Login

अति उदार तो सदा नादार भाग एक

अतिउदार तो सदा नादार
अति उदार तो सदा नादार भाग एक


“अहो मी काय म्हणते, हिवाळा सुरू झाला आहे आणि यशचे शाळेचे बुट आणि मोजे फाटले आहेत, आणि त्याची स्लीपर पण तुटली आहे. रियाची पण बॅग खराब झाली आहे दोन वर्षापासून ती जुनीच बॅग वापरते आहे, या महिन्यात हा एवढा खर्च करावाच लागणार.” मीनाताई नवऱ्याचा-दिनेशरावांचा अंदाज घेत मनात जरा धाकधूक ठेवूनच बोलत होत्या.

“झाल्या का मागण्या सुरू, ऑफिस मधून घरी आलं आणि जरा दहा मिनिटे निवांत बसलो की तुझं आपलं सुरू कधी मुलांची आगाऊचे खर्च तर कधी तुझे. पैसे खर्च करण्याशिवाय तुला दुसरं काहीही सुचतच नाही का?” दिनेश राव वैतागून बोलत होते.

“तसं नाही ओ, पण काही खर्च हे टाळता येत नाहीत ना! आणि आता मुलंही मोठी झालीत त्यामुळे नाही म्हटलं तरी काही गोष्टी कराव्याच लागतात ना?” मीनाताईंच्या स्वरात एक अस्वस्थ अजीजी होती. आता नवरा काय म्हणेल याची धास्तीही त्यांना लागून राहिली होती. खर्चाचा विषय काढला की दिनेशराव एकदम भांडायलाच उठत, त्यामुळे घरात एखादी वस्तू संपली किंवा काही नवीन विकत आणायचं म्हटलं की मीनाताईंना प्रचंड मानसीक ताण येत असे आणि त्यांच्या जीवाची उगाच कालवा कालवा सुरू व्हायची, पण काही गोष्टींमध्ये त्यांचाही नाईलाज होता. घर संसार म्हटलं की रोजच काही ना काही लागतं आणि काही काही खर्च असे असतात की ते टाळताच येत नाहीत. म्हणूनच मनात नसूनही आज दिनेशराव संध्याकाळी ऑफिस मधून परत आल्याबरोबर मीनाताईंनी त्यांच्यासमोर खर्चाची गोष्ट काढली आणि अंदाजाप्रमाणे दिनेशराव डाफरलेच.

“तुला तर फक्त पैसे खर्च करण्याचे नवीन नवीन कारण सुचतात, बाहेर जाऊन बघ जरा एक, एक रुपया कमवायला माणसाला किती मरमर करावी लागते! आणि काय म्हणालीस मुलं मोठी झाली? मग तुझी ही मोठी झालेली मुलं अभ्यासात का दिवे लावत नाही? मी, तुला बजावून सांगतो की कुठल्याही फालतू खर्चा करिता मी अजिबात पैसे खर्च करणार नाही!” अपेक्षेप्रमाणे दिनेश रावांनी पैसे घेण्याकरिता स्पष्ट शब्दात नकार दिला.

दिनेशरावांना पगार कमी होता किंवा ते कंजूस होते अशातला भाग नव्हता, तर कुणावर कधी किती खर्च करावा याचा हिशेब आणि विचार त्यांनी उभ्या आयुष्यात कधीही केला नव्हता. स्वतःच्या मुलांपेक्षा त्यांचं त्यांच्या भावंडांवर आणि भावंडांच्या मुलांवर जास्त प्रेम होतं. भावंडांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी खर्च करण्याकरिता दिनेश राव एका पायावर उभे असतात पण बायकोने घर खर्चासाठी किंवा मुलांच्या खर्चासाठी काही पैसे मागितले की ते पैसे देण्याकरिता स्पष्ट नकार देत. आपल्या नवऱ्याचा हा स्वभाव ओळखून मीनाताई घरी बसल्या साडीला पिको फॉल लावण्याचे काम करायच्या. पण त्यातून खूप काही पैसे त्यांना मिळत नव्हते. त्यामुळे नाईलाजाने मीनाताईंना दिनेशरावांना पैसे मागावे लागायचे आणि त्यांचे चार शब्द ऐकून घ्यावे लागायचे.

आपल्या आई-वडिलांमध्ये सुरू असलेला संवाद यशने स्वयंपाक खोलीतून ऐकला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर वेदनेची एक लकेर उमटली होती.

पुढल्या भागात बघूया दिनेश राव मुलांच्या खर्चासाठी आणि घरातलं सामान विकत घेण्यासाठी पैसे देतात की नाही.

©® राखी भावसार भांडेकर. नागपूर

सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.

0

🎭 Series Post

View all