Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ५४

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ५४


वर्तमान काळ...

गौरवी आपला भुतकाळ सांगुन थांबली... आणि मान खाली घालून शांत बसली...

आणि आरव मात्र हे सर्व ऐकून टकमक तिच्याकडे पाहू लागला...

आपला देश चंद्रावर पोहोचला…, आपल्या देशाने नुकतेच चंद्रयान सोडले…, आपल्या देशात 4G, 5G चे नेटवर्क आहे…,
जग तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती करत आहे…,
आता तर AI (Artificial Intelligence) सारखं तंत्रज्ञान विकसित झालं आहे…, मशीन माणसासारखा विचार करू लागली आहेत…, रोबोट माणसाची जागा घेऊ पाहत आहेत…,
जग समुद्रात इमारती उभारण्याचा प्रयत्न करत आहे…,
आकाशात ड्रोन उडत आहेत…, मंगळावर वसाहतीची स्वप्नं पाहिली जात आहेत…, पण एवढं सगळं होत असताना…
माणसाच्या विचारांची पातळी मात्र अजूनही जात, धर्म, स्पर्श आणि जन्मावर अडकून आहे… विज्ञान पुढे धावत आहे…
पण माणुसकी मागे पडत चालली आहे… आपल्या या विविध जाती धर्मांचे असलेल्या या देशात माणसाच्या मनातली जात अजून तिथेच अडकलेली आहे…"
हे म्हणताना आरवचा आवाज शांत होता… पण शब्द मात्र धारदार होते…

तो थोडा पुढे झुकतो… आणि गंभीरपणे म्हणतो...
“गौरवी… आपण तंत्रज्ञानात पुढे जातोय… पण माणूस म्हणून मागेच चाललोय… रॉकेट्स चंद्रावर जातायत… पण काही लोकांचं डोकं अजून ‘उंच–नीच’, ‘शुद्ध–अशुद्ध’ यातून बाहेर आलेलं नाही…”

गौरवीने मान वर केली… कारण आज पहिल्यांदाच कुणीतरी
तिच्या वेदनेला समजून ऐकत होतं…

“AI माणसासारखा विचार करायला शिकतोय… आणि माणूस मात्र माणसासारखं वागणं विसरत चाललाय…”
आरव हलकेच हसला… पण ते हसू वेदनादायी होतं…
“आज देश अभिमानाने म्हणतो... आपण प्रगत आहोत…
पण घराघरांत अजूनही कुणाला वेगळ्या भांड्यात जेवावं लागतं…, वेगळ्या जागी उभं राहावं लागतं… हे कोणतं आधुनिकपण आहे…?”

गौरवीच्या डोळ्यांत पाणी तरळलं… पण यावेळी ते अश्रू
असहायतेचे नव्हते… ते ओळख मिळाल्याचे होते…

“तुझी चूक नाही गौरवी…”
आरव ठामपणे म्हणाला…
“चूक त्या विचारांची आहे जे शिक्षणाने नाही… तर पिढ्यानपिढ्या द्वेषाने वाढवले गेले…”

तो क्षणभर थांबतो… आणि हळू आवाजात म्हणतो...
“आणि लक्षात ठेव… जे समाज तुला ‘कमी’ ठरवतो…
तोच समाज तुझ्या सहनशक्तीसमोर खूपच लहान आहे…”

गौरवी पहिल्यांदाच डोळ्यात पाणी असूनही मनात थोडीशी हलकी वाटू लागते…
कारण आज तिच्या भूतकाळाला कोणी दोष दिला नव्हता…
कोणी संशय घेतला नव्हता…

तर आज फक्त एक माणूस तिच्या बाजूने
ठामपणे उभा होता…

प्रगती मोजली जाते किलोमीटरमध्ये…
पण माणुसकी मोजायला
आपल्याकडे अजूनही मोजमापच नाही…



क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all