मिळाला होता...

तेवढ्यात मागून एक ठाम, पण संयमी आवाज आला...
“Excuse me… Miss…”

दोघीही मागे वळल्या...

समोर उभे होते प्रा. देशमुख सर...
स्वच्छ इस्त्री केलेला पांढरा शर्ट, गळ्यात ओळखपत्र,
आणि चेहऱ्यावर अनुभवाची शांत, पण वजनदार छाया…

“तुझं नाव गौरवी गायकवाड ना…?” त्यांनी थेट विचारलं...

गौरवी क्षणभर दचकली… पण लगेच स्वतःला सावरत म्हणाली,
“हो सर… माझंच नाव गौरवी गायकवाड आहे…”

प्रा. देशमुख सर हलकंसं मान हलवतात...
“आज सकाळी जे घडलं… ते मी पाहिलं...”

सायली नकळत गौरवीकडे पाहते... भीती तिच्या डोळ्यांत पुन्हा डोकावते...
पण प्रा. देशमुख पुढे म्हणतात,
“आणि मला अभिमान वाटतो… कारण नियम शिकवणं सोपं असतं, पण अन्यायाला थांबवणं आणि त्याच्या विरोधात ठामपणे उभे राहणे ते धैर्याचं काम असतं…”

गौरवी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहते... तिला अशी प्रतिक्रिया अजिबात अपेक्षित नव्हती...

“कॉलेजमध्ये अँटी-रॅगिंग पॉलिसी आहे,”
प्रा. देशमुख ठामपणे म्हणतात,
“आणि कोणीही सिनियर असो, श्रीमंत घरातला असो, किंवा स्वतःला मोठा समजणारा असो... तो त्या नियमांपेक्षा आणि कायद्यापेक्षा वर नाही...” ते क्षणभर थांबतात…

मग पुढे म्हणतात,
“आज संध्याकाळी अँटी-रॅगिंग कमिटीची मीटिंग आहे... काही नावं तिथे घेतली जातील... तु नक्की ये...”
असं म्हणत ते तिथून निघून जातात...

सायलीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीतीऐवजी दिलासा उमटतो...

त्या दिवशी कॉलेजमध्ये दोन गोष्टी एकाच वेळी जन्माला आल्या…
एक...
गौरवीसारखी मुलगी...,
जिने भीतीला नाव न देता उभं राहायचं ठरवलं....

आणि दुसरी...
माधवसारखा मुलगा...,
ज्याच्या अहंकाराला पहिल्यांदाच तडा गेला...

आणि जिथे अहंकाराला तडा जातो… तिथूनच खरा संघर्ष सुरू होतो...


क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all