Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ५७

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ५७


संध्याकाळी आरव ऑफिसमधून घरी आला… आणि दार उघडताच त्याचे डोळे नकळत बंद झाले आणि त्याच्या नाकात एक हलका फुलांचा सुगंध दरवळला... त्याने डोळे उघडले तर त्याला थोडा धक्का बसला…

कारण संपूर्ण घर नीटनेटके आवरलेलं होतं…

सोफ्यावरची विस्कटलेल्या उश्या..., बेडशीट नीट लावलेली होती… तर टेबल स्वच्छ पुसलेलं होते…
स्वयंपाकघरात भांडी धुतलेली, व रचून ठेवलेली होती…
आणि सगळीकडे एक हलकासा स्वच्छतेचा, आपुलकीचा वास दरवळत होता…

क्षणभर तो तिथेच उभा राहिला… आणि विचार करत स्वतःशीच पुटपुटला...
“आज सकाळी घर तर असं नव्हतं…”

"पण घर खरंच खुप सुंदर दिसत आहे... जेव्हा ताई येते तेव्हाच तर घर असं दिसतं..."
तो मनातल्या मनात म्हणाला…

“गौरवी…?”
तो हळूच आवाज देतो…

तेवढ्यात आतून तिचा आवाज येतो…
“आलेच…”

गौरवी बाहेर येते… साध्या घरातल्या कपड्यांत… पण तीच्या चेहऱ्यावर मात्र एक शांत समाधान झळकत असत…

“तू एवढं सगळं…?”
आरव थोडा अडखळत विचारतो…

ती मान खाली घालून म्हणते…
“दिवसभर घरीच होते… म्हटलं थोडं आवरून टाकू घर…”

आरव हसतो… पण ते हसणं वरवरचं नसतं… त्यात कृतज्ञता असते…

“तुला काही करायची गरज नव्हती…”
तो म्हणतो…

गौरवी शांतपणे उत्तर देते…
“मला गरज वाटली… कारण घर कसं अस्ताव्यस्त आणि पसारा होता... मग मी अशीच तर बसून होते... आणि आज इथे या घरात मी ओझं वाटत नाहीये कोणाला…”

हे ऐकून आरव गप्प होतो… आणि तो आजूबाजूला पाहतो…
हे फक्त आवरलेलं घर नव्हतं… हे एखाद्याची तीथे उपस्थिती असल्याने ते आज घर झालं होतं…

तो हळूच म्हणतो…
“आज पहिल्यांदाच हे घर… घरासारखं वाटतंय…”

आणि गौरवीच्या ओठांवर पहिल्यांदाच
निखळ, निसटलेलं हास्य उमटतं…

ती हळूच म्हणाली,
“तू आधी फ्रेश हो… मी तोपर्यंत काहीतरी करते…”
आणि ती स्वयंपाकघरात निघून गेली…

आरवही बॅग ठेवून फ्रेश व्हायला गेला…

थोड्याच वेळात तो बाल्कनीत येतो… आणि समोरचं दृश्य पाहून थांबतो…

टिपॉयवर नीट मांडलेली प्लेट… मस्त खमंग व्हेज कटलेट…
आणि बाजूला दोन कप गरमागरम, वाफाळता चहा…
चहाची वाफ हलकेच वर उठत होती… आणि त्या वाफेत
घरगुती आपुलकी मिसळलेली होती…

आरव हे सर्व पाहून क्षणभर काहीच बोलत नाही…

“गौरवी… हे सगळं…?”
तो हळूच विचारतो…

ती बाल्कनीच्या दाराशी उभी असते… आणि थोडी संकोचलेली… व थोडी घाबरलेली…
“तुला भूक लागली असेल असं वाटलं म्हणून…”
ती म्हणते…
“आणि संध्याकाळी चहा सोबत काहीतरी गरम खायला हवं म्हणून हे केलं…”

आरव पुढे येतो…
चहाचा कप हातात घेतो…

एक घोट घेताच
त्याच्या चेहऱ्यावर नकळत समाधान उमटतं…

“खूप छान आहे… मस्त कडक चहा केलास..."
तो म्हणतो… आणि त्या दोन शब्दांत
तिच्या दिवसभराच्या कष्टांना अर्थ मिळतो…

गौरवी हळूच खुर्चीवर बसते… दोघेही समोरासमोर…
बाल्कनीतून बाहेर दिसणाऱ्या संध्याकाळच्या आकाशाकडे पाहत व चहाचे एक एक घोट घेत बघत असतात…

त्या क्षणी कोणी उपकार करणारा नव्हता…, कोणाचं ओझं नव्हतं… फक्त दोन माणसं होती… ज्यांच्यात हळूहळू
आपुलकीचं , मैत्रीच नातं तयार होत होतं…


क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all