Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ६२

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ६२


कोर्टकचेरी : घटस्फोटाची प्रक्रिया

आसावरीने दुसऱ्याच दिवशी गौरवीची सर्व कागदपत्रं गोळा केली…
•लग्नाचा दाखला…,
•आधार कार्ड…,
•लग्नाचे फोटो…,
आणि सगळ्यात महत्त्वाचं...
•गौरवीचा जबाब…

तिने गौरवीला समजावून सांगितलं...
“घटस्फोट म्हणजे भांडण नाही… तो न्याय मागण्याचा कायदेशीर मार्ग आहे…”

घटस्फोट अर्ज (Divorce Petition)

आसावरीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला…
अर्जात स्पष्टपणे नमूद केले होतं...
▪ मानसिक छळ
▪ चारित्र्यावर संशय
▪ सासरकडून अपमान
▪ पतीकडून साथ न मिळणं
▪ गर्भातील बाळ नाकारणं
हा अर्ज दाखल झाल्यावर कोर्टाने माधवला नोटीस पाठवली…

पहिली तारीख – समुपदेशन (Counselling)

पहिल्या सुनावणीला गौरवी आणि माधव समोरासमोर उभे राहिले…
जजांनी दोघांनाही शांतपणे विचारलं...
“तुम्हाला एकमेकांसोबत राहायची अजूनही शक्यता आहे का…?”

गौरवीचा आवाज थरथरत होता… पण शब्द ठाम होते...
“मी अपमानात जगू शकत नाही…”

माधव मात्र डोळे खाली घालून उभा होता…

माधवची बाजू...

माधवने कोर्टात गौरवीवर संशय घेतला… पण कोणताही पुरावा
तो सादर करू शकला नाही…
त्याची बाजू फक्त आरोपांपुरती मर्यादित राहिली…

पुरावे आणि साक्ष...

आसावरीने कोर्टात...
▪ गौरवीचा वैद्यकीय रिपोर्ट
▪ मेसेजेस
▪ साक्षीदार
▪ आणि तिचा जबाब
हे सर्व सादर केले…

गौरवीने न्यायालयात उभं राहून पहिल्यांदाच डोळ्यात डोळे घालून सत्य सांगितलं…

कारण त्या दिवशी ती घाबरलेली बाई नव्हती… ती एक आई होती… स्वतःसाठी उभी राहिलेली…

गर्भावस्थेचा मुद्दा...

जजांनी स्पष्ट सांगितलं...
“हे बाळ कायद्याने वैध आहे… आणि त्याची जबाबदारी पित्याचीही आहे…”

माधव गप्प झाला…

अंतिम सुनावणी...

काही तारखांनंतर कोर्टात अंतिम सुनावणी झाली…

जजांचा आवाज गंभीर होता...
“मानसिक छळ सिद्ध झाला आहे… पतीकडून पत्नीला संरक्षण मिळालं नाही… हे सिद्ध होते..."

कोर्टात गौरवीचा ठाम निर्णय...

अंतिम सुनावणीच्या दिवशी जजांनी गौरवीकडे पाहत विचारलं...

“तुम्हाला पोटगी, खर्च किंवा पतीच्या मालमत्तेतील हक्काबाबत काही मागणी आहे का…?”

क्षणभर कोर्टात शांतता पसरली…

गौरवी हळूच उभी राहिली… डोळ्यांत अजूनही वेदना होत्या…
पण आवाजात कमालीचा आत्मविश्वास...
“माननीय न्यायाधीश सर… मला पोटगी नको… मला कोणतीही प्रॉपर्टी नको…”
सगळ्या कोर्टाचं लक्ष तिच्याकडे खिळलं…
ती पुढे म्हणाली...
“माझं बाळ… मी स्वतःच्या हिमतीवर वाढवेन… मला दयेवर जगायचं नाही… मला फक्त न्याय हवा होता… आणि तो मला मिळालाय…”

माधव खाली मान घालून उभा राहिला…

जजांनी क्षणभर तिच्याकडे पाहिलं… आणि शांत आवाजात म्हटलं...
“तुमचा निर्णय धाडसी आहे… कोर्ट तुमचा सन्मान करते…”

न्यायालयाने तिची इच्छा नोंदवून घेतली…
निकालात नमूद केलेला मुद्दा...
"याचिकाकर्त्या पत्नीने स्वेच्छेने पोटगी व मालमत्तेवरील हक्क नाकारले असून... गर्भातील अपत्याची जबाबदारी स्वतः स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे…"

घटस्फोटाचा निकाल...
न्यायालयाने निकाल दिला...
▪ गौरवीला कायदेशीर घटस्फोट मंजूर
▪ गर्भातील बाळाची जबाबदारी माधव देशमुख यांच्या कडून घेण्यात येत आहे...
▪ गौरवीला स्वतंत्र आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार...

हातात निर्णयाची कागदपत्रं घेताना गौरवीचे डोळे पाणावले…
पण ते अश्रू वेदनेचे नव्हते… ते होते स्वातंत्र्याचे…

कोर्टाने तिला घटस्फोट दिला…
पण आयुष्याने तिला स्वतःची ओळख परत दिली…
तिने काहीही मागितलं नाही…
कारण तिला आयुष्याकडून फक्त स्वतःचा मान हवा होता…


क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."