चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद लेखन
शीर्षक - अनुत्तरित प्रश्न
भाग: ५ ( अंतिम भाग)
जलद लेखन
शीर्षक - अनुत्तरित प्रश्न
भाग: ५ ( अंतिम भाग)
"फार गुणी मुलगा होता प्रमोद. त्याचे हे असे व्हायला नको होते."
गाडी चालू झाल्या झाल्या संतोष बोलू लागला तशी सुनिता भानावर आली.
"हां, काही दिवसांपूर्वी माझा अन् त्याचा वाद झाला होता पण नंतर मला समजले की, मीच थोडी आगळीक केली. तो आपल्याजागी योग्य होता. थोडा स्पष्टवक्ता होता." संतोष बोलत होता.
संतोषचे हे बोलणे ऐकून सुनिताला काय बोलावे तेच कळत नव्हते. संतोषचे प्रमोदबद्दल असे विचार ऐकून तिला धक्काच बसला.
'अरे देवा ! काय केले मी हे, मी या मुलाबद्दल व आपल्या कविताबद्दल आधीच बोलायला पाहिजे होते का? फार तर काय होणार होते, नाही म्हटले असते, माझ्यावर ओरडले असते. एक वेळ माझ्यावर हात उगारला असता, एक वेळ...'
'पण एक वेळ त्यांनी हो सुद्धा म्हटले असते तर हा एवढा अनर्थ घडला नसता. दोन जीवांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले नसते. मी... मी जबाबदार आहे प्रमोद व कविताच्या आयुष्याचा खेळ खंडोबा होण्यास, सर्वस्वी मीच जबाबदार आहे.' असे एक नव्हे तर अनेक विचार तिच्या डोक्यात येत होते.
आणि शेवटी लग्न झाले. प्रदीप आणि कविताच्या नवीन संसाराचा प्रारंभ झाला.
लग्न थाटामाटात झाले होते, नवरी पण सुंदर होती, सासरची मंडळी पण खूप छान होती, पण राहून राहून प्रदीपच्या मनात काहीतरी अपराध्याप्रमाणे वाटत होते. त्याला काहीतरी चुकल्यासारखे वाटू लागले होते. .
खरे म्हणजे लग्नाची सगळी तयारी झाली होती तेव्हाच त्याला ते सांगावेसे वाटत होते, पण तेव्हा सांगितले असते तर लग्न मोडले असते. त्याचे बाबा दुःखी झाले असते, कारण मुलगी त्याच्या बाबांच्या मित्राची होती
जर ते सांगितले असते तर सगळ्यांना समजले असते, जग त्याच्यावर हसले असते, त्याच्या पौरुषत्वावर संशय घेतला असता, म्हणून भीतीने तो गप्पच राहिला.
गोष्ट दीड महिन्यापूर्वीची होती. प्रदीप कामावरून स्कूटरने घरी येत होता. दुसऱ्या दिवशी डब्याला पाहिजे म्हणून त्याने ताजी भाजी पण घेतली होती. दोन दिवसापूर्वीच त्याला बाबांनी सांगितले होते की, त्यांच्या कामावर त्यांचा कोण मित्र आहे संतोष, त्यांच्या घरी त्यांची मुलगी बघायला जाऊयात म्हणून.
प्रदीप मनोमन विचार करत होता. तो आपल्याच बाजूने स्कूटर चालवत होता, इतक्यात... इतक्यात एक पंधरा- सोळा वर्षाचा मुलगा समोरून येणाऱ्या बसला ओव्हरटेक करत आला व त्याने थेट आपली मोटार सायकल प्रदीपच्या स्कूटरवर ठोकली.
प्रदीप शुद्धीवर आला तेव्हा हॉस्पिटलमध्ये होता. त्याच्या पोटावर कसलीतरी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. बाकी कुठेही काही लागले नव्हते. साधे खरचटले सुद्धा नव्हते !
आठ दिवस त्याला कुणीही सांगितले नव्हते काय झाले ते. त्याला वाटले सहजच टाके घातले असतील. आठव्या दिवशी टाके काढले. त्याला डिस्चार्ज मिळणार होता. टाके काढल्यानंतर नर्सने येऊन डॉक्टरांनी केबिनमध्ये बोलावले म्हणून सांगितले.
"डॉक्टर, आत येऊ का ?" केबिनचा दरवाजा ढकलत प्रदीपने विचारले.
"हो... या... बसा. " डॉक्टर उद्गारले.
"डॉक्टर, तुम्ही मला बोलावलंत ?"
"अरे हो..." असे म्हणून डॉक्टर जरा थांबले.
" सांगा डॉक्टर..."
"मिस्टर प्रदीप आम्ही डॉक्टर असलो तरी काही गोष्टी विधीलिखित असतात. डॉक्टर असूनसुद्धा आमच्या हातात केवळ प्रयत्न करणेच असते."
"मी समजलो नाही डॉक्टर, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते, जे काही असेल ते स्पष्ट बोला." जरा गंभीर होत प्रदीपने विचारले.
"बरं, मी स्पष्ट बोलतो, तुम्हाला इस्पितळात आणले त्यावेळी तुम्ही पूर्ण बेशुद्ध होता. तुमच्या पोटाच्या खालच्या बाजूला जोरदार धडक बसली होती. त्यामुळे ताबडतोब शस्त्रक्रिया करावी लागली, जी आवश्यक होती."
"पुढे..."
"पुढे हेच की, तुम्हाला अशा जागी दुखापत झाली आहे की, तुम्ही कधीही आयुष्यात बाप बनू शकणार नाही."
"काय ?" प्रदीपला जोरदार धक्काच बसला.
प्रदिपचे डोके गरगरल्यासारखे झाले.
" डॉक्टर, कुणाकुणाला माहीत आहे हे?" प्रदीपने विचारले.
"आधी तुम्हालाच सांगितले."
"कृपा करून आणखी कुणाला सांगू नका, माझ्या आई-बाबांना जर हे कळलं तर मोठा धक्का बसेल. त्यांनी किती स्वप्नं बघितली होती माझ्या लग्नाची, नातवंडाची."
डॉक्टरचा निरोप घेऊन प्रदीप घरी आला. पुढे आठ दिवस तो त्याच विचारात होता म्हणून कामाला पण गेला नाही.
पण जिच्याबरोबर आयुष्य घालवायचे तिला तर सांगायला हवे. तिला अंधारात ठेऊन कसे चालेल, त्याचे एक मन सांगत होते. अरे पण जर आता सांगितले. तिचा तुला बघण्याचा दृष्टिकोण बदलेल, तिला थोडेच कळणार आहे आणि जेव्हा कळेल तेव्हा त्या प्रसंगाला सामोरे जाऊ, त्याचे दुसरे मन समजावत होते. त्याने शेवटी दुसऱ्या मनाचे ऐकले व कुणालाही न सांगण्याचा निर्णय घेतला.
****************
"अरे प्रदीप, अभिनंदन तू बाबा होणार आहेस." आईने प्रदीपला मिठी मारत सांगितले.
"मी बाबा.." प्रदीपने आश्चर्यचकित होऊन विचारले.
"हो... हो... तूच." असे म्हणून आई निघून गेली.
हे कसे शक्य आहे? प्रदीपचा तर विश्वासच बसत नव्हता. एकदा तर त्याच्या मनात आले त्याच डॉक्टरकडे जाऊन पुन्हा चेकअप करून घ्यावे, पण त्याला धाडस झाले नाही. डॉक्टरकडे चेकअप केला व अन्य कुणाला मी बाप बनू शकत नाही हे समजले तर... तर मग काय होईल? न पेक्षा मी बाप बनू शकत नाही व हे मूल आपले नाही म्हटले, तर आपलेच बिंग फुटेल म्हणून तो मूग गिळून गप्पच राहिला. खरं काय ते फक्त त्यालाच माहीत होते व दुसरे म्हणजे कविताला.
त्यांना पुढे एक मुलगा झाला, त्याचे नाव प्रणव ठेवले.
एक दोनदा प्रदीपने कविताला विचारायचा प्रयत्न केला. पण प्रणवचा चेहरा डोळ्यासमोर आला अन् त्याने ते मुद्दामहून टाळले. नाही म्हटले तरी लोकांच्या दृष्टीने प्रणव त्याचा मुलगा होता. आता तर त्याला त्याची सवय झाली होती. आईपेक्षा प्रदीपकडेच त्याचा ओढा होता. आता कधी जर प्रदीपने कवितापाशी तो विषय काढला असता तर... तर ही सारी घडीच विस्कटून गेली असती. नाही म्हटले तरी प्रणवच्या देखभालीत व बापाच्या कर्तव्यात प्रदीपने काहीच कमी केले नव्हते.
तो फक्त मनोमन कविताला विचारत होता.
'कविता, प्रणव माझा मुलगा नाही हे तुलाही माहीत आहे आणि मलाही. कारण मी बाप बनूच शकत नाही. मग का म्हणून तू मला सांगितले नाहीस की, त्याचा बाप कोण आहे ? का म्हणून ? हा प्रश्न का अनुत्तरित आहे?
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा