चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद लेखन
शीर्षक - अनुत्तरित प्रश्न
भाग: ३
"अगं त्याचे तर नावसुद्धा काढू नकोस तू या घरात. त्या दिवशी देवळात ह्यांचं काही तरी बिनसलं त्याच्यासोबत आणि घरी येऊन कसे वैतागले होते ते बघितले ना तू? मग मला वाटते तू विषय इथेच संपवलेला बरा." सुनिता कविताला समजावण्याचा प्रयत्न करत होती.
"जेव्हा मी कॉलेजमध्ये होते, तेव्हापासून मी माझ्या जीवनाचा साथीदार म्हणून प्रमोदकडे पाहत आले आहे. त्याला माझ्या मनात देवासारखे पूजले आहे आणि आता मी दुसऱ्या पुरुषाचा विचार कसा करू आई? मला तुम्हा दोघांना पण दुखवायचे नाहीये. नाहीतर मी केव्हाच प्रमोदबरोबर पळून जाऊन लग्न केले असते, मला जसा प्रमोद हवा आहे तसे तुम्ही पण हवे आहात." कविता बोलतच होती
सुनिताचे मन तिला स्वस्थ बसू देत नव्हते. पण ती काहीच करू शकत नव्हती. कविताची तडफड पाहण्याशिवाय त्या वेळेला तिच्या हातात काहीच नव्हते.
"आई मी सुखी व्हावे म्हणून तुम्ही माझे लग्न तुम्हाला पाहिजे त्या मुलाबरोबर लावताय ना ? मग ऐक त्या मुलाबरोबर मी मनापासून कधीच संसार करू शकणार नाही." कविता रडत म्हणाली.
"मुली, असे म्हणू नकोस गं, सांग मी तरी काय करू? एका बाजूला तू व एका बाजूला तुझे बाबा. तुम्हा दोघांमध्ये माझ्या आयुष्याची खिचडी होत आहे गं." असे म्हणून सुनिता रडत रडत आत गेली.
लग्नाची तयारी जोरात चालू होती. घरात रंगरंगोटी चालू होती, पण जिच्यासाठी हे सर्व करत होते, तिचे यामध्ये कुठेही मन रमत नव्हते. कविता कुठल्यातरी खोल विचारात होती. तिचे हसणे कधीच बंद झाले होते. नव्या श्रींचे तेज तर चुकून सुद्धा दिसत नव्हते, सुनिताला हे सर्व दिसत होते, कळत पण होते, पण ती काहीच करू शकत नव्हती. तिचे हात बांधल्यागत झाले होते.
दुसऱ्या दिवशी प्रमिलाची हळद व परवा लग्न होते. सुनिता दिवसभर प्रमिलाच्याच घरी होती. सायंकाळी ती घरी परतली. ती घरात प्रवेश करताच कविता तिच्यासमोर येऊन उभी ठाकली.
"आई, मी जरा प्रमिलाच्या घरी जाऊन येते."
कित्येक दिवसांनी मुलगी तोंड उघडून बोलली म्हणून सुनिताला जरा - बरे वाटले. तसा तिलाही काही विरंगुळा वाटावा म्हणून सुनिताने लगेच तिला जाण्यास होकार दर्शविला.
" आई मला जरा येण्यास उशीर होईल." सुनिताला पण माहीत होतेच की लग्न असलेल्या घरात कसल्याही कामाला उशीर होतोच म्हणून सुनिता काहीच बोलली नाही.
आज कविता काहीतरी ठाम निश्चय करून घरातून बाहेर पडली होती. हातात बॅटरी, टॉर्च घेऊन घरातून बाहेर पडल्या पडल्या ती प्रमिलाच्या घरी न जाता थेट प्रमोदला भेटण्यास त्यांच्या रोजच्या भेटण्याच्या जागेवर पोहोचली.
आज कविता काहीतरी ठाम निश्चय करून घरातून बाहेर पडली होती. हातात बॅटरी, टॉर्च घेऊन घरातून बाहेर पडल्या पडल्या ती प्रमिलाच्या घरी न जाता थेट प्रमोदला भेटण्यास त्यांच्या रोजच्या भेटण्याच्या जागेवर पोहोचली.
प्रमोदला भेटायला येण्यास तिने अगोदरच निरोप पोहोचविला होता. त्यामुळे प्रमोद आधीच तिथे पोहोचला होता.
चहूकडे अंधार पसरला होता, रातकिडे किरकिरत होते. एरवी अंधारात बाहेर जाण्यास घाबरणाऱ्या कविताला आज त्याचे काहीही वाटत नव्हते. तिने हातातील टॉर्चला उजेड प्रमोदच्या चेहऱ्यावर टाकला. प्रमोदच्या चेहऱ्यावरचे तेज जरा कमी झाले होते. वाटत होते, तो कुठल्यातरी खोल विचारात आहे. गेल्या काही दिवसांत ठीकशी झोपही झाली नव्हती. हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते.
कविता जे काही समजायचे ते समजली. कविता आल्या आल्या प्रमोदला बिलगली, तसे दोघांनीही इतके दिवस साठवलेल्या अश्रृंना वाट मोकळी करून दिली. कितीतरी वेळ ती दोघेही तशीच रडत होती. 'कविता, आता काय करायचे ठरवले आहेस ?' प्रमोदने शांतता भेदीत प्रश्न केला.
"कशाबद्दल ?" कविताने प्रश्न केला.
"लग्नाबद्दल..." प्रमोदने लगेच उत्तर दिले.
"प्रमोद मला तू ही पाहिजे आहेस व मला माझ्या आईवडिलांचा पण शब्द ठेवायचा आहे. म्हणून फार विचार करून मी एक निर्णय घेतला आहे."
"'काय निर्णय घेतला आहेस?" प्रमोदने उत्सुकतेने विचारले.
" प्रमोद जेव्हा पासून मी तुला बघितले तेव्हापासून मी तुलाच सर्वस्व मानले आहे. मी मनोमन माझे तन व मन तुझ्याचरणी अर्पण केले आहे. माझ्या शरीरावर फक्त आणि फक्त तुझाच अधिकार आहे. माझ्या उदरी फक्त तुझेच मूल जन्माला येणार अन्यथा कुणाचे नाही." कविता बोलत होती. तिच्या आवाजात कठोरता होती.
" म्हणजे ?" प्रमोदने प्रश्न केला.
"म्हणजे मला फक्त एकदाच पतीसुख तुझ्याकडून मिळू दे." कविताने हात जोडत म्हटले.
"अगं पण हे पाप आहे."
"ते मलाही माहीत आहे. पण माझ्याकडे आणखी काहीच पर्याय नाही. फक्त एकदा अन् एकदाच. प्रमोद नाही म्हणू नकोस. अरे त्या एकाच आठवणींवर उभे आयुष्य मी व्यतीत करेन व देवाजवळ प्रार्थना करेन की, त्या आपल्या मिलनातून तुझा अंकुर माझ्या उदरी वाढू दे. त्याला बघत बघत निदान हा जन्म तरी निघेल माझा." कविताने प्रस्ताव मांडला.
प्रमोदला काय बोलायचे तेच कळत नव्हते.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा