Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ४२

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ४२


" हो पळून जाऊन लग्न..." गौरवीचा आवाज तुटक होता…
"कारण मला आता सहन होत नाही... मला तुझ्याशी लग्न करायचं आहे... मला तुझ्याशिवाय काहीच सुचत नाही... सांग आपण करुया का असं...?" गौरवी

फोनपलीकडे माधव शांत झाला… त्याला क्षणभर शब्दच सापडले नाहीत…
“गौरवी…”
तो हळू आवाजात म्हणाला…
"पळून जाऊन लग्न करणं... माझ्याही मनात हाच विचार येत होता... आणि हाच एकमेव मार्ग सुद्धा सुचत होता... पण कसं बोलू ते सुद्धा सुचत नव्हतं आणि पटत सुद्धा नव्हते... कारण तु काय रिऍक्ट करशील हाच मनात विचार सर्वप्रथम आला..."

"अच्छा... म्हणजे मघाशी तुला हाच मार्ग सुचवायचा होता... पण माझी काहीच हरकत नाही आहे... आणि बघ तुझे माझे विचार सुद्धा जुळतायत माधव..." गौरवी

“तू अजून लहान आहेस गौरवी…" तो थोडा थांबतो…
"तुझं शिक्षण आहे… तुझं आयुष्य आहे… आणि माझं प्रेम इतकं स्वार्थी नाही की तुला संकटात ढकलून ‘पळून ये’ असं म्हणावं…”
माधवचा आवाज ठाम होतो... पण प्रेमळ…
“म्हणूनच आपण योग्य मार्गाने जाऊया…”

गौरवी शांत होते… डोळ्यांतील अश्रू अनावर होतात…
“मग मी काय करू माधव…?”

"ठिक आहे... पण माझं असं म्हणणं होतं की... आपण एकदा प्रयत्न करून पाहूया ना तुझ्या आईवडिलांना समजावून सांगण्याचा... जर नाहीच ऐकले तर मग आपण हा मार्ग निवडूया..." माधव

"माझं या विषयावर रोज भांडण होतं... ते नाही ऐकणार... म्हणून म्हणते आपण पळून जाऊन लग्न करु... मला फक्त तुझी साथ हवी आहे... सांग देशील का...?

"हो... मी साथ देईन... पण तुला आता अठरावे वर्षं सुरु आहे... ते पुर्ण होऊ दे... तोपर्यंत तुझ्या आई बाबांचे मत परिवर्तीत करण्याचा आपण प्रयत्न करू... नाहीच झाले तर मग आपण
हा मार्ग अवलंबू... चालेल का...?" माधव...

“ठीक आहे… मला मान्य आहे…”
गौरवी आनंदात, पण डोळ्यांत ओल ठेवून म्हणाली…

त्या रात्री फोन कटच झाला नाही… कारण त्या दोघांसाठी शब्दांपेक्षा एकमेकांचा आवाज जास्त महत्त्वाचा होता…
स्वप्नं रंगवली गेली… एकत्र घर, एकत्र आयुष्य,
संघर्ष असतील, पण सोबत असू…
अशी असंख्य स्वप्नं त्या रात्री
हळूच एकमेकांच्या आवाजात आणि शपथेत गुंफली गेली…

महिन्यांनंतर महिने सरले… गौरवीचं अठरावं वर्ष संपलं…
आणि तिचं एकोणवीसावं वर्ष सुरू झालं…

वय वाढलं… पण संघर्ष कमी झाला नाही…

या काळात गौरवीने आपल्या आई-वडिलांशी पुन्हा पुन्हा संवाद साधायचा प्रयत्न केला…
कधी समजावून, कधी शांतपणे, कधी रडत, तर कधी ठामपणे… पण तिच्या प्रत्येक प्रयत्नाला एकाच भिंतीवर आपटावं लागलं…

आई-वडिलांचं म्हणणं कायम तेच होतं...
“मुलगा वाईट नाही… तो सुशिक्षित आहे… जबाबदारही आहे…”

क्षणभर वाटायचं, आता मान्यता मिळेल… पण लगेच तोच कटू प्रश्न पुढे यायचा...
“पण तो उच्च जातीचा आहे… त्याचं कुटुंब आपल्या मुलीला स्वीकारेल का…? आपण आपल्या मुलीला उद्या अपमानासाठी पाठवतोय का…?"

गौरवीला कळत होतं… इथे प्रश्न माधवचा नाही…
तर इथे प्रश्न होता 'जात' नावाच्या त्या अदृश्य भिंतीचा,
ज्या भिंतीने माणसांमधलं प्रेमही तोडून मोजायला शिकवलं होतं…

आई-वडिलांच्या मनात भीती होती… समाजाची, अपमानाची, भविष्याची…

आणि गौरवीच्या मनात
फक्त एकच प्रश्न घोळत होता...
"प्रेम जर चुकीचं नसेल, मग ते स्वीकारायला इतकं अवघड का…?"


क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."