Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ६०

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ६०


डॉक्टरांचे शब्द हवेत विरून गेले होते…
“तुम्ही आई होणार आहात…”
क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं…

गौरवीच्या कानात तो एकच शब्द घुमत राहिला...
"आई…"
तिचा श्वास खोल झाला…
नकळत तिचा हात पोटावर गेला… आणि डोळ्यांत पाणी तरळलं… पण ते आनंदाचं होतं… की भीतीचं… हे मात्र तिलाच कळत नव्हतं…

“हे… खरंच आहे का…?”
ती हळूच कुजबुजली…

डॉक्टरांनी हलकंसं हसत मान हलवली...
“हो… आणि काळजी करू नका… सध्या तुम्हाला विश्रांतीची गरज आहे…”

आरव शांतपणे सगळं पाहत होता… तो काही बोलला नाही…
पण त्याच्या नजरेत धक्का नव्हता… एक अनपेक्षित जबाबदारी होती…

डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर आल्यावर गौरवी बाकावर बसली… आणि तिने पुन्हा माधवला फोन केला…
एकदा…
दुसऱ्यांदा…
तिसऱ्यांदा…
पण प्रत्येक वेळी फोन वाजत राहिला… उत्तर मात्र मिळालंच नाही…

गौरवीचा चेहरा अधिकच उतरला… हातातील मोबाईल घट्ट धरून ती शून्यात पाहत राहिली… हे सगळं आरव शांतपणे पाहत होता…

“गौरवी…”
तो हळूच म्हणाला…
“नंबर दे… मी बोलतो…”

क्षणभर ती थांबली… मग नाईलाजाने माधवचा नंबर त्याला देते…

आरवने फोन लावला… दुसऱ्या रिंगलाच फोन उचलला गेला…
“हॅलो…?”
पलीकडून माधवचा आवाज येतो…

आरव थेट मुद्द्यावर आला…
“मी आरव बोलतोय… आणि गौरवी सध्या माझ्याकडे सुरक्षित आहे…”

क्षणभर शांतता पसरते…

मग आरव पुढे म्हणाला...
“आणि एक गोष्ट सांगायची आहे… गौरवी गरोदर आहे…”

फोनपलीकडे क्षणभर पूर्ण शांतता पसरली… मग अचानक
माधवचा आवाज कठोर झाला…
“हे शक्य नाही…”
तो थेट म्हणाला…
“ते मूल माझं नाही…”

आरव दचकला…
“माधव, तु काय बोलतोयस…?”
तो थोड्या संयमाने म्हणाला…

“मी काही ऐकून घ्यायच्या मनःस्थितीत नाही…”
माधव चिडचिडीतपणे बोलला…

“तिने मला फसवलं आहे…
आणि मी कोणत्याही परिस्थितीत
त्या मुलाची जबाबदारी घेणार नाही…”

आरवचा आवाज कडक झाला…
“तु एकदाही तिला विचारलं नाहीस… एकदाही सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाहीस… आणि आता सरळ मुल नाकारतोयस…?”

“ तु कोण आहेस...? आणि तुझा काय नातं  आहे तीच्याशी याच्याशी माझं काही देणे घेणे नाही... कारण माझ्यासाठी तो विषय संपलाय…”
असं म्हणून माधवने फोन कट केला…

आरव काही क्षण तो मोबाईल हातातच धरून उभा राहिला…
मग हळूहळू तो गौरवीकडे वळला…

गौरवीच्या डोळ्यांत आधीच सगळं उतरलेलं होतं…
तिने काही विचारलं नाही… कारण उत्तर तिला आधीच कळलं होतं…

तीने हळूच डोळे मिटले… आणि नकळत ती दोन्ही हात पोटावर ठेवते… त्या क्षणी ती फक्त स्वतःसाठी नाही… तर आपल्या होणाऱ्या बाळासाठी आता खऱ्या अर्थाने एकटी उभी होती…

गौरवी थोड्यावेळाने डोळे उघडते... आणि डोळे जमिनीवर खिळवून बोलते…
“आरव…”
ती थरथरत्या आवाजात म्हणाली…
“हे बाळ… माधवचं आहे…”

आरव क्षणभर थांबला… मग शांतपणे म्हणाला...
“मला माहीत आहे…”

गौरवी दचकून त्याच्याकडे पाहते…
“आणि तरीही…”

तो थोडं थांबून पुढे म्हणाला...
“आता निर्णय तुझा आहे गौरवी… पण एक गोष्ट लक्षात ठेव…
तु एकटी नाहीस…”

ते शब्द ऐकताच गौरवीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले…
पहिल्यांदाच…
तिला आधार देणारा कोणी तरी होता…

त्या रात्री गौरवी झोपली नाही… ती खिडकीत उभी राहून
बाहेर पाहत राहिली…
हात पुन्हा पुन्हा पोटावर जायचा… मनात हजार प्रश्न निर्माण होत होते…
"मी आई होण्यासाठी तयार आहे का…?"
"माधव… तो खरंच हे बाळ स्वीकारेल का…?"
"पण त्याने तर नकार दिला ना हे बाळ त्याच नाही म्हणून..."

आणि मग एक विचार ठामपणे मनात रुजला…
"नाही... हे बाळ फक्त माझं आहे… आणि याच्यासाठी मला उभं राहायलाच हवं…"

तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले… पण त्या अश्रूंमध्ये कमजोरी नव्हती… ती आई बनण्याची पहिली ताकद होती…



क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all