Login

भेटीची ओढ... भाग ३ (अंतिम भाग)

अंतर कितीही असो महत्त्व नाही कारण प्रेम खरे आहे...
" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "

जलद लेखन

भेटीची ओढ... भाग ३ (अंतिम भाग)

©® एकता माने

निखिल तिच्या डोळ्यांत बघत म्हणाला,
"प्रेम कमी झालंय असं तुला वाटतं का? उलट, दूर राहून मला कळलं की तुझ्याशिवाय माझं आयुष्यच नाही. एकांशी तू श्वास आहे माझा. मी जरी तुझ्यापासून दूर असलो तरी हे मन मात्र सदैव तुझ्या जवळच असते, त्याच्यामध्ये फक्त तुझेच विचार चालू असतात."

एकांशी हलक्या स्वरात म्हणाली,
"मलाही कळलं की वाद म्हणजे नातं संपणं नाही. उलट आपण जास्त जोडले जातोय. या होणाऱ्या वादामुळे आपल्यामध्ये भेटीची ओढ जास्त निर्माण होते."

थोड्या वेळाने निखिलने तिचा हात धरला.

"एकांशी, मला वचन दे… आता कितीही अंतर असलं तरी आपण एकमेकांवर संशय घेणार नाही. कधी रुसलो तरी आपलं नातं विसरणार नाही. दूर राहत असल्यामुळे सारखं भेटणं शक्य होत नाही; पण याचा अर्थ असा नाही की आपल्यातलं प्रेम कमी होत आहे."

ती हसत म्हणाली,
"मी तुला सोडून कुठे जाणार आहे? पण तू पण मला वचन दे… काम कितीही असलं तरी दिवसातून एकदा तरी माझ्याशी हसून बोलशील. तुझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट हा माझ्यासोबत बोलूनच झाला पाहिजे."

दोघांनी एकमेकांना वचन दिलं. त्या वचनात एक गोड विश्वास होता.

सायंकाळी ते दोघे पार्कमध्ये गेले. मंद वारा वाहत होता. झाडांच्या सावल्या त्यांच्या गप्पांना साक्षीदार होत्या.

"त्यादिवशी मॅडमचा मूड जास्तच भांडण करण्याचा दिसत होता. म्हणून तर लांब राहून मला आता दुसरी कोणी भेटली आहे, माझे तुझ्यावर प्रेमच राहिले नाही, मी तुला फसवत आहे, मुद्दामून तुला भेटायला येत नाही, असे नको नको ते आरोप माझ्यावर लावायचे काम चालू होते."

एक दिवस भांडणामध्ये एकांशीचा राग अनावर झाला होता आणि त्या रागाच्या भरात ती त्याला नको नको ते बोलून मोकळी झाली होती.

"निखिल तुला तो राग दिसला; पण त्या रागामागे लपलेल्या माझ्या भावना दिसल्या नाहीत का? खरंच हा विरह सहन होत नाही. कसंतरी मनाला समजावते; पण कधी कधी हे मनही तुझ्याकडे ओढले जाते आणि मग तो राग निर्माण होतो. हा राग म्हणजे एक प्रकारचा इशारा असतो तुला सांगण्याचा की, मला तुझी खूप आठवण येत आहे आणि तुझी खूपच गरज भासत आहे." एकांशीने त्याला मिठी मारली आणि हळव्या स्वरात म्हणाली.

तिच्या मुखातून निघणाऱ्या शब्दांसोबत तिच्या डोळ्यांतूनही प्रेमासाठी अश्रू वाहत होते. त्या वाहणाऱ्या अश्रूंनी निखिलचा शर्ट भिजत होता; पण त्यानेही तिला थांबवले नाही. उलट तिच्याभोवती आपली मिठी घट्ट करून तिच्या केसांवरून हात फिरवत तिचे मन मोकळे होऊ दिले.

निखिल म्हणाला,
"एकांशी, सहा महिने दूर राहून आज कळलं की खरी भेट ही फक्त शरीराची नाही, तर मनांची असते. आपण रोज फोनवर बोलतो, रडलो, हसलो… तरीही आपण एकत्र राहिलो. या भावना, भेटण्याची ओढ जशी तुझ्या मनामध्ये असते तशी ती माझ्या मनामध्येही तितकीच तीव्र असते."

ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली,
"आपल्या दोघांना असलेली ही भेटण्याची ओढत सांगून जाते की आपल्या नातं हे किती पवित्र आणि निर्मळ आहे. आपलं हे नातं आपल्या प्रत्येक भेटीमध्ये नव्याने भरत जाते. आज आपण पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे. सहा महिन्यांचं अंतर एका मिठीत संपलं."

दोघेही थोडावेळ शांत राहिले. त्या शांततेतही प्रेम दडलेलं होतं.

रात्र झाली तसा त्यांना पुन्हा एकमेकांचा निरोप घ्यावा लागला; पण या वेळेला मनात दुःख नव्हतं. कारण या भेटीने त्यांना विश्वास दिला होता की अंतर कितीही असलं तरी प्रेम खरं असेल, तर नातं कधीच तुटत नाही उलट जसे जसे दिवस पुढे जातात तसतसा नात्यामधलाही घट्टपणा अधिक वाढत जातो.

दोघांनी हातात हात घेतला, एकमेकांकडे हसून पाहिलं आणि मनाशी ठरवलं,
'आता अंतर नाही, फक्त प्रेम आहे.'

समाप्त
©एकता माने ( संघ कामिनी )
0

🎭 Series Post

View all