Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ४९

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ४९



माधवचे घर...

माधवने स्टेशनला ऑटो थांबवला… आणि दोघंही  ऑटोत बसले…
आणि ऑटो मुंबईच्या रस्त्यांवरून धावू लागली… सिग्नल, गर्दी, उंच इमारती…, आजुबाजुला चमचमती दुकाने... आणि त्या सगळ्यात गौरवी खिडकीबाहेर पाहत बसलेली…

“हेच ते रस्ते आहेत…”
ती हळूच म्हणाली…
“जिथून आपण पळून गेलो होतो…”

माधव शांतपणे उत्तर देतो…
“आणि आज त्याच रस्त्यांवरून
आपण नवऱ्या – बायकोसारखं परत येतोय…”

ऑटो एका जुन्या चाळीसमोर थांबतो…
माधव पैसे देतो… आणि दोघेही खाली उतरतात…

समोर माधवचे घर … तो उंबरठा… तो दरवाजा… पाहून गौरवी क्षणभर थांबते… आणि एक दिर्घ श्वास आत घेते…

माधव तिच्याकडे पाहून म्हणतो…
“घाबरायचं नाही… जे होईल ते आपण दोघं मिळून सामना करु…”

तो दरवाजाकडे पाऊल टाकतो… गौरवी त्याच्या शेजारी उभी राहते…

दरवाजा उघडतो… आत घर तसंच होतं…
शांत… पण थंड… माधवची आई आतल्या खोलीतून बाहेर येते…
नजरेत अजूनही तीच कठोरता… बहिण बाजूला उभी…
क्षणभर तणावाचं मौन…

दुपारची वेळ होती… आणि माधवच्या घरासमोर उभे राहिल्यावर
गौरवीच्या पावलांना आपोआप थांबावंसं वाटलं…

माधव पुढे गेला… तिचा हात धरून… उंबरठ्याजवळ
माधवची आई दारातच उभी होती… ती एक क्षण
गौरवीकडे वरून खाली पाहते… आणि ती कठोर आवाजात बोलते...
“थांब…”

गौरवी आणि माधव जागच्या जागीच थांबली…

“ही मुलगी या घरात पाऊल टाकणार नाही…”
माधवची आई ठामपणे म्हणाली…

माधव चकित झाला…
“आई… काय बोलतेयस…? ही माझी बायको आहे…”

“बायको...?”
माधवच्या आईने गौरवीकडे एक घृणेने कटाक्ष टाकला…
“कागदावर असेल… पण या घरासाठी नाही…”

"पण आई असं का करतेस...?" माधव शांतपणे विचारतो...

“खालची जात… वेगळा समाज… अरे आपल्या घराची इज्जत
तुला दिसत नाही का…?” माधवची आई चिडून बोलते...

तेवढ्यात... माधवची बहीण पुढे येत बोलते…
“आई बरोबर बोलत आहे दादा… लोक काय म्हणतील…? आपल्या घरात ही मुलगी बसत नाही…”

गौरवी मान खाली घालून सगळं ऐकत होती… पण ती एक शब्दही बोलली नाही…

माधव पुढे सरसावला…
उंबरठ्यावर उभा राहून म्हणाला...
“आई… तु मला जन्म दिलास..., माझं पालनपोषण केलेस..., मला माझ्या पायावर उभं राहायला लायक केलेस... म्हणून मी तुझा ऋणी आहे… आणि माझ्या ह्रदयात तुझा आदर कायम राहील... पण मी ज्या मुलीशी लग्न केलं ती सुद्धा माझा सन्मान आहे… तिच्या जातीपेक्षा तिचं मन मोठं आहे… जर ती या घरात
पाऊल ठेवू शकत नसेल तर…”

तो क्षणभर थांबला…

"तर... तर काय...?" माधवची बहिण ठसक्यात विचारते...

“…तर मी सुद्धा या घरात पाऊल ठेवणार नाही…” माधवने संयमाने उत्तर दिले...

आणि गौरवीने चमकून आणि घाबरून त्याच्याकडे पाहिलं…

“नको माधव…”
ती हळूच म्हणाली…

पण माधव आपल्या निर्णयावर ठाम होता…

त्यावेळी… तो उंबरठा ओलांडला गेला नाही…
ना गौरवीने ना माधवने… तो त्याक्षणी ओलांडला...

ती दोन माणसं नवीन आयुष्य सुरू करायला
घरातून बाहेर पडली…

पण त्यांचं नातं त्या उंबरठ्यामुळे अजून मजबूत झालं होतं…



क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."