Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ६३

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ६३


घटस्फोटानंतर...
कोर्टातून बाहेर पडताना... गौरवीच्या पावलांत थोडा थरथर निर्माण होतो… पण मन मात्र विलक्षण शांत होतं… एक नातं संपलं होतं…
पण तिचं अस्तित्व हरवलं नव्हतं…

तेवढ्यात माधव तीच्या समोर येतो... आणि तीचा हात पकडून माफी मागतो...

"गौरवी मला माफ कर... मी तुझ्यावर खरचं खुप प्रेम करतो... कॉलेजमधील तो Anti Ragging Room मधील अपमान मी विसरलो नव्हतो... आणि या अपमानाचा बदला घेण्यासाठी मी तुझ्याशी प्रेमाचे खोटे नाटक केले... आणि मला माहित होते माझी आई तुला कधीच स्विकारणार नाही... आणि तु आमच्या घरात आलीस कि ती तुझा छळ करणार... याचा मला पुर्ण विश्वास होता... पण हळूहळू मी तुझ्या प्रेमात पडलो... पण ते मी स्विकारु शकलो नाही... आणि तेवढ्यातच ते सगळं घडलं... आणि मी तुझी साथ द्यायची सोडून तुझ्यावरच संशय घेऊन तुला बाहेर काढले... मला माफ कर... आणि पुन्हा मला एक संधी दे प्लीज गौर..." माधव अक्षरशः तीचा हात आपल्या कपाळावर लावत ओक्साबोक्शी रडू लागतो...

पण गौरवी एक शब्द न उच्चारता आपला हात माधवच्या हातातून अलगद काढून घेते... आणि पुढे चालू लागते...

आसावरीने तीच्याकडे एक नजर पाहिले... आणि हळूच तिचा हात धरला…
“तू खूप मोठा निर्णय घेतलास गौरवी… आणि तो योग्य आहे…”

गौरवी फक्त हलकंसं हसली… त्या हसण्यात वेदना होत्या…
पण त्याहून जास्त आत्मसन्मान होता… थोड्याच अंतरावर आरव उभा होता…
तिच्याकडे पाहताना त्याच्या डोळ्यांत अभिमान दाटून आला होता…
तो काहीच बोलला नाही… कारण काही आधार शब्दांत नसतो… तो फक्त सोबत असण्यात असतो…

गौरवी कोर्टाच्या पायऱ्या उतरून खाली आली... आणि समोर तिचे आई-वडील उभे असलेले तिला दिसतात…
क्षणभर ती थबकते…

आईचे डोळे भरलेले असतात… तर वडिलांचा चेहरा मात्र शांत असतो… पण त्या शांततेआड दडलेली वेदना गौरवीला स्पष्ट जाणवते…

आई पुढे येते… गौरवीचा चेहरा दोन्ही हातांत धरते…
“खूप सहन केलंस बाळ… आता बस… आता सगळं संपलं…”

ते शब्द ऐकताच गौरवीचे बांधलेलं धैर्य तुटतं… आणि ती आईच्या कुशीत रडून मोकळी होते…

पण ते अश्रू पराभवाचे नव्हते… ते वर्षानुवर्ष साठून राहिलेल्या वेदनांचे होते…

वडील हळूच पुढे येतात… आणि तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतात...
“तू आमची मुलगी आहेस… आणि आम्हाला तुझा अभिमान आहे…”

त्या एका वाक्याने गौरवीच्या मनावरचा शेवटचा भारही हलका होतो…

थोड्या अंतरावर तीला आरव आणि आसावरी एकत्र उभे असलेले दिसते…
हा क्षण त्यांचा नव्हता…
हा फक्त मुलगी आणि तिच्या आई-वडिलांचा होता…

आई हळूच पोटावर हात ठेवते… आणि थरथरत्या आवाजात म्हणते...
“हे बाळ… आमचंही आहे गौरवी…”

गौरवीच्या ओठांवर पहिल्यांदाच दिलासा देणारं हसू उमटतं…

कोर्टाच्या बाहेर लोक पाहत होते… कुजबुजत होते…
पण आता गौरवी एकटी नव्हती…
आई-वडील तिच्या दोन्ही बाजूंनी उभे होते… आणि तेच तिचं सर्वात मोठं उत्तर होतं…

जिथे संसार संपतो…
तिथेच कधी कधी माहेरचं छत्र पुन्हा उघडतं…
आणि मुलगी पुन्हा जगायला शिकते…



क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all