"मैत्री म्हणजे काय?" हा प्रश्न आजच्या काळात विचारला तर उत्तरंही अनेक येतात – बालमैत्री, कॉलेजमधली मैत्री, ऑफिसमधली मैत्री... पण गेल्या काही वर्षांमध्ये एक नविन प्रकार जन्माला आला – आभासी मैत्री.
हो, मोबाईलमधल्या स्क्रीनवरून, एका प्रोफाईल फोटोमधून किंवा एखाद्या कॉमेंटमधून सुरुवात होते, आणि बघता बघता दोन अनोळखी लोकांची एक ओळख, नंतर संवाद, आणि मग मैत्री निर्माण होते.
सुरुवातीला ही संकल्पना मला थोडीशी गोंधळात टाकणारी वाटली होती. "खरंच का कुणी स्क्रीन पलीकडून आपला सच्चा मैत्रीण बनू शकतो?" असा प्रश्न सतत मनात येत होता. पण अनुभव आला आणि मत बदललं.
लॉकडाऊनच्या काळात सगळं जग थांबलं होतं. कॉलेज बंद, मैत्रीची भेट दूर, आणि मनही काहीसं एकटं. तेव्हा मी एक साहित्यिक अॅप डाऊनलोड केलं – कथा, कविता, विचार वाचण्याचं माध्यम. सुरुवातीला वाचक म्हणून सुरु केलं, आणि हळूहळू मी स्वतः लेखन करू लागले.
इथेच भेट झाली एका अनोळखी व्यक्तीशी. त्याचे विचार, प्रतिक्रिया नेहमी सकारात्मक असायचे. त्याने माझ्या लेखनातील बारकावे ओळखले, प्रोत्साहन दिलं. "ही ओळख पुढे काय?" असा प्रश्न मनात येतच होता. पण प्रत्येक संवादानंतर तो विश्वासाचं, सन्मानाचं नातं वाटू लागलं.
हळूहळू आम्ही फोनवर बोलू लागलो, कवितांवर चर्चा, जीवनातील काही अनुभव शेअर करायला लागलो. ही मैत्री कुठल्याही स्वार्थाशिवाय वाढत होती – ना रूप पाहिलं, ना भेटलो, तरीही काळजी वाटायची.
अर्थात, आभासी जग हे फक्त सकारात्मकच असतं असं नाही. काही वेळा फसवणूक, खोट्या ओळखी, किंवा भावनिक खेळही पाहायला मिळतो. एका मैत्रिणीचा अनुभव आठवतो – गेम खेळताना झालेली ओळख प्रेमात बदलली, पण नंतर समजलं की तो मुलगा आधीपासूनच नात्यात होता. मनस्वास्थ्य बिघडले, आत्मविश्वास गमावला.
त्यामुळेच आभासी मैत्री करताना काही गोष्टींची जाणीव असणं गरजेचं आहे –
संवादात प्रामाणिकपणा ठेवावा
ओळख वाढवण्याआधी पुरेसा वेळ द्यावा
वैयक्तिक माहिती शेअर करताना विचार करावा
कोणत्याही नात्याचा अति भरवसा लगेच ठेवू नये
पण या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या, तरी माझ्या आयुष्यातली आभासी मैत्री एक खूप सुंदर नातं ठरली आहे. एक अशा व्यक्तीची साथ मिळाली, जी नेहमी म्हणते –
"आपण एकमेकांचे शब्दांतले सावली आहोत, भेट होणार की नाही माहीत नाही, पण समजून घेतो हेच खरं!"
आजही मी ती ओळख, ती मैत्री जपते. आपापल्या आयुष्यात व्यस्त असलो तरी एक "कसं आहेस?" एवढा मेसेज देखील दिवसातली ऊर्जा वाढवून जातो.
सोशल मीडियावरून आलेली मैत्री, एकमेकांना न पाहता जपलेलं नातं, हे खरंच किती अद्भुत असतं! हे नातं कधीकधी रक्ताच्या नात्यांपेक्षाही जवळचं वाटतं.
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं –
"जग आभासी असलं, तरी मनापासून केलेली मैत्री खरीच असते...
ती मैत्री असते – नावाशिवाय ओळख जपणारी, शब्दांवर विश्वास ठेवणारी!"
ती मैत्री असते – नावाशिवाय ओळख जपणारी, शब्दांवर विश्वास ठेवणारी!"