Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ५६

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ५६


आरव गौरवीला आपल्या घरात ती बिनधास्त राहू शकते... जेवढे दिवस तिची इच्छा असेल तेवढे दिवस ती राहू शकते... असं‌ त्याने दिलेल्या शब्दांवर गौरवीने फक्त होकारार्थी मान हलवली…

काही बोलण्यासाठी शब्द नव्हते तिच्याकडे… कारण इतकं स्वातंत्र्य, इतकी सुरक्षितता तिला खूप दिवसांनी मिळत होती…

आरव गौरवीच्या खोलीतून नाश्त्याच्या सगळ्या प्लेट्स उचलतो
आणि किचनमध्ये ठेवतो…
“मी आवरतो, तू आराम कर,”
असं सांगत तो ऑफिससाठी तयारीला लागतो
आणि थोड्याच वेळात बाथरूमकडे वळतो…

इकडे गौरवी मात्र त्याच्या साध्याशा वागण्यात दडलेलं माणुसकीचं मोठेपण पाहून क्षणभर थबकून जाते…

तीच्या मनात पटकन एक विचार चमकून येतो...
"कोणी आपल्यासाठी एवढं करत असेल,‌तर आपणही काहीतरी करायला हवं…"

ती हळूच उठते… कोणताही आवाज करत नाही… कोणालाही न सांगता ती सरळ किचनमध्ये जाते…

किचनमध्ये शिरताच ती फ्रीज उघडून बघते... आणि तिच्या हातात नकळत एक काम येतं…

ती फ्रीजमधून भाजी काढते... व ती स्वच्छ धुवून... ती भाजी चिरते… आणि ती शिजवायला ठेवते... त्यानंतर ती पटकन आपल्या हातांची गती वाढवत कणिक मळायला घेते... व मस्त गरमागरम गरम पोळ्या तयार करते… आणि आरवसाठी
ऑफिसला घेऊन जाण्यासाठी एक साधा, पण प्रेमाने भरलेला टिफीन तयार करते…

इकडे आरव मस्त गाणी गुणगुणत आंघोळ करतो... आणि आपल्या बेडरूममध्ये जाऊन ऑफिसला जाण्यासाठी तयारी करायला सुरुवात करतो...

तो टिफीन बंद करताना तिच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान उमटतं…

कारण आज पहिल्यांदाच
ती कुणाच्या घरात ओझं नव्हती…
तर माणूस होती…

आरव तयारी करुन ऑफिसला बाहेर पडण्यासाठी पायात सॉक्स घालत घालत...  तो गौरवीला आवज देतो...

तेव्हा गौरवी आपल्या हातात टिफीन बॉक्स घेऊन त्याच्या समोर उभी राहते..

तेव्हा आरव आश्चर्याने विचारतो...
"काय झालं...?"

तेव्हा गौरवी आपल्या हातातील टिफीन बॉक्स त्याच्या समोर धरते...

आरव आश्चर्याने तिच्याकडे पाहतो…
“हे काय आहे…?”
तो थोडा हसत विचारतो…

गौरवी क्षणभर खाली पाहते… मग हळूच म्हणते…
“तुझ्यासाठी टिफीन आहे… ऑफिसला…”

आरव थोडा वेळ काहीच बोलत नाही… तो टिफीनकडे पाहतो…
मग गौरवीकडे…
“तू… माझ्यासाठी केलंस…?”
त्याच्या आवाजात आश्चर्यापेक्षा
जास्त आपुलकी असते…

गौरवी हळूच होकारार्थी मान हलवते… आणि बोलते...
“तू इतकं केलंस माझ्यासाठी… मला वाटलं…
मीही काहीतरी करावं…”

आरव एक पाऊल पुढे येतो… आणि टिफीन तिच्या हातातून घेतो… आणि क्षणभर थांबून म्हणतो…
“गौरवी… इथे तु काही उपकारासाठी नाही आली आहेस…
हे तुझंही घर आहे असं समजून तुला रहायचं आहे…”

ते ऐकून गौरवीच्या डोळ्यांत पाणी तरळतं… पण ती ते अश्रू पटकन सावरते…

“माहिती आहे… पण आज पहिल्यांदाच कोणीतरी मला आपुलकीने स्वीकारलं म्हणून हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं…”

आरव हलकंसं हसतो…
“मग आजचा टिफीन फक्त जेवण नाही… तर तो तुझा विश्वास आहे…”
असं म्हणत तो टिफीन बॅगेत ठेवतो… आणि निघताना थांबून म्हणतो…
“मी संध्याकाळी लवकर येईन…
आपण एकत्र चहा पिऊया…”

दरवाजा बंद होताना गौरवी तिथेच उभी राहते…
मनात एकच विचार… कदाचित…
इथूनच माझ्या आयुष्याचा नवा श्वास सुरू होतोय…



क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all