सर्वात तेजस्वी गोष्ट.
एकदा काय झालं? बादशहा अकबराच्या दरबारात कामकाज संपलं होतं, आणि अकबर बादशाह आपल्या सर्व दरबारी लोकांसह सहजच इकडच्या-तिकडच्या गोष्टींवर चर्चा करत होते.
दरबारातलं कामकाज संपल्यावर उपस्थित मंत्र्यांना वेगवेगळे प्रकारचे बुद्धीचा कस लावणारे प्रश्न विचारणे हा अकबर बादशहाचा जणू छंदच होता.
चर्चेत बोलता बोलता बादशाह अकबराने दरबारातील सर्व मंत्र्यांना अचानक एक प्रश्न विचारला, "पृथ्वीवरची सर्वात तेजस्वी गोष्ट कोणती आहे?" बादशहाच्या या प्रश्नावर दरबारातील सर्वच जण एक क्षण अचंबित झाले.
दरबारी लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. मग काही वेळाने एकाने उत्तर दिले, "जहांपना, मला असं वाटतं की 'कापूस' ही पृथ्वीवरील सर्वात तेजस्वी वस्तू आहे."
त्याचवेळी दरबारातल्या दुसऱ्या एकाने उत्तर दिले, "महाराज मला असं वाटतं की, 'दूध' ही जगातली सर्वात जास्त तेजस्वी वस्तू आहे."
त्यानंतर दरबारातून अनेकांनी अनेक प्रकारची उत्तरे दिली. कुणी म्हणे की, "मोती सर्वात तेजस्वी आहे." तर कोणी म्हणे, "सत्य ही जगातली सर्वात तेजस्वी वस्तू आहे." काहींनी तर हिरे, माणिक, मोती, सोनं, चांदी ह्या वस्तू सगळ्यात तेजस्वी आहेत असंही म्हटलं.
राजदरबारामध्ये ही चर्चा रंगली असताना बिरबल शांतपणे सगळ्यांची उत्तर ऐकत होता आणि गालातल्या गालात मंद स्मित करत होता. बिरबलाला असं स्मित करताना पाहून बादशहा त्याला म्हणाले, "बिरबला तू का हसतो आहेस? तुझ्याकडे काही वेगळे उत्तर आहे का?"
बिरबल म्हणाला, "महाराज मला विश्वास आहे की, ती जगातील सर्वात तेजस्वी गोष्ट म्हणजे प्रकाश आहे."
बिरबलाचे उत्तर खरंतर अकबराला आवडले नव्हते आणि पटलेही नव्हते.
"बिरबला, तुला तुझे म्हणणं सिद्ध करून दाखवावे लागेल." बिरबलावर अविश्वास दाखवत बादशहा बोलले.
बिरबलाने संमतीदर्शक मान हलवली, "मी योग्य वेळी माझं म्हणणं सिद्ध करून दाखवेन." असे त्याने अकबराला उत्तर दिले.
बादशाह अकबरानेही बिरबलाचे म्हणणे मान्य केले आणि त्या दिवशीचा दरबार बरखास्त झाला.
त्यानंतर जवळपास एखाद महिन्यानंतर बिरबल बादशाह अकबराला भेटायला त्यांच्या महालात गेला. महालात अकबर बादशहा आपल्या डोकं हातात धरून बसले होते. त्यांच्याकडे पाहून असं वाटत होतं की, जणू त्या डोकेदुखीमुळे ते खूपच वैतागले आहेत.
पाठशाला असं वैतागलेला पाहून बिरबलाने अकबराला विचारले, "महाराज काय झालयं? तुम्हाला काही त्रास आहे का?"
त्यावर बादशहाने उत्तर दिले की, "मी डोकेदुखीने भयंकर त्रस्त आहे आणि या डोकेदुखीमुळे मला काहीही सुचत नाहीये."
त्यावर बिरबल म्हणाला, "महाराज कधीकधी तीव्र प्रकाश मुळे आपल्याला डोकेदुखीचा त्रास होतो. या डोकेदुखीवर माझ्याकडे एक उपाय आहे. महाराज, तुम्ही तुमचं डोकं एका कपड्याने घट्ट बांधा आणि शांतपणे तुमच्या बिछान्यावर पडून राहा. मी तुमच्या महालाचे सर्व दरवाजे, खिडक्या बंद करतो; त्यामुळे प्रकाशाची एक तिरीप सुद्धा आत मध्ये येणार नाही, तुम्हाला शांत झोप मिळेल आणि तुमची डोकेदुखी थांबेल."
तीव्र डोकेदुखीने त्रस्त झालेल्या बादशहाने अकबराचे म्हणणे ऐकले आणि त्यांनी डोक्याला एक पट्टी बांधली आणि आपल्या बिछान्यावर जाऊन झोपले. अकबर आणि बिरबलाच्या महालाच्या सर्व खिडक्या दरवाजे बंद केले आणि पडदेही लावून घेतले. प्रकाशाचा एकही किरण आता अकबर बादशहाच्या खोलीत शिरगाव करू शकत नव्हता. बादशहाच्या खोलीत सर्वत्र अंधार झाला.
आता बिरबलाने अकबर बादशहाच्या दरवाजा जवळ एक मोठा कापसाचा ढिगारा ठेवला. आणि दरवाज्याच्या दुसऱ्या बाजूला एका मोठ्या भांड्यात दूध ठेवले. एकीकडे कापसाचा ढिगारा आणि दुसरीकडे दुधाचे भांडे असल्यामुळे बादशहाच्या खोलीच्या दरवाज्या जवळ जाऊन तो उघडता येऊ शकत नव्हता, कारण आतून दरवाजा उघडण्यासाठी आधी कापसाचा ढिगारा आणि मग दुधाचे भांडे दूर करावे लागणार होते. खरंतर आपलं म्हणणं किती योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठीच दरवाज्याच्या आतल्या बाजूस दुधाचे भांड आणि कापसाचा ढिगारा बिरबलाने ठेवला होता.
खोलीत सगळी व्यवस्था करून बिरबल खोलीच्या बाहेर बादशहा उठण्याची वाट पाहत उभा राहिला.
बादशहाच्या खोलीत संपूर्ण अंधार असल्यामुळे बादशहाला शांत झोप लागली आणि बराच वेळ झोपल्यानंतर बादशहाला जाग आली; त्यावेळी बादशहाला खरंच खूप ताजे-तवाणे वाटत होते. बादशहा आपल्या बिछानावरून खाली उतरले आणि त्या अंधारा खोलीत बाहेर जाण्याचा दरवाजा शोधू लागले.
दरवाजा शोधता शोधता बादशहा पहिल्यांदा कापसाच्या ढिगार्यावर अडखळले आणि त्यानंतर ते दुधाच्या भांड्यावर धडपडले. त्यानंतर खूप प्रयत्न केल्यावर त्यांना शेवटी महालाच्या बाहेर जाणारा दरवाजा मिळाला. दरवाजा उघडल्याबरोबर बादशहाच्या खोलीत सर्वत्र प्रकाश पसरला. खोलीत प्रकाश पडल्या बरोबर बादशहाला तो कापसाचा ढिगारा आणि दुधाचे मोठे भांडे दिसले.
अकबर बादशहा खोलीतून बाहेर आले आणि चिडून त्यांनी बिरबलाला विचारले, "बिरबला, हा काय मूर्खपणा आहे? माझ्या खोलीच्या आत मध्ये हा कापसाचा ढिगारा आणि दुधाचे हे एवढे मोठे भांडे कोणी ठेवलं? आणि कशासाठी ठेवलं?"
बिरबलाने अतिशय नम्रपणे उत्तर दिलं, "जहांपना तुमच्या खोलीच्या आत मध्ये संपूर्ण अंधार होता, त्यामुळे मी जगातल्या दोन सर्वात जास्त तेजस्वी वस्तू तुमच्या खोलीत ठेवल्या की ज्यामुळे तुम्हाला खोलीचा दरवाजा स्पष्टपणे दिसावा."
बादशहाने चिडून म्हटले,"बिरबला, अरे एखादी वस्तू कितीही तेजस्वी असली तरीही तिच्यावर जोपर्यंत प्रकाश पडत नाही तोपर्यंत ती डोळ्यांना दिसत नाही."
अकबराच्या उत्तरावर मंदस्मित करत बिरबल म्हणाला, "महाराज, एका महिन्यापूर्वी मी तुम्हाला हेच म्हटलं होतं की, या जगामध्ये प्रकाशा इतके तेजस्वी काही नाही; पण त्यावेळी तुम्ही माझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही. पण मला आता असं वाटतं की, माझं म्हणणं तुम्हाला पटलं आहे आणि प्रकाश ही जगातली सर्वात जास्त तेजस्वी वस्तू आहे यावर तुमचा विश्वासही बसला आहे."
बिरबलाच्या बुद्धी चातुर्यावर बादशहा परत एकदा खुश झाले आणि त्यांनी शाबासकी देण्यासाठी बिरबलाची पाठ थोपटली.
©® राखी भावसार भांडेकर
नागपूर.